- यशोदा वाकणकर

डिसेंबर महिना संपत येतो आणि आपण नवीन वर्षाची वाट पाहू लागतो. आपण सतत कसली ना कसली वाट पाहत असतो. कशा ना कशासाठी आतूर असतो. उत्सुक असतो. आणि म्हणूनच पुन:पुन्हा नव्या उमेदीनं जगू शकत असतो. तसंच होतं डिसेंबरमध्ये. खरंतर १ जानेवारी हा दिवस आधीच्या दिवसासारखाच असतो. तरी आपल्यासाठी तो नवा असतो. आणि आपण त्याकडे नव्या नजरेनं पाहतो, म्हणून तो दिवस आपल्याला नवीन आणि स्वच्छ दिसू शकतो. 


नवीन वर्ष साजरं करणं ही जशी रूळलेली परंपरा, तशीच नववर्षाची प्रतिज्ञा करणं ही अजून एक परंपरा. अनेक जण काहीच प्रतिज्ञाबितिज्ञा करत नाहीत. पण जास्तीत जास्त जण करतात ती व्यायामाची प्रतिज्ञा! जानेवारी महिन्यात आसपासची जिम्स भरून जातात. नियमित जिमला येणाऱ्याला माहीत असतं, की काही काळानं ही गर्दी कमी होणार आहे. त्याची त्याला गंमतसुद्धा वाटत असते. पण तरीदेखील दरवर्षी जानेवारीत जिममधे गर्दी होणं हे अगदी पक्कं ठरलेलं. 


खरंतर फार थंड हवा नसली तरी निदान थोड्याशा थंडीमुळे मनात थंडीचा फील येतो. सकाळी घातलेले पातळ स्वेटर आणि त्यामुळे येणारी मनातली ऊब हे सगळं हवंहवंसं वाटत असतं. ख्रिसमसच्या सुट्या, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन हे संपून जाऊन आपण आता कामाला लागा या विचारात असतो. पण तरीही आपल्याला एक थंडीची सकाळची साखरझोप घ्यावीशी वाटत असते. आपण स्वत:ला बजावतो, ‘चला! आता जोरात कामाला लागा!’ आपण कामाला लागावं, मुलांनी अभ्यासाला लागावं हे टिपिकल जानेवारी महिन्यातलं वातावरण. आज सकाळी गॅलरीत बसून, सूर्योदय बघत चहा घेता घेता हे हिवाळ्याचे आणि नवीन वर्षाचे प्रसन्न विचार मनात चालू होते, तेवढ्यात दाराची बेल वाजली. दार उघडलं, तर माझी मदतनीस, म्हणजेच रोजची कामवाली बाई कुडकुडत उभी. मी म्हटलं, ‘स्वेटर नाहीस का घालत?’ ती म्हणाली, ‘माझ्याकडे नाही आहे स्वेटर.’ मी मनात हळहळले. तेवढ्यात परत बेल वाजली, तर दारात रोजचा कचरा नेणारी बाई उभी होती. तीसुद्धा कुडकुडत उभी होती. मनात आलं, हिच्याकडेही नसणार स्वेटर! मग विचारून दुखवायचं तरी कशाला?


आधी मनात चालू असलेले प्रसन्न हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे विचार मागे पडले. आणि या दोन्ही बायकांकडे स्वेटर्स नाहीत, यावर विचारचक्र सुरू झालं. आवरून झाल्यावर बाहेर पडले आणि या दोघींसाठी दोन स्वेटर्स खरेदी केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या बायका आल्यावर त्यांना ते स्वेटर्स भेट दिले. दोघींच्याही चेहऱ्यावर खूपच आनंद पसरलेला दिसला. त्यांनी तो व्यक्तही केला. पण खरी लक्षात राहण्यासारखी घटना त्याच्या नंतरच्या सकाळी घडली. नेहमीप्रमाणे सात वाजता बेल वाजली. दार उघडले, तर कामवाली बाई दारात विनास्वेटरची कुडकुडत उभी. आणि तिच्या नंतर आलेली कचरावाली बाईसुद्धा विनास्वेटरची कुडकुडत! मला मनातून खूप आश्चर्य वाटलं. पण मी काही बोलले नाही. कारण आपण कुणाला काही भेट देतो, ते कसं वापरावं ते त्यानं ठरवावं, असं मला वाटतं. पण त्या दोघींनीही आपणहून खंतावत, अपराधीपणानं मला कारणं सांगितली. कामवाली बाई म्हणाली, ‘अहो ताई, माझी मुलगी रोज सकाळी शाळेत जाते. तिला घालायला दिला स्वेटर!’ कचरावाली बाई म्हणाली, ‘ताई, तुम्हाला माहीतच आहे, माझ्या नवऱ्याला पॅरालिसिस झालाय! त्यांना खूप थंडी वाजत होती, म्हणून त्यांना घालायला दिला स्वेटर!’ 
बाहेरचं दृश्य तेच होतं. उन्हानं लखलखलेली वाळलेल्या गवताची पिवळी टेकडी तीच होती. पुण्यातली गुलाबी थंडी तीच होती. वाफाळलेला चहा, पहाटेची साखरझोप, गॅलरीतली झाडं सगळं काही तेच होतं; फक्त मनातले विचार बदलले होते. वास्तवाचे विचार सुरू झाले होते. 
...पण तरीदेखील पुन:पुन्हा वाटतं की माणूस हा वाट पाहणारा प्राणी आहे. सुखाची आणि तरल संवेदनांची वाट पाहणारा प्राणी. आणि म्हणूनच एक माणूस दुसऱ्या माणसाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणतो, ‘हॅपी न्यू इअर!’

( भटकंती, गायन, लेखन आणि वाचनाची आवड असलेल्या लेखिका पुण्यात ‘एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप चालवतात )