- डॉ. मृण्मयी भजक

न आठवड्यापूर्वीचा इंतजार हा लेख वाचून नेहमीप्रमाणेच भरपूर मेल्स आले. त्यात काही वाचकांनी लिहिलं आहे की, त्यांचा बराचसा ‘इंतजार’ हा प्रवासात होतो. रोजच्या रोज दोन तीन तास प्रवास करणारे काही जण होते, तर काहीजण वरचेवर दहा-बारा तासांचा प्रवास करणारे होते. या एवढ्या प्रवासात ‘काय करावं’ असं विचारणारे काही मेल्स होते. ‘प्रवासातली गंमत’ हा विषय डोक्यात कधीचाच घोळत होता. त्याला निमित्त मात्र या मेल्समुळे मिळालं.

खरं तर प्रवासातला वेळ कसा घालवावा? हे आपापल्या आवडीनुसार ठरत असतं. त्यासाठी काही विशिष्ट फॉर्म्युला नाही. सहसा लोक वाचन, गाणी ऐकणं, झोप काढणं, सहप्रवाशांसोबत बोलणं, नुसतं गप्पा ऐकणं, खिडकीबाहेर पाहणं, स्मार्ट फोनवर काहीतरी करत बसणं, बघत बसणं अशा कितीतरी गोष्टी करत असतात. याबाबत आपण खूप काही ठरवूदेखील शकत नाही. कधी कधी आपण शेजारच्याशी गप्पा मारण्याच्या मूडमध्ये असतो; पण शेजारी मात्र गाढ झोपलेला असतो. पण कधी कधी गप्पा अशा रंगतात, ओळखी निघतात की अगदी नातेवाईक, मुलामुलींची लग्न ठरवण्यापर्यंतपण गोष्टी जातात.

रोजचे छोटे प्रवास मात्र वेगळे असतात. आणि रोजच्या त्याच गाडीनं ये-जा करणारी अनेक मंडळी आपल्या ओळखीचीही होतात. मग गाडीतला प्रवास हा प्रवास वाटत नाही. तो होतो गप्पांचा अड्डा, कधी गाण्यांचा ग्रुप, कधी भजनी मंडळ तर कधी याच छोट्या प्रवासात किट्टी पार्टीदेखील होते. एकदा मुंबई-पुणे बसनं प्रवास करताना माझ्या मागच्या सीटवर एक नन बसली होती. मी आत्तापर्यंत कधीच कुठल्या ननशी बोलले नव्हते. मला त्यांच्या आयुष्याबद्दल खूप कुतूहल होतं. मला खूप वाटत होतं की तिच्याशी बोलावं. मागे वळून मी काही जुजबी बोललेही. पण मला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या. मग मी त्या ननलाच विचारलं तसं. जागेची अदलाबदल करून आम्ही दोघी शेजारी शेजारी बसलो. मी ननशी पोटभरून गप्पा मारून घेतल्या. तो प्रवास खरंच अगदी अविस्मरणीय ठरला. असे प्रवासातले अनेक यादगार प्रसंग आपल्या सगळ्यांच्याही वाट्याला येतात. कधी प्रवास संपूच नये, असं वाटावं इतकी सुंदर मैफल जमते. प्रवास छोटा असो वा मोठा तो कसातरी संपतोच; पण खूप खूप कंटाळून तो प्रवास करायचं की, त्या वेळेत काहीतरी छान करण्याचा प्रयत्न करायचा हे मात्र आपणच ठरवायचं. गंमत त्यातच आहे..
(लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत.  drmrunmayeeb@gmail.com)