- तेर पॉलिसी सेंटर 
 
पिण्यासाठी शुद्ध पाणी ही आज प्रत्येकाचीच गरज आहे. याबाबतीत शहरात राहणार्‍यांची गरज वेगळी आणि ग्रामीण भागात राहणार्‍यांची वेगळी असं होत नाही.
पावसाळा आला की पाण्याच्या समस्या आणि त्याला जोडून साथीचे आजार डोकं वर काढतात. विशेषत: शाळेत जाणारी मुलं, लहान बाळांनी दवाखाने भरून जातात. डॉक्टर औषधांबरोबर शुद्ध पाणी पिण्याचं पथ्यं लिहून देतात.
शहरी भागात आता बहुतांश घरात पाणी शुद्ध करण्यासाठी वॉटर प्युरिफायर  बसवली जातात. ही वॉटर प्युरिफायर म्हणजे शुद्ध पाणी असं एक समीकरण रुढ झालं आहे. त्यामुळेच जे कोणी ते वापरत नाही त्यांना आपण शुद्ध पाणी पितच नाही, असंही वाटू शकतं.
आज 
संशोधनांनी आणि त्यातून शोधलेल्या यंत्रांनी आपल्या  दैनंदिन 
आयुष्यात जाणवणार्‍या प्रत्येक समस्येवर उत्तरं शोधली आहेत.  त्यातूनच अनेक यंत्र आज आपल्यासमोरच्या समस्या चुटकीसरशी सोडवत आहेत. पण  बाजारात  मिळणार्‍या रेडिमेड मशनरींनी आपले प्रश्न सुटत असतीलही; पण ही आणि फक्त हीच मशनरी म्हणजे उपाय नाही. म्हणजे हेच बघा की घरात बाजारातली वॉटर प्युरिफायर्स आणल्याशिवाय आपल्याला शुद्ध पाणी प्यायला मिळणारच नाही असं जर वाटत असेल तर आपण घरच्या घरी करता येणार्‍या उपायांना सरळ सरळ नाकारतोच ना! 
शुद्ध पाणी ही गरज डोळ्यासमोर ठेवून घरच्या घरी काय करता येतं हे पाहिलं तर सोप्पे उपाय तर सापडतातच, पण हे उपाय घरोघरी सहज करता येतात. हे उपाय वापरले तर घरात बाजारातली वॉटर प्युरिफायर्स नसली तरी शुद्ध पाणी मिळण्याची खात्री असते.
 
साठवणे आणि निवळणे
 
पाणी भांड्यात गाळून, साठवून स्थिर ठेवल्यानंतर काही वेळ जाऊ दिला तर गाळ खाली बसतो. २४ तास स्थिर ठेवून पाणी वापरल्यास त्यातले ९0 टक्के जंतू नष्ट झालेले असतात. तुरटी फिरवून ही क्रि या लवकर होते. ही सर्वात स्वस्त व सोपी पद्धत आहे. पण पावसाळ्यात विशेषत: साथीच्या  आजारांच्या काळात मात्र पाण्याचं रासायनिक शुद्धीकरण केलेलंच बरं. पाणी साठवून, निवळून औषध टाकलं तर आणखी चांगलं.
 
पाणी उकळण्याचा नेहमीचा पर्याय
 
पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गॅसवर उकळायला ठेवावं. पाण्याला एकदा उकळी फुटल्यानंतर पुढे किमान पाच मिनिटं पाणी उकळत ठेवावं. पाणी शुद्ध करण्याचा हा सोपा आणि खात्रीचा पर्याय आहे. पण घरात जर जास्त सदस्य असतील तर हा उपाय मात्र  किफायतशीर राहत नाही. आणि म्हणूनच हा उपाय सगळ्यांना परवडण्यासारखा नाही.  
 
शेवग्याच्या बिया आणि शुद्धीकरण
 
तुरटीच्या ऐवजी शेवग्याच्या बियांची पूड वापरून पाणी निवळता येतं. तुरटी ही आरोग्याला काही प्रमाणात हानिकारक असल्यामुळे शेवग्यांच्या बियांचा वापर जास्त निर्धोक आहे. यासाठी प्रथमत: वाळलेल्या शेवग्याच्या शेंगा घेऊन  त्यातील बिया काढून घ्याव्यात. बियांची टरफलं काढून घ्यावीत. टरफलं काढल्यानंतर सफेद दिसणार्‍या बियांची बारीक पावडर करून घ्यावी. पाणी स्टीलच्या किंवा तांब्याच्या भांड्यात घ्यावं. साधारणत: १0 लिटर पाण्यासाठी १५ ते २0 बियांची पावडर करून ती हळुवार पाण्यात टाकावी. जर पाणी गढूळ/खराब दिसत असेल तर बियांच्या पावडरचं प्रमाण वाढवावं. बियांची पावडर टाकल्यानंतर पाणी एक तासानंतर गाळून घ्यावं.
 
