वैद्य विनय वेलणकर

मेदोरोग किंवा स्थौल्य ही सध्या समाजाला भेडसावरणारी मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस या विकाराचं प्रमाण वाढत आहे. काही व्यक्तींमध्ये जन्मजात ही विकृती पाहायला मिळते. आनुवंशिकता यामध्ये असते; परंतु व्यायामाचा अभाव, दिवसा झोपणं, कफवर्धक आहार जास्त घेणं, स्निग्ध आणि मधुर म्हणजे गोड पदार्थांचं अतिसेवन यामुळे मेद वाढण्यास मदत होते. वारंवार खाण्याची सवय असणं, बैठा व्यवसाय यासारख्या कारणांमुळे स्थौल्य पाहायला मिळतं. शरीरातील अंत:स्त्रावी ग्रंथींच्या स्त्रावांच्या असंतुलनामुळे सुद्धा हा विकार झालेला पाहायला मिळतो. उदा. थायरॉईड ग्लॅण्ड, पिट्युटरी ग्लॅण्ड, सुप्रारिनल ग्लॅण्ड, टेस्टेस यासारख्या ग्रंथींच्या विकृतीमध्ये स्थूलता वाढलेली पाहायला मिळते. सध्या हायपोथायरॉईडीजमचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
प्रोटीन पावडर, चॉकलेट्स, कॅडबरी, शीतपेय यांचं अतिरेकी सेवन आणि वेफर्स, मॅगी, चायनीज फूड यासारख्या पदार्थांना मिळालेली वा मुद्दाम मिळवून दिलेली प्रतिष्ठा याला कारणीभूत आहे. बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, आंबवून केलेले पदार्थ, चीज, पनीर, बटर यासारख्या पदार्थांचं अतिरेक सेवन आणि हे पदार्थ खाल्ल्यानं मिळणारी विकृत सामाजिक प्रतिष्ठा त्याला कारणीभूत आहे. अतिद्रव पदार्थ सातत्यानं घेऊ नयेत असं आयुर्वेद सांगतो. परंतु समाजात या उलट सर्व घडते आहे. पाणीसुद्धा पचवावं लागतं हे सुद्धा अनेकांना माहीत नसतं. उशिरा उठण्याची पद्धत आणि रात्री उशिरा जेवण करण्याची पद्धत किंवा अनिवार्यता या दोन्ही सवयीसुद्धा तितक्याच घातक आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून स्थौल्य किंवा मेदोरोग बळावलेला पाहायला मिळतो. शरीराची जाडी वाढायला लागते.

परिणाम?
काम करण्याची क्षमता कमी होते. थोडी हालचाल केली तरी दम (श्वास) लागतो. अतिस्वेदप्रवृत्ती होते. तहान जास्त लागते. झोप जास्त येते. वारंवार भूक लागते, त्यामुळे व्यक्ती सतत खात राहाते. या सर्वांमुळे पुन्हा वजन वाढतं. शरीराच्या स्नायूंना शिथिलता येते, शरीरास घाम जास्त आल्यामुळे दुर्गंधी येते. प्रामुख्यानं पोट, स्तन, नितंब या भागात मेद जास्त साठल्यामुळे या अवयवांची वाढ होते. अंगाला सूज येते. मैथूनशक्ती कमी होते आणि इच्छासुद्धा कमी होते. शुक्र किंवा वीर्याचा ºहास होतो. अनुत्साह किंवा आळस वाढतो. त्वचा विकार, मधुमेह, ह्रदयरोग यासारख्या व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. हे रुग्ण अल्पायुषी असतात.

काय करावं? काय टाळावं?
‘नि:सुखतं सुखायच’ असं सूत्र आयुर्वेदात आलं आहे. याचा अर्थ उद्याच्या सुखासाठी दु:ख सहन करा म्हणजे वजन कमी होतं. त्यासाठी हे करून पाहता येईल..
१) सकाळी लवकर उठण्याची सवय, मर्यादित आणि वेळेवर जेवण, रात्री सूर्यास्तानंतर भोजन नाही हा नियम करावा. सतत गरम पाणी प्यावं. भाजके पदार्थ खावेत जेणे करून वजन वाढत नाही.
२) सतत सुंठ आणि नागरमोथा टाकलेलं पाणी (गरम) प्यायल्यास चांगला फायदा होतो. आहारात ज्वारी, नाचणी, मका यांच्या भाकरीचा वापर करावा.
३) गहू बंद करावा. गव्हामुळे वजन वाढतं.
४) मूग, मसूर, कुळीथ यासारख्या कडधान्यांचा वापर करावा.
५) जुन्या तांदळाच्या कण्यांची पेज किंवा कडधान्यांचं कढणं (सूप) यांचा वापर करावा.
६) ८-१५ दिवस नुसतं मुगाचं कढणं घेऊन राहिल्यास १५ दिवसांत दोन ते अडीच किलो वजन कमी होतं.
७) साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिराच्या लाह्या यावर ८-१५ दिवस राहिल्यास चांगला उपयोग होतो.
८) नुसता उकडलेला दुधी सकाळ-संध्याकाळ २५०-३०० ग्राम उकडून त्यात नुसतं सैंधव मीठ, धने, जिरे, काळीमिरी लावून खाल्ल्यास वजन चांगलं कमी होतं.
९) नित्य व्यायाम करणं आवश्यक आहे. यामध्ये चालणं, धावणं, पोहणं, सूर्यनमस्कार, योगासनं, प्राणायाम यासारख्या व्यायाम प्रकाराचा समावेश व्हावा.
१०) सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून सूर्यनमस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे शरीरातील आवश्यक मेद कमी होऊन लवचिकता वाढते. वरील सर्व लक्षणं कमी होतात. चालण्यामुळे फक्त पायांना व्यायाम होत असल्यामुळे वजनात काही फरक पडत नाही.
११) स्नानापूर्वी अंगाला तिळाचं तेल लावून स्नान करणं आणि अंघोळीच्या वेळी अंगाला दिवाळीत येणारं उटणं लावून स्नान केल्यानं वजन कमी होतं.
१२) गाईच्या शेण्या (गोवºया) जाळून त्याची राख अंघोळीच्या वेळी अंगाला चोळल्यास वजन कमी होतं.
१३) गोमूत्र किंवा गोमूत्र अर्क रोज सकाळी ४-४ चमचे घेतल्यास वजन कमी होतं. आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, त्रिफळादिवटी, पुनर्नवासव, गोमूत्रासव, सूक्ष्म त्रिफळा, मेदोहर गुग्गुळ यासारख्या औषधांचा उपयोग तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानं घ्यावा.

(लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत.)