food items in cone | कोनातलं खाणं
कोनातलं खाणं

- भक्ती सोमण

मागच्या आठवड्यात स्टेशनला अचानक मैत्रीण भेटली. वेळ कमी आणि बोलायला भरपूर विषय असल्यानं कॉफी पिण्यापेक्षा पटकन काहीतरी खाऊन पळावं असा झटपट प्लॅन ठरला. एका नवीन सुरू झालेल्या हॉटेलमध्ये बाहेरची पाटी बघून गेलो. बसायला जागा कमी असलेल्या या हॉटेलमध्ये गर्दी अशी दिसतच नव्हती. तिथे सगळेच पदार्थ कोनात मिळणारे होते. हे कोन मैदा, कणीक, मका अशा वेगवेगळ्या पिठांपासून तयार केले होते. आम्ही पिझ्झा आणि सॅलेड घेतलं. पिझ्झा कोनात होता. पिझ्झाचा बेस कोनात कर्न्व्हट केला होता, तर आतमध्ये व्हेज पिझ्झाच्या भाज्या, चिझ असा सर्व मालमसाला होता. चवीला चटपटीत आणि मस्त. तर सॅलेडमध्ये आवडीप्रमाणे सर्व भाज्या, चिज, मसाले याचं कोनात भरलेलं मिश्रण अफलातून होतं. तिथं तर कोनातले सॅण्डविच, गोल डोसा असे काय काय प्रकार होते.
त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी एका मैत्रिणीकडे पार्टीसाठी गेले होते. तिथे तिने वेगळ्या स्टाइलमध्ये पावभाजी केली होती. समोर पाव नव्हतेच. उलट कोनात भरलेली भाजी वरून कांदा पेरून दिली होती. हा प्रकारही नवीन आणि भन्नाट होता. या सगळ्यात सांडण्या- लवंडण्याची भानगडच नव्हती. करायला आणि खायला अतिशय सुटसुटीत.

गेल्या काही महिन्यांपासून अशाप्रकारे कोनात विविध खाद्यप्रकार मिळायला लागले आहेत. त्यात पिझ्झा, पास्ता, सॅण्डविच, वफल्स, फ्रूट सलाद, ब्राऊनी, पुडिंग अशा कितीतरी पदार्थांची भर पडत आहे. असे प्रकार आता अनेकांना आवडायला लागलेत. आतापर्यंत कोनात आइस्क्रीम खातात एवढंच माहीत होतं; पण आता कोन फूड हा नवीनच फंडा लोकप्रिय होतो आहे. याचा थोडा शोध घेतला तर लक्षात आलं की काळाप्रमाणे खाणंही बदलतंय. याविषयी शेफ अजिंक्य रानडे यांच्याशी बोलले असता ते सांगतात, ‘आजच्या धावपळीच्या काळात मीटिंगसाठी किंवा कुठेही जायचं असताना भूक लागली तर शांत-निवांत बसून खाण्याएवढा भरपूर वेळ नसतो. अशावेळी हे कोन फायद्याचे ठरतात. ते कुठेही नेऊन, उभ्या उभ्याही खाता येतात. त्यामुळे आता हा ट्रेण्ड येत्या काळात भरपूर चालणार आहे. तसंच आता भरपूर हॉटेल्स असली तरी तिथे बसायला जागा असतेच असं नाही. तेव्हा अशा छोट्या हॉटेल्ससाठी ‘कोन फूड’ ही अत्यंत फायद्याची संकल्पना आहे. याला फार मजूर लागणार नाही. भांडी, कटलरीची गरज अगदीच कमी आणि कोन दिला की ग्राहकालाही तिथे थांबायची गरज नाही. कोन फूडच्या याच वैशिष्ट्यांमुळे ते आता आणखी लोकप्रिय होणार आहे.’

हे कोन फूड खाण्यासही अत्यंत सुटसुटीत असतात. दाबून भरलेलं सॅण्डविच कितीही हवं असलं तरी ते खाताना किती सांडतं. उलट हे कोन खालून निमुळते आणि बंद असतात. त्यामुळे खाली अजिबात सांडत नाही. व्यवस्थित खाता येतं. थोडक्यात नासाडी नाही.
हे कोनाचे प्रकार घरीही करता येतात. घरच्या पार्टीत, रात्रीच्या जेवणात या कोनात भाजीबरोबर वर आकर्षक सजावट केली तर नावडतीची भाजीही या कोनमुळे पटकन खाल्ली जाईल हे नक्की!


Web Title: food items in cone
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.