ऋतू कोणताही असो, केस हे जपावेच लागतात. पण थंडीतल्या शुष्क हवेमुळे केस खूपच कोरडे होतात. त्वचा असो की केस, ते कोरडे पडले की समस्या सुरू होतात. 
आणि म्हणूनच थंडीत गरज असते ती केसांमधली आर्द्रता म्हणजेच मॉश्चरायझर टिकवून ठेवण्याची. 
केसांबाबत काही नियम पाळल्यास थंडीतही केस कोरडे आणि रूक्ष दिसत नाहीत. 

केस कोरडे पडू नये म्हणून...

- थंडीत बाहेर पडताना डोक्याला नेहमी स्कार्फ गुंडाळलेला असावा किंवा टोपी घातलेली असावी.

- थंडीत कडक पाण्याचा मोह होतो. केसांवरही कडक पाणी घेतलं तर केस खूपच कोरडे होतात. म्हणून कोमट पाण्यानं केस धुवावेत.

- थंडीत सारखे केस धुतल्यामुळेही कोरडे होतात. आठवड्यातून दोन वेळाच केस धुवावेत. 

- केस धुण्याच्या पाच सहा तास आधी केसांना तेल थोडं गरम करून हलक्या हातानं मसाज करावा.

- केस धुतानाही शॅम्पूमध्ये तेलाचे काही थेंब घालून केसांनं शॅम्पू करावा. केस धुतल्यानंतरही ओलसर केसांवर थोडा तेलाचा हात फिरवला तर केस शुष्क न दिसता छान चमकदार दिसतात. 

- केस हेअर ड्रायरनं कोरडे करू नये. शिवाय केस कुरळे करण्याच्या कर्लिंग आर्यनचाही वापर करू नये. या दोन्ही मशीनमुळे केसातला नैसर्गिक ओलावा गायब होतो. 

- थंडीत केसांच्या मुळांशी खूपच खाज येते. तसेच डोक्यात कोंडा वाढतो. यावर उपाय म्हणून आठवड्यातून दोन-तीनदा केसांच्या मुळांना हलक्या मसाजची गरज असते. शिआ बटर, नारळ, आॅलिव्ह तेल किंवा जोजोबा तेलाचे काही थेंब घेऊन त्यानं केसांच्या मुळाशी दहा-पंधरा मिनिटं मसाज केला तर हिवाळ्याच्या काळात केसांना हवं असलेलं डीप कंडिशनिंग मिळतं.