The glass of the competition ... our original suffocation, no one to see it? | स्पर्धेचा काच...आपलं मूल गुदमरतंय का, हे पाहण्याचं काम कुणाचं?
स्पर्धेचा काच...आपलं मूल गुदमरतंय का, हे पाहण्याचं काम कुणाचं?

शुभा प्रभू-साटम

गुरुग्रामच्या शाळेतील घटना सर्वांना माहिती आहेच. लहान विद्यार्थ्याचा भोसकून खून केला म्हणून त्याच शाळेतल्या एका मोठ्या विद्यार्थ्याला पकडलं गेलं आहे. शाळेची परीक्षा, पेपर, ओपन डे पुढे जावा याकरिता काही घडावं या हेतूनं त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. विश्वास बसणार नाही असं हे कारण. त्या मुलाच्या मनात केवढी भीती आणि दहशत होती परीक्षेची?
अशा गुन्ह्यामागील कारणं अत्यंत साधी आणि अनेकदा बालीश असतात; पण परिणाम मात्र शहारे आणणारे, नृशंस असतात. त्या विद्यार्थ्याचं हे कृत्य भयंकर आहेच, पण येथे प्रथम हा विचार करायला हवा की त्याने हे का केलं? एवढं टोकाचं पाऊल का उचललं? मी येथे त्या कृत्याचं समर्थन मुळीच करत नाही, तर त्यामागील कारणं समजून घेण्याचा प्रयत्न आहे. एवढी भीती त्या मोठ्या विद्यार्थ्याला का वाटली? असे काय होते?
पालकांनी आणि शाळांनी दोघांनाही हा विचार गंभीरपणे करण्याची वेळ आली आहे. अनेक गुन्हे जे घडतात त्यामागे कसली तरी भीती, असुरक्षितता, भय असतं. त्याच्यातून तत्काळ सुटका करण्यासाठी असं टोकाचं पाऊल उचललं जातं.
वास्तविक पाहता शिक्षण हा १०० टक्के आनंददायी अनुभव जरी नसला तरी तो असा दहशती स्वरूपाचा तरी नक्कीच नसावा. गेल्या काही वर्षांत मार्क कमी मिळाले म्हणून, अभ्यास झेपत नाही म्हणून, ताण असह्य झाला म्हणून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आढळतात. सर्व वयोगटातील आणि परीक्षेच्या निकालाच्या आधी तर अशा घटना घडतातच.
कुठे चुकतंय आपलं?
मुलांच्या भल्यासाठी, त्यांचं भविष्य उत्कृष्ट व्हावं याकरता पालक मार्कांची, विशिष्ट अभ्यासक्रमाची मुलांवर सक्ती करतात. अर्ध्या अर्ध्या टक्क्याचा हिशेब ठेवला जातो. शाळा पुरत नाही म्हणून कोचिंग क्लास लावले जातात. केजीपासून मुलांना ट्युशन लावणारे पालक आहेत. आपलं मूल अष्टपैलू व्हावं म्हणून बाकीचेही सक्तीचे उपक्रम असतातच. म्हणजे सकाळपासून विद्यार्थी जो घाण्याला जुंपला जातो तो पार रात्रीपर्यंत. आणि हे सर्व त्यांच्या चांगल्यासाठीच करतोय हे पालकांचं कारण तर अत्यंत चूक आहे.
आपल्याला कुणी असं दावणीला बांधलं तर? काय केलं असतं आपण?
शिस्त आणि दरारा, धाक यांच्यात एक धुसर रेषा असते. धाक, दरारा दहशत जेव्हा येते तेव्हा तेथे चुकवण्याची प्रवृत्ती वाढते. कळतही नाही की शिस्तीचा आग्रह, समजावणं संपून सक्ती कुठे सुरू होते ते. लहानपणी मुलं ऐकतात. साधारणपणे पाचवी-सहावीपर्यंत निमूट. तोपर्यंत मार्क पण रग्गड मिळत असतात. पण नंतर पाहिलं तर आढळेल घसरगुंडी सुरू होते. मग पालकांचा त्रागा, चिडचिड धाकदपटशा. मुलांचं उद्धट वर्तन. सगळं सुरू. पालक तुुलना करू लागतात. याचे मार्क, त्याची अ‍ॅडमिशन, अमकी तमकी नोकरी आणि पोस्ट. मुलं धुमसू लागतात. खोटं बोलतात. ते उघडकीला आलं की मग आगीत तेल. त्यात शाळेची, कोचिंगची जोड असतेच. अख्खं घर धुमसतं.
मुलांचं हे वय अत्यंत वेडं असतं. आपला हेतू पालक म्हणून १०० टक्के चांगला असला तरीही त्याचा काच वाटतो मुलांना. त्यातून ती मग मार्ग शोधू पाहतात. ज्यातून गुन्हेगारी स्वरूपाच्या अशा भयंकर घटना घडतात.
मग पालकांनी करायचं तरी काय? कसं वागायचं? अजिबात धाक दाखवायचा नाही का? मुलांवर सर्व सोडून द्यायचं? मुळीच नाही. याचेही मार्ग आहेत, असू शकतात... त्याविषयी पुढील लेखात.

(लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)


Web Title: The glass of the competition ... our original suffocation, no one to see it?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.