- माधवी वागेश्वरी

सिनेमाचं झाड अंधारात बहरतं.कुठून कुठून आणलेली माणसं आणि त्यांच्या गोष्टी आपल्या आयुष्यात पेरतं!...आणि या झाडाखाली एखादी बाई बसते, तेव्हा?
 

 मी इयत्ता तिसरीत असेन तेव्हाची एक आठवण. दुपारची भाजकी उन्हं बाहेर पडली होती. सागवानी छताच्या थंडगार वाड्यात घरातले पहुडले होते. सारं काही निवांत आणि शांत. आईसुद्धा ओसरीवर सतरंजीवर निजली होती. मला जवळ घेत तिनं तिच्या गुबगुबीत दंडाची उशी मला करून दिली होती. पण मला झोपच येईना. नुसतीच तिच्या खूप जवळ झोपून तिचा चेहरा पाहत होते. तिचा श्वास ऐकत होते. मिटलेल्या डोळ्यांतील तिची बुबुळं इकडे तिकडे फिरून मग हळूहळू झोपी गेली, पण मी टक्क जागी. उठले. आधी टीव्हीचा आवाज गोल छोटं बटन फिरवून पूर्ण बंद केला आणि मग टीव्ही सुरू केला. टीव्हीवर एक सिनेमा लागला होता. त्या सिनेमाच्या दृश्यांखाली इंग्रजीत लिहून येत होतं. त्यामुळे सिनेमाला आवाजाची गरज नव्हती. 


त्या सिनेमातील दृश्य आजही मी विसरू शकत नाही. दोन बहिणी. गर्द जंगलात उभ्या आहेत. एक बहीण स्तब्ध उभी. दुसऱ्या बहिणीच्या हातात पाण्याची कळशी. ती बहिणीच्या अंगावर पाणी ओतते आणि त्या बहिणीचं रूपांतर एका सुगंधी फुलाच्या झाडात होतं. मी डोळे विस्फारून पाहतच राहिले. पुढे त्या सिनेमात त्या बहिणीचं गुपित कळतं. मग झाड झालेल्या तिच्या फांद्या तोडल्या जातात. तिला खूप त्रास होतो. अर्धवट देहरूपी खोडातील तिच्यावर तो सिनेमा संपला होता. सिनेमा संपल्यावर वेगळं वाटलं होतं. 


- तो गिरीश कर्नाडांचा ‘चेलुवी’ नावाचा कन्नड सिनेमा होता. एका कन्नड लोककथेवर आधारित. सोनाली कुलकर्णीनं त्या झाड होणाऱ्या मुलीची भूमिका केली होती. या सिनेमानं माझ्या मनावर नकळतपणे सिनेमा नावाच्या अश्वत्थाचं बीज रु जवलं. 
या बीजाची ठळक जाणीव झाली ती पुण्याच्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या थंडगार सभागृहात पाहिलेल्या इंगमार बर्मनच्या ‘वाईल्ड स्ट्रॉबेरीज’मुळे. या सिनेमातील स्वप्नदृश्यं ठरवूनही विसरता येत नाहीत. 


पुढे जसजसा जागतिक सिनेमा पाहू लागले तसतसा शिकण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले आहे. तेव्हा जाणवतं की त्या झाडानं आता मुळं धरली आहेत माझ्या खोलवर. सिनेमा नावाच्या झाडाला गरज असते अंधाराची. ते काळोखात बहरतं. ते तुमच्याकडून शांत मनाची अपेक्षा करतं. तुम्हाला दृश्य आणि ध्वनीच्या साहाय्यानं एका अनुभवात संक्रमित करत जातं. हे संक्र मण आपण समजू शकलो तर आपलं आतलं सिनेमाचं झाड खोलवर पसरू लागतं. या झाडाच्या रंध्रारंध्रातून एका आयुष्यात घेता येणार नाहीत इतके अनुभव आपण घेऊ शकतो. 


- या झाडाच्या पायथ्याशी बसून एक संवेदनशील शहाणपण मिळवण्याचा प्रयत्न या लेखमालेतून करीन म्हणते. या जगात काही थोर कलावंतांनी सिनेमा मौजमजेच्या आणि आर्थिक हिशेबाच्या पुढे नेला. बर्गमन, तार्कोव्हस्की, कुरोसावा, ओझू, कियोरास्तामी, सत्यजित रे अशा कितीतरी लोकांनी सिनेमातून ‘कोहम’चा शोध घेत आधुनिक अध्यात्माचे जणू प्रयोग केले आहेत. 
या प्रयोगात ‘बाई’ कुठे आहे? माजघरातून बाहेर पडून पारावर येऊन बसायला वेळच लागतोय तिला. काही बायका तर आजही माजघरातच अडकल्या आहेत. ज्या पारावर पोहोचल्या, त्या झगडत आहेत. संघर्ष करत आहेत. 
विद्यार्थिदशेत अर्जुनाला विचारलं होतं, ‘तुला काय दिसतं?’ हा प्रश्न बाईला कधी विचारलाच गेला नाही. पण बाईनं आता कोणाची वाट पाहत बसण्यापेक्षा ‘मला काय दिसतं?’ हा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे. या प्रश्नाचा वेध ती या सिनेमा नावाच्या माध्यमातून नक्कीच घेऊ शकते. 
सिनेमाची निर्मिती हे आजही पुरुषप्रधान क्षेत्र आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सिनेमे असो किंवा शंभरी गाठलेला भारतीय सिनेमा, सिनेमानिर्मितीचं पुरुषीपण काही गळून पडत नाही.
सिनेमाचा आशय, कला म्हणून त्याकडे बघण्याची समज, सिनेमा एक अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून त्याच्या शक्यता पाहता येणं अशा परिप्रेक्षातून बाईला सिनेमाचं आकलन कसं होतं याकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. हे दुर्लक्ष का केलं जातं? यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत आहेत? खरंच बाईची चित्रपट माध्यम समजून घेण्याची क्षमता कशी आहे? या सगळ्यात तथ्य किती आणि बनवाबनवी किती? - हे शोधणं रंजक ठरेल.
त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, सिनेमाचं बोट धरून आपण जगभरातल्या बायकांच्या जगात फिरून येऊ शकू, त्यांच्या त्वचेत शिरून त्यांचं जगणं अनुभवू शकू.
आजचं हे गुंतागुंतीचं जग बाईला कसं दिसतं? तिला काय प्रश्न पडतात आणि त्याची उकल ती सिनेमासारख्या माध्यमातून कशी करते? तिच्या डोळ्यांवर पुरु षी नजरेचा प्रभाव कसा आहे? - हेही शोधून पाहू!!
खरंच, आपण बघू लागलो की किती आणि काय काय दिसू लागतं. त्या दुपारी आईचा इतका जवळून पाहिलेला चेहरा किती वेगळा दिसला होता आणि नंतर ‘चेलुवी’ सिनेमातून मिळालेला आणि आजही व्याकूळ करून सोडणारा त्या झाडाचा गंध!! तो गंध या सदरातून दरवळावा यासाठी ‘तिच्या सिनेमाच्या’ आटपाट नगराची गोष्ट मी सांगू पाहणार आहे. या साठा उत्तराच्या कहाणीत तिला किती प्रश्न पडतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करू पाहणार आहे.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत. madhavi.wageshwari@gmail.com)