तुपात पडली साखर : मुलांसाठीच्या जुन्या गाणी-गोष्टींना आनंदी ‘टर्न’ देणारी एक ‘गंमत!’

By ऑनलाइन लोकमत on Mon, January 01, 2018 4:27pm

बाळ घरात आलं की, सगळेच आपल्या लहानपणीची गाणी, बडबडगीतं, गोष्टी त्यांना ऐकवू लागतात. पण त्या गाण्यांतले काही बोचरे, टोचरे शब्द बदलले तर? गोष्टींच्या दु:खी शेवटांना नवे आनंदी वळण दिले तर? मुलांच्या लाडक्या चांदोबाला उपाशी न ठेवण्यासाठी काही युक्त्या करायलाच हव्यात असं सुचवणारी ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी..

- गौरी पटवर्धन घरात बाळ आलं की घरातल्या सगळ्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या लहानपणी ऐकलेली गाणी, कविता, गोष्टी, बडबडगीतं आठवायला लागतात. बहुतेक सगळी लहान बाळं तालासुरातल्या गाण्यांकडे किंवा गोष्ट सांगतानाच्या आवाजातल्या चढ-उतार आणि हावभावांकडे आकर्षित होत असल्यामुळे प्रत्येकजण आपल्याला आठवतील ती गाणी आणि गोष्टी बाळाला सांगायला लागतो. पण ही गाणी, गोष्टी सांगताना आपण त्यांचा पुरेसा विचार करतो का? त्या गाण्याचे शब्द काय आहेत? त्याचा अर्थ काय होतो? याकडे आपण जर लक्ष दिलं तर अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. या गोष्टी काही वेळा गमतीशीर असतात तर काही वेळा चक्क नुकसानकारक असतात. सगळीच गाणी आणि गोष्टी तशा नसतात, पण काही गाण्यांचा आणि गोष्टींचा मात्र आपण नव्यानं विचार केला पाहिजे असं वाटतं खरं. बाळ जरा मान सावरायला लागलं की घरोघरच्या आज्या, मावश्या, आत्या आणि काही ठिकाणचे काका, मामा, दादासुद्धा बाळाला मांडीवर बसवून डोलवायला सुरुवात करतात. आणि आयुष्यातल्या बहुदा पहिल्या बडबडगीताशी बाळाची ओळख होते. डोल बाई डोलाची हाती परडी फुलांची फुलं गेली सांडून छोटी आली भांडून या गाण्याची एकूण लय बाळाला असं डोलवत बसायला अगदी छान आहे यात काही शंकाच नाही; पण त्याचे शब्द? अवघ्या तीन चार महिन्याच्या बाळाला काय सांगतो आपण? तर फुलं गेली सांडून आणि छोटी किंवा छोटू आला भांडून? का बरं असं? ज्या बाळाला अजून हातात काही धड पकडता येत नाही, ज्याच्या बाळमुठीतून बहुतेक सगळ्या वस्तू सांडून जातात त्याला आपण फुलं त्याच्याजवळ राहिली असं म्हणायचं का सांडून गेली असं म्हणायचं? बरं सांडली तर सांडली पण ती फुलं का सांडली? कुठे सांडली? ती परत परडीमध्ये भरून नाही का घेता येणार? का सांडलेली फुलं अशीच सोडून द्यायची? अशी कशामुळे सांडली असतील फुलं? बाळाच्या छोट्याश्या हातातून सुटून गेली असेल का परडी? का कोणाचा चुकून धक्का लागला असेल? काहीही जरी असलं तरी एवढ्या छोट्याशा बाळाला कोणाशीतरी ‘भांडून’ येण्याची आयडिया आपण का बरं द्यायची? ज्या बाळाला अजून हुकमी ‘ब्बा ब्बा ब्बा’ असा आवाजसुद्धा करता येत नाही त्याला काय शिकवायचं तर छोटू आला भांडून? कोणाशी भांडायचं? आणि मुख्य म्हणजे का भांडायचं? यात काहीतरी मूलभूत चुकीचं नाही का वाटत? लहान बाळाला गाणं शिकवायचं तर काहीतरी प्रसन्न, सकारात्मक शिकवावं, तर हे भलतंच काहीतरी! आपण बोललेला प्रत्येक शब्द ते बाळ ऐकत असतं, कुठेतरी मेंदूच्या, मनाच्या कोपºयात साठवून ठेवत असतं. आता त्या सगळ्याचा अर्थ नसेल कळत त्याला, पण त्यातले शब्द तर राहतात ना.. या भांडणाच्या गाण्याच्या पाठोपाठ येतो तो चांदोबा. तमाम बाळांची निसर्गाशी ओळख