फुलांचा स्वर्ग!
फुलांचा स्वर्ग!
- तेर पॉलिसी सेंटर
 
संप्टेंबरचा शेवटचा आठवडा कास पठारावर सुंदर विविधरंगी फुलं फुलण्याचा हंगाम आणि म्हणूनच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये फुलांबरोबर कास पठार पर्यटकांनीही फुलून गेलेलं असतं.
२0१२ साली पश्‍चिम घाटातल्या ३९ स्थळांना जागतिक मानांकन मिळाल्यामुळे कास पुष्प पठार जागतिक पर्यटकांनाही आकर्षित करत आहे.
कास पठारावर पोहोचलं की इथलं बहरलेलं सौंदर्य बघून बघणार्‍यांचं भान हरपतं. फुलांकडे नुसतं बघून बघणार्‍याचं मन भरतचं नाही. इथे पाहिलेलं हे दृश्य नंतर आपल्या आठवणीतूनही कधीच पुसून जायला नको म्हणून येणार्‍या प्रत्येकाला त्या फुलांच्या ताटव्यामध्ये बसून, कधीकधी झोपूनसुद्धा फोटो काढायचे असतात. इथलं सौंदर्य टिपत असताना आपण इथल्या निसर्ग साधन संपत्तीचं नुकसान करतो आहोत याचीही तमा बाळगत नाही.  
‘तेर पॉलिसी सेंटर’तर्फे  कास पठार आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शाश्‍वत विकासासाठी काही कार्यक्रम राबवले जात आहेत, त्यात अर्थातच गावातल्या तरुण -तरुणींचा आणि महिलांचाही सहभाग लक्षणीय असतो. सातारा वन विभागही गावामध्ये एलपीजी गॅस वितरण, सोलर दिव्यांचं वितरण, गुरांसाठी चारा वितरण, युवकांना गाइड प्रशिक्षण अशा सारखे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. या उपक्रमांबरोबरच येणार्‍या पर्यटकांना शिस्त लावणं हा त्यांच्या दृष्टीनं एक महत्त्वाकांक्षी उपक्रम होऊन बसला आहे हे मुद्दाम सांगावंसं वाटतं. ही शिस्त कास पठारावर जाऊन तिथलं विलोभनीय सौंदर्य अनुभवण्याआधी प्रत्येकानं स्वत:ला घालून घ्यायलाच हवी. 
 
काय काळजी घ्याल?
1. कास पठारावर जाण्यासाठी काही शुल्क आकारले जाते ते देण्यासाठी सहजपणे तयार व्हावं त्यासाठी उगाच वादावादी करू नये.
2. मुद्दाम कुंपण घालून सुरक्षित ठेवलेल्या पठारावर कुंपणाखालून अथवा इतर कुठूनही शिरू नये.
3. हल्ली सर्व कॅमेरे उच्च तंत्रज्ञानाने विकसित केलेले असतात त्यामुळे लांबूनदेखील फुलांचे खूप छान फोटो येऊ शकतात. त्यासाठी फुलं तुडवत आतपर्यंत जाण्याची गरज नाही.
4. आपल्याला एखादं फुल कितीही आवडलं तरी ते तोडू नये.
5. आपल्या आजूबाजूचे पर्यटक अशा काही गोष्टी करत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करावं, आपल्याकडची लोकं उलट दुसरा कोणी करत असेल तर आपण का नाही करायचं म्हणून सगळे मिळूनच शिस्त मोडतात.
6. पठार व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, आपल्या जवळचा कचरा वाटेत कुठेही टाकू नका, उलट वाटेत कोणी कचरा टाकला असेल तर तो स्वत:जवळ गोळा करून कचरापेटीत टाकण्याची तसदी घ्या. 
7. कास गावात काही ठिकाणी राहण्याची सोय केली आहे तिथे राहून स्थानिक रहिवाश्यांना मदत होऊ शकते त्या राहण्याच्या सोयींचा लाभ घ्यावा. 
8. सहलीला जाताना खूप खाण्या-पिण्याच्या गोष्टी न्यायच्या व त्या वाटेतच टाकून द्यायच्या असे करण्यापेक्षा सहल ही खाण्याची मेजवानी नसून निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी आहे हे लक्षात ठेवा. 
9. तिथल्या गावकर्‍यांच्या गरजा लक्षात घ्या व आपण त्यासाठी काही करू शकतो का याचा विचार करा व पुन्हा तिकडे जाताना त्या गरजा पूर्ण कशा होतील ते बघा. 
10. कुठल्याही सहलीला जाताना वाटेत आपल्याकडील काही बिया, छोटी झाडं लावता आली तर जरूर लावा. त्यासाठी बियांची बँक आपल्या घरातच तयार करता येईल. आपण वर्षभर जी फळ खातो त्यातल्या बिया फेकून न देता जर साठवून ठेवल्या तर सहलीला जाताना त्या वाटेत टाकून जरी दिल्या तरी त्या आपोआप रुजतात.
11. आपल्या तरुण मुला-मुलींना चिंगम चघळायची सवय असते. अशी सवय असेल तर आपल्या मुलांना तिथे जाऊन चिंगम चघळायचं नाही आणि चघळून ते रस्त्यात टाकायचं नाही याची प्रेमळ वॉर्निंग आधीच द्या. कारण या चिंगममध्ये अडकून अनेक जीवजंतू प्राणाला मुकतात. 
अशा काही छोट्या, पण मोठा परिणाम साधणार्‍या गोष्टी केल्या तर निसर्ग वाचण्याची थोडी तरी आशा आहे अन्यथा  कास पठार आपल्याला फक्त फोटोतच बघावं लागेल. 
खरं तर आज कासचीच नाही तर प्रत्येक पर्यटन स्थळाची आपल्या पर्यटकांकडून हीच अपेक्षा आहे. 

Web Title: Floral paradise!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.