जबाबदार मीच!

- आॅप्रा विनफ्रे
खरं तर आपण आधी स्वत:ला ओळखायला सुरुवात केली पाहिजे.. मुळात मी काय आहे आणि काय करू शकते हे आपलं आपल्याला ओळखता यायला हवं. ते ओळखलं की मग आपल्या आयुष्यात होणाºया किंवा होऊ घातलेल्या प्रत्येक घटनेला आपणच सर्वस्वी जबाबदार असतो. आणि ती जबाबदारी आपली आपणच पेलली पाहिजे याचं भानही येतं. आपलं जे काही बरं-वाईट आयुष्य आहे, त्यासाठी आपण स्वत:च जबाबदार असतो. मात्र घडल्या-बिघडल्या गोष्टींसाठी अनेकदा लोकांना, परिस्थितीला, नशिबाला जबाबदार धरतो.
आणि त्याहून वाईट म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की कुणीतरी येईल, तुम्हाला अवघड परिस्थितीतून वर काढेल आणि मग सगळं सुरळीत होईल तर अशी वाट पाहणं बंद करा. परिस्थिती बदलण्याची ताकद आपल्याकडेच आहे हे जितक्या लवकर कळेल तितकं चांगलं. तरच तुम्ही प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करू शकाल.

पाण्यात पडल्यावर बुडणाºया व्यक्तीलाच हातपाय हलवावे लागतात. तरायचा प्रयत्न करावा लागतो. होतं काय, बायका सतत (कुठल्याही वयात) इतरांना दोष देत बसतात. मात्र त्याने परिस्थितीत फारसा बदल होत नाही. वय कितीही असू देत, परिस्थिती किती वाईट असू देत, भूतकाळ काहीही असू देत, तो विसरून पुढे जाता आलं पाहिजे. जे आहे ते या क्षणाला आहे, त्यामुळे तो क्षण पकडून भूतकाळ विसरून जबाबदारीपूर्वक निर्णय घेत पुढे जाणंच योग्य आहे. ते केलं की प्रगतीचे रस्ते आपली वाट पाहू लागतात...
संकलन : प्रियदर्शिनी हिंगे

आॅप्रा विनफ्रे जगात सर्वाधिक जास्त नावाजलेल्या टीव्ही कार्यक्रमाची सूत्रसंचालिका. एकेकाळी बाललैंगिक शोषणाला बळी पडलेली कुमारी माता. शोषणाला बळी पडूनही तिनं आपल्या आयुष्याला एक नवं वळण दिलं. आज जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत तिचं नाव घेतलं जातं.