बहुदा चिऊ काऊ आणि चांदोबा या त्रिकुटानेच होत असावी. संध्याकाळ झाली की किरकिरणाºया मुलाला नादवायचा हक्काचा सोबती म्हणजे चांदोबा. रात्री घरातून बाहेर आलेलं आणि मान वर करकरून चांदोबा न शोधणारं मूल जवळजवळ नसावंच. त्यामुळे अगदी पहिल्या पहिल्या गाण्यांमध्ये चांदोबा येणं तसं अनिवार्यच आहे. अनेक मुलं चांदोबाच्या तालावर झोपतात. छान अंगाईसारखी चाल असलेल्या या गाण्याचे शब्द काय? चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का? लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी मामाच्या वाड्यात येऊन जा, तूपरोटी खाऊन जा तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी! याच्याइतकं तर दुष्ट गाणं नसेल. म्हणजे जो चांदोबा त्याचा त्याचा आकाशात गपगुमान बसून आहे, त्याला अगदी आमंत्रण देऊन बोलावून घ्यायचं, तूपरोटीचं आमिष दाखवायचं आणि शेवटी त्याच्या तुपात माशी पाडायची आणि चांदोबाला उपाशीच ठेवायचं? त्यात पुन्हा लिंबोणीचं झाड करवंदी कसं काय असेल? असले प्रश्न विचारायचे नाहीत. यातली काही गाणी चित्रपटातली असतात, त्यात फक्त चित्रपटातल्या त्या वेळच्या सिच्युएशनचं प्रतिबिंब पडलेलं असू शकतं. अनेक गाणी मुळात लिहिताना किंवा रचताना त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार लिहिलेली असू शकतात किंवा त्या त्या वेळच्या समजुतींचं प्रतिबिंब त्यात पडलेलं असू शकतं. मूळ गाणं ज्यांनी लिहिलं त्यांना मुलांसाठी काहीतरी दु:खी लिहावं असं वाटणं तर शक्य नाही. त्यांनी त्या वेळी काहीतरी तत्कालिक विचार करून गाणं लिहिलेलं असू शकतं. पण आता जर रोज ते गाणं आपल्या बाळासाठी म्हणायचं असेल, तर त्यात थोडेसे आनंददायी बदल आपल्यापुरते करून घ्यायला काय हरकत आहे? हीच गाणी आपण थोडासा बदल करून आहे त्याच चालीत जास्त चांगली करू शकतो का? डोल बाई डोलाची हाती परडी फुलांची फुलं गेली सांडून छोटी आली भांडून यातल्या शेवटच्या दोन ओळी बदलून फुलं लागली फुलायला छोटी लागली डोलायला किंवा फुलं लागली हसायला छोटू लागला खेळायला असं काही करता येईल का? ** चांदोबाच्या गाण्याच्या शेवटी तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी च्या ऐवजी तुपात घातली साखर चांदोबा जेवला पोटभर असं काही केलं तर चालेल का? लहान मुलांना सतत ऐकवण्याची गाणी होता होईल तो दु:खी नसावीत. जे काही म्हणायचं ते छान प्रसन्न असावं. असा विचार करून बघूया का? आर्त आणि खिन्न कविता मोठं झाल्यावर त्यांच्या आयुष्यात येणारच आहेत. पण निदान सगळ्याच गोष्टी स्वप्नातल्या असताना ती स्वप्न अजून छान करूया. आपल्या घरी आलेला चांदोबा आपल्याशी खेळला, आपल्याबरोबर बसून पोटभर जेवला, आपल्या अंथरूणात झोपला आणि पांघरायला त्याचे त्याचे ढग सोबत घेऊन आला ही आयडिया बिचाºया चांदोबाला उपाशी पाठवून देण्यापेक्षा छान नाही का?

(लहान मुलांसाठी नियमित लिहिंणारी लेखिका एका धिटुकल्या लेकीची गप्पीष्ट आई आहे. patwardhan.gauri@gmail.com)

 

संबंधित

हुग्गी आणि चित्रान्न
अया
गोऱ्या हट्टाची काळी बाजू
पॅनकेक
दिवाणखाना

सखी कडून आणखी

पौष्टिक बिस्किटांची देशी रेसिपी
उब्याचे लाडू कसे करतात?
सपाट पोटासाठी काय कराल?
प्लाय फर्निचर करायचंय मग हे वाचा !
दोन व्हीलचेअर गर्ल्सची प्रेरणादायी गोष्ट वाचायला चुकवू नका.

आणखी वाचा