रासायनिक शुद्धीकरण
 
ब्लिचिंग पावडर वापरून पाणी निर्जंतूक करता येतं. हा उपाय मुख्यत: ग्रामीण भागात हमखास करावा. कारण गावागावात आजही घरोघरी नळ नाही. त्यामुळे नद्या, तलाव हेच पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. यासाठी क्लोरीनच्या गोळ्य़ा किंवा पातळ औषध मिळतं. गोळ्य़ांच्या पाकिटावर किंवा औषधांच्या बाटलीवर किती पाण्यात किती रसायन मिसळायचं हे प्रमाण दिलेलं असतं. औषध किंवा गोळी टाकल्यानंतर ते पाणी सुमारे अध्र्या तासानं वापरावं.
 
जंतुनाशक द्रावण
 
औषध किंवा गोळी नसल्यास क्लोरिन द्रावण तयार करता येतं. ब्लिचिंग पावडरपासून जंतुनाशक द्रावण तयार करता येतं.
एका तांब्यात एक लिटर पाणी घ्यावं. त्यात व्यवस्थित साठवलेली २00 ग्रॅम ब्लिचिंग पावडर मिसळावी. ही ब्लिचिंग पावडर ग्रामपंचायत किंवा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्याकडे उपलब्ध असते. पाणी चांगलं ढवळावं. आणि पाच मिनिटं न हलवता ठेवावं. हे मिश्रण एका प्लास्टिकच्या बाटलीत गाळून भरावं. न विरघळलेली पावडर तळाशी ठेवून द्रावण वेगळ्य़ा बाटलीत भरावं. बाटली बंद करून ठेवावी. ही बाटली दोन दिवस वापरता येते. 
या द्रावणाचं पाच मिली मिश्रण (एक मोठा चमचा) एक बादलीभर पाण्यात घालावं व चांगलं ढवळावं. हे पाणी अध्र्या तासानंतर वापरावं. जंतुनाशक द्रावणाची बाटली परत घट्ट बंद करून ठेवावी. नाहीतर त्यातील क्लोरीनचा वायू निघून जातो आणि ते निरुपयोगी होतं.   आपल्यासोबतच आपले शेजारीपाजारी राहणारी कुटुंबंही हेच द्रावण वापरू शकतात.
 
पाणी शुद्ध करणारं हातानं चालणारं मशीन 
 
आधुनिक पद्धतीमध्ये फिल्टर वापरून पाणी स्वच्छ केलं जातं; पण त्यासाठी विजेचा वापर करावा लागतो. परंतु  ‘सायन्स फॉर सोसायटी’च्या तरुणांनी पाणी स्वच्छ करण्याचं एक छोटं यंत्र संशोधन करून बनवलं आहे. या  यंत्रात पाणी शुद्ध करण्यासाठी विजेचा वापर करावा लागत नाही. शिवाय मुलंही ते सहज हाताळून पाणी शुद्ध करू शकतील इतकं ते सहज, सोयीचं आणि मजा आणणारं आहे. या यंत्रातून पाणी काढायचं असल्यास उपकरणाला एक हॅण्डल बसवलेलं असतं. ते फिरवलं की शुद्ध पाणी मिळतं.
नेहमीच्याच फिल्टरसारखं हे उपकरण. ते तयार करताना काही वेगळं तंत्रज्ञान वापरलेलं नसतं. फक्त विजेच्या ऐवजी हातानं ते हॅण्डल फिरवायचं आणि पाणी शुद्ध करायचं. ‘अल्ट्रा हेल्थ’ नावाचं हे उपकरण म्हणजे मुलांना हसत खेळत शुद्ध पाणी मिळण्याचं तंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. एक तास पंप फिरवून एक लिटर शुद्ध पाणी यातून मिळतं. इतक्या सोप्प्या तंत्राच्या मदतीनं तयार केलेलं हे उपकरण खरंतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी ठेवलं तर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा घेता येईल.

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.