नवीन वर्ष सुरू झालं की जगण्यातली जुनी मरगळ झटकून टाकून नवीन काहीतरी करण्याचा उत्साह संचारतो. यावर्षी काहीतरी वेगळं करायचं, वेगळं दिसायचं हाच हेतू असतो. अशा नव्या ताज्या हेतूंनी जगण्याला टवटवी देताना ज्या घरात आपण राहतो त्या घरालाही टवटवी देण्याचा विचार अवश्य करावा. 


घर सजावटीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. पडद्यांपासून तर फर्निचरपर्यंत, किचनमधील ओट्यापासून तर ट्रॉलीजपर्यंत, एवढेच कशाला बाथरूममधील टाइल्स, बेसिन्स, नळ यांच्यासाठीही हजारो डिझाइन्स सजावटीसाठी उपलब्ध आहेत. हे सगळं जरी असलं तरी यापैकी नेमकं काय निवडावं हे कळत नसतं. २०१७ चा घर सजावटीचा टे्रंड काय असणार आहे हे समजून घेतलं तर यंदाच्या वर्षी आपल्या घराच्या भिंतीवर, सोफ्यावर, टेबलवर नक्कीच काहीतरी वेगळं दिसू शकेल !

गडद रंगांचं स्वागत 
घराच्या भिंतींवर, फर्निचरसाठी, पडद्यांसाठी सतत फिकट रंग तुम्हाला आवडत असतील तर तुमचा चॉइस बदलून टाका. कारण २०१७ या वर्षात गडद रंगसंगतीचा ट्रेंड असणार आहे. 
गडद रंगसंगतीमुळे स्टायलिश, व्हायब्रंट लूक तुम्हाला सहज मिळतो. म्हणूनच यावर्षी त्याच त्या फिकट, सोबर रंगांच्या दुनियेतून बाहेर पडून गडद रंगसंगतीत घर सजवा. नवा लूक, नवी एनर्जी या गडद रंगांमधून मिळेल. 

जुन्या आकारांना निरोप
घरातील काही वस्तूंचे ठरावीक आकार आपण वर्षानुवर्षे वापरत आलो आहोत. उदाहरणच द्यायचं झालं तर पिलो, सेंटर टेबल. आयताकृती, चौकोनी या पठडीतील आकारांना बायबाय करण्याची वेळ आहे. कारण २०१७ या वर्षात त्रिकोण, षटकोन यांसारख्या आॅफबीट आकारांचा ट्रेंड असणार आहे. मॉडर्न, २१ व्या शतकाची ओळख असलेले हे डिझाइन्स असतील. या आकारांमुळे इंटिरियरला एक टेक्श्चर प्राप्त होण्यास मदत होईल. आणि काहीतरी वेगळं म्हणून अशा वस्तूंनी घर सजवतानाही मज्जा येईल. 

क्रेझी प्रिंट्सची भन्नाट कल्पना
आपलं घर म्हणजे आपल्यातल्या सृजनशीलतेचा, कल्पकतेचा आविष्कार सादर करण्याचं सगळ्यात मोठं व्यासपीठ असतं. त्यामुळे यावर्षी घर सजावटीसाठी जे काही स्वत: कराल, जे बाजारातून विकत आणाल ते करताना क्रेझी प्रिंट्स म्हणजेच लेपर्ड किंवा अ‍ॅनिमल प्रिंट्स, झेब्रा स्ट्रिप्स, इंग्रजी अक्षरं, प्राण्यांचे आकार (फक्त एका रंगात आउटलाइन व आतून पूर्ण पेंट केलेले), रेषांचे जाळे यांसारख्या भन्नाट आयडियांचा वापर भिंतीवर किंवा सोफा आणि चेअर कव्हरसाठी करू शकता. 


जुन्या आणि मॉर्डन लूकची गट्टी
या वर्षात घर स्टायलिश पद्धतीनं सजवणार असाल तरी घर सजावटीत कुठेतरी समतोल असायला हवा. म्हणजेच पारंपरिकता आणि आधुनिकतेचा संगम असला तर ती सजावट उत्तम होते. हा संगम साधण्यासाठीच मेटॅलिक वस्तू, मग ती कोणत्याही स्वरूपातील असू शकते, हा या वर्षातील मुख्य ट्रेंड असेल. तांब्या-पितळाची भांडी, अ‍ॅण्टिक मूर्ती किंवा याच धातूपासून बनवलेले भिंतीवर शोभून दिसतील असे विविध आकार याचा यात समावेश असू शकतो. घरातील दिवाणखान्यात, बेडरूममध्ये मेटॅलिक वस्तूंमुळे एक वेगळीच शोभा येते. मात्र मेटॅलिक पीस घरात ठेवताना भिंतींचे रंग, ती वस्तू कोणता अर्थ व्यक्त करते याचा जरूर विचार करावा.

(सारिका पूरकर-गुजराथी queen625@gmail.com)