How to make Bhardabhaat? | पाहुण्यांना खूष करणारा भरडा भात कसा करायचा?
पाहुण्यांना खूष करणारा भरडा भात कसा करायचा?

संध्या पतेवार
चंद्रपूर

होळीच्या दिवशी घरातली हरभरा डाळ संपली म्हणून मी डाळ मागवली होती. तर नव-याने डाळ तर आणलीच सोबत नवीन चिंच आणि कै-याही आणल्या. 
मला एकदम माझ्या आईच्या हातचा भरडा भात, चिंचेचा सार आणि कैरीचं पन्हं आठवलं. उन्हाळ्यात आमच्याकडे पाहुणे यायचे. तेव्हा आई संध्याकाळचा बेत म्हणून बर्‍याचदा हा बेत करायची. 

या गोळे भातावर लसूण आणि लाल मिरचीचं कढवलेलं तेल घालून खायची पद्धत होती. या भरडा भातालाच गोळा भातही म्हणतात.  भरडा भात, कढवलेलं तेल आणि सार असला की आलेले पाहुणे खूश व्हायचे आणि आमचीही चंगळ व्हायची.
 

भरडा
चन्याची डाळ जाडसर दळायची. त्यात अंदाजानुसार तिखट, मीठ, लसूण, जिरे आणि तेल टाकून ते भिजवायचं. या मिश्रणाचे मुठीच्या आकाराचे मुठे बांधायचे.
भात 
भरडा भातासाठी तांदूळ धुवून भात मांडायचा. तांदूळ अर्धा शिजला की भातात ते भरड्याचे मुठे सोडायचं. यासाठी भात थोडा मोकळाच छान लागतो. 
सार 
चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढायचा. या कोळात भात बघून पाणी आणि गूळ घालावा. अनेकांना हा सार गोड आवडतो. पण अनेकांना आंबटसर आवडतो. हा सार आपल्या आवडीनुसार गोड-आंबट करावा. नंतर कढईत तेल घालून त्यात जिरे-मोहरी तडतडू द्यावी. 
त्यात लसणाचे बारीक तुकडे, लाल मिरच्यांचे तुकडे, थोडा हिंग घालावा. नंतर त्यात चिंचेचं पाणी, गूळ घालून सार चांगला उकळू द्यावा. 
कढवलेलं तेल 

तेल तापवावं. गरम झालं की त्यात मोहरीचं दाणे, जिरे आणि लसणाचे बारीक तुकडे करावेत. ते लालसर झाले की गॅस बंद करावा. भरडा भात खाताना प्रथम ताटात भात घ्यावा. त्यावर भरडा फोडून टाकावा. त्यात कढवलेलं तेल आणि सार  घालावा. हा बेत एकदम चवदार होतो.  


Web Title: How to make Bhardabhaat?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.