- माधवी वागेश्वरी

हॉलिवूडच्या मायावी नगरीतलं एक जोडपं. हॉलिवूडच्या सुवर्णकाळात शंभरहून अधिक सिनेमांसाठी या दोघांनी काम केलं.या दोघांच्या ६० वर्षांच्या समृद्ध सहजीवनावरचा माहितीपट जगण्याविषयी सकारात्मक ऊर्जा देतो आणि नात्याची एक खास गोष्टही सांगतो.. . 'श्रेक' हा मुलांचा आवडत्या गोंडस राक्षसाचा अ‍ॅनिमेशनपट. यातील राजा आणि राणीचं नाव हॉलिवूडमधील खऱ्या जोडप्याच्या प्रेमकथेवरून प्रेरित आहे, ते म्हणजे हेरोल्ड आणि लिलियन. 
हॉलिवूडच्या मायावी नगरीत ६० वर्षांचं समृद्ध सहजीवन जगणाऱ्या स्टोरीबोर्ड आर्टिस्ट हेरॉल्ड आणि फिल्म रिसर्चर लिलियन यांच्यावरचा ‘हेरोल्ड आणि लिलियन : अ हॉलिवूड लव्हस्टोरी’ हा माहितीपट म्हणजे उत्कृष्ट ह्युमन डॉक्युमेंटेशन आहे. वर्ष २०१५ मधील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा माहितीपट सर्वप्रथम दाखवला गेला आणि नंतर जगभरातील सर्व महत्त्वाच्या फिल्म फेस्टिव्हल्समध्ये गाजत राहिला. जगण्याविषयी सकारात्मक ऊर्जा देणारा, सगळी मरगळ झटकून आपल्या शिडकाव्यानं प्रसन्नपणा देणारा असा हा माहितीपट आहे. 
आॅस्कर नामांकित दिग्दर्शक डॅनीयल रिम यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केला आहे. या दिग्दर्शकानं हॉलिवूडमध्ये पडद्याआड काम करणाऱ्या आणि सिनेइतिहासात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या माणसांवर डॉक्युमेंटरीची ट्रायोलॉजी बनवली आहे. यातील पहिली आहे- ‘द मॅन आॅन लिंकन नोज’ (यासाठी त्यांना वर्ष २००० मध्ये आॅस्कर नामांकन मिळालं होतं). दुसरी आहे- समथिंग इझ गॉना लिव्ह आणि तिसरी डॉक्युमेंटरी म्हणजे- हेरोल्ड आणि लिलियन : अ हॉलिवूड लव्हस्टोरी’. 
हेरॉल्ड मिशेलसन (जन्म- १५ फेब्रुवारी १९२०, मृत्यू- २ मार्च २००७) हे हॉलिवूडमधील अत्यंत महत्त्वाचे स्टोरीबोर्ड आर्टिस्ट होऊन गेले. त्यांनी प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डिरेक्टर म्हणूनदेखील काम केलं होतं. १९४० ते १९९० अशी पन्नास वर्षं त्यांनी स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं. त्यांनी स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून ज्या सिनेमांची यादी पाहिली- ‘टेन कमांडमेंट्स’, ‘बेन - हर’, ‘स्पार्टाकस’, ‘वेस्ट साइड स्टोरी, ‘द बडर््स (आल्फ्रेड हिचकॉकची फिल्म), ‘क्लिओपात्रा’, ‘वू इज अफ्रेड आॅफ व्हर्जिनिया वूल्फ’ आणि कितीतरी, तर लक्षात येईल की त्यांनी किती उच्च दर्जाचं काम केलेलं आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट पडद्यावर सिनेमा कसा दिसणार आहे याचं अचूक रेखांकन करणारा असतो. आजकाल कॉम्प्युटरवर काम केलं जातं. पण हेरॉल्ड मिशेलसन यांचं हातानं केलेलं काम केवळ लाजवाब होतं, असं या क्षेत्रात काम करणारे महत्त्वाचे लोक सांगतात. मुळात चित्रकार असेलेले हेरॉल्ड यांना सिनेमा या माध्यमाची उत्तम समज होती आणि त्यातूनच ते सातत्यानं काम करू शकले. 
लिलियन मिशेलसन (जन्म- २१ जून १९२८) यांनी फिल्म संशोधक म्हणून उत्तम कामगिरी बजावलेली आहे. त्यांनी हॉलिवूडमधील सर्व महत्त्वाच्या फिल्म्ससाठी संशोधक म्हणून काम केलेलं आहे. सिनेमासाठी अभ्यास करावा लागतो. ऐतिहासिक सिनेमा असो वा गँगस्टरवरचा सिनेमा नाहीतर अगदी एखादी प्रेमकथाही. सिनेमातील प्रत्येक गोष्ट विश्वसनीय असली पाहिजे, त्यातील प्रत्येक संदर्भ वास्तवाला धरून असला पाहिजे यासाठी लिलियन यांनी प्रचंड कष्ट केले. विशेष म्हणजे, उत्तम संसार सांभाळत ही बाई संदर्भ सापडावा म्हणून आकाश-पाताळ एक करायला मागे-पुढे पाहत नाही अशा जिद्दीची आहे. एका गँगस्टर सिनेमासाठी ती थेट एका खऱ्याखुऱ्या वॉण्टेड गँगस्टरला भेटायला गेली होती. 
तर अशा दोन माणसांची ‘लव्हस्टोरी’ या डॉक्युमेंटरीत दाखवली आहे. हॉलिवूडच्या सुवर्णकाळात १०० हून अधिक सिनेमांसाठी या दोघांनी काम केलं आहे. त्यांना हॉलिवूडमध्ये ‘द हार्ट आॅफ हॉलिवूड’ असं म्हटलं जातं. ते किती खरं आहे याचा प्रत्यय ही डॉक्युमेंटरी पाहून येतो. नेहमीच्या धाटणीप्रमाणे यात मुलाखती आहेत, या दोघांचे विविध टप्प्यातील फोटो आहेत, काही व्हिडीओ क्लिप्स आहेत. पण डॉक्युमेंटरीचं कथन स्टोरीबोर्डच्या रूपात केलं आहे, ते फारच सुंदर झालं आहे. ते बघायलाही अतिशय मजेशीर वाटतं. विशेष म्हणजे, बघताना हे ‘फिक्शन’ नाही तर खरंखुरं घडलं आहे याची जाणीव झाली की फारच बरं वाटतं. 
या डॉक्युमेंटरीत लिलियन एके ठिकाणी म्हणतात, ‘लोकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता, की हॉलिवूडमध्ये राहून तुमचं लग्न कसं टिकलं, तेही ६० वर्षं! सिनेधंद्याकडे अजूनही ‘त्या तशा’ नजरेनं पाहिलं जातंच. लफडे करणाऱ्या लोकांचा धंदा अशी चर्चा दबक्या आवाजात सुरूच असते. सिनेधंद्यातसुद्धा कुटुंबवत्सल माणसं असतात यावर अजूनही आपला विश्वास बसत नसेल तर आपलं काहीतरी चुकतं आहे. सिनेमा उद्योगातदेखील आपल्यासारखीच हाडामांसाची माणसं असतात, त्यांना त्यांचं खासगी आयुष्य असतं, नातेवाईक असतात, मित्र-मैत्रिणी असतात, आपल्यासारखीच सुख-दु:खं असतात, तेसुद्धा आपल्यासारखे रडतात, घाबरतात आणि आपल्यासारखे हसतातसुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे. सारखं त्यांचं सगळं काही चव्हाट्यावर आणण्याची गरज नसते.’
या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलामुलींसाठी तर हेरोल्ड आणि लिलियन आपले आजोबा-आजी वाटतील. विशेषत: जेव्हा आपण या क्षेत्रात काम करत असताना आपल्याकडे लोक जर ‘त्या नजरेनं’ पाहतात तेव्हा तर खास करून त्यांचा आधार वाटतो, इतकी ऊब या डॉक्युमेंटरीमध्ये आहे.

 


(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)  madhavi.wageshwari@gmail.com