Expiry Date or Chakwa ... If the packed food has expired, then where will you complain? | एक्सपायरी डेटचा चकवा...पॅकबंद डब्यातल्या खाद्यपदार्थांची मुदत संपली असेल तर तक्रार कुठं करणार?
एक्सपायरी डेटचा चकवा...पॅकबंद डब्यातल्या खाद्यपदार्थांची मुदत संपली असेल तर तक्रार कुठं करणार?

ललिता कुलकर्णी

गेल्या आठवड्यात मी मॉलमधून फळाच्या रसाचा डबा घेतला होता. घरी आल्यावर माझ्या मुलानं डब्यावरचं लेबल पाहिलं तर त्याची वापरण्याची मुदत अर्थात एक्स्पायरी डेट उलटून गेलेली होती. आता याबाबत तक्रार कुठं आणि कशी करायची?
- दीपाली मेहता, मुंबई

फळाच्या रसाच्या डब्याची मुदत उलटून गेलेली आहे हे खरं तर थोडी जागरूकता दाखवल्यामुळे वेळीच लक्षात आलं हे बरंच झालं. खाद्यपदार्थांची मुदत तपासून घेणं फार गरजेचं असतं.

यासंदर्भातला कायदा सांगतो की..
पॅकबंद वस्तूंच्या नियमांनुसार (१९७७) आवेष्टित (पॅकबंद) खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर पॅकिंगची तारीख आणि तो किती दिवसात वापरावा ( यूज बिफोर / बेस्ट बिफोर) याची मुदत छापणं बंधनकारक आहे. या मुदतीनंतर किंवा तारखेनंतर तो माल विकणं हा गुन्हा आहे; मात्र तरीही अनेकदा मुदत संपत आलेले खाद्यपदार्थ अगदी सवलतीच्या दरात विकले जाताना दिसतात.

काय करता येईल?
मुदत संपल्यानंतर रसाचा डबा विकलेला आहे याबद्दल प्रथम मॉलमध्ये जाऊन तेथील व्यवस्थापकाकडे तक्रार करायला हवी. तो डबा बदलून घ्यायला हवा. त्याचबरोबर अशा बेकायदा व्यवहारामुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो हे लक्षात घेऊन मॉलच्या कस्टमर केअर विभागाकडे याची लेखी तक्रारही करायला हवी. त्यांचा ई-मेल आयडी तसेच पोस्टाचा पत्ता डब्याच्या वेष्टणावर मिळेल. या मेल / पत्राबरोबर वेष्टणाचे आणि खरेदीच्या पावतीचं छायाचित्रही जोडावं.
वेष्टणावर एक टोल फ्री क्रमांकही छापलेला असतो. त्यावर फोन करून तक्रार केल्यास या तक्रारीचीही नोंद घेतली जाते. याशिवाय अशा प्रकारची नियमबाह्य पद्धतीनं विक्री करण्यावर पायबंद बसावा यासाठी वैध मापनशास्त्र (पूर्वीचे नाव वजन -माप खाते ) विभागाकडेही तक्रार करावी.

पत्ता
नियंत्रक, वैध मापनशास्त्र, प्रशासकीय कुटीर
क्र मांक- ७, फ्री-प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉर्इंट, मुंबई ४०००२१. या पत्त्यावर लेखी तक्रार करता येते.
शिवाय  dclmms_complaints@yahoo.com
या मेल आयडीवर तक्रारीचा मेलही करता येतो.

नुकसानभरपाई कधी?
डब्यातील रस प्यायल्यामुळे कोणाला शारीरिक त्रास झाला असल्यास ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड सिक्युरिटी’ कायद्याखाली ग्राहक नुकसानभरपाईही मागू शकतात. त्यासाठी..
‘आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सर्व्हे क्र . ३४१, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, रिझर्व्ह बँकेसमोर, बांद्रे (पूर्व), मुंबई ४०००५१ या पत्त्यावर पत्रव्यवहार करता येतो.
ऑनलाइन तक्रारीसाठी-
whogmp.mahafda@gmail.com

मॉलमध्ये खरेदी करताना..
सर्वसाधारणपणे मॉलमधील वातावरणच असं असतं की तेथे खरेदी करताना मनालाही छान वाटत असतं. परंतु या वातावरणामुळे काहीवेळा गाफील होऊन खरेदी केल्यानं विशेषत: अनावश्यक खरेदी केल्यानं ग्राहकाचं मोठं नुकसानही होऊ शकतं. ते टाळण्यासाठी थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
१) मॉलमध्ये जाण्यापूर्वी खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी करावी आणि या यादीबाहेरील वस्तूंची खरेदी कटाक्षानं टाळावी. क्रे डिट कार्डच्या साहाय्यानं खरेदी करताना याची विशेष काळजी घ्यावी.
२) किमतीत सूट, मोफत भेटवस्तू, एकावर एक फ्री यासारख्या योजनांचा फायदा घ्यायला हरकत नाही; परंतु घरी नेल्यावर ती वस्तू अडगळीत तर जाणार नाही ना, याचा विचार करावा. अशा वस्तूंच्या वेष्टणावरील माहिती जरूर वाचावी. उदा. खाद्यपदार्थावरील मुदत संपण्याची तारीख अवश्य पाहावी.
३) मॉलमध्ये अनेकदा येणारा अनुभव असा की- वस्तू जेथे ठेवलेली असते तेथे शेल्फवर लिहिलेली किंमत आणि प्रत्यक्ष बिलात लावली जाणारी किंमत यात फरक असतो. याबद्दल विचारले असता शेल्फवरील किंमत बदलण्याचे राहून गेले, सवलतीच्या योजनेची मुदत संपली या सारखी कारणं सांगितली जातात. त्यामुळे बिल बनत असताना ग्राहकांनी लक्ष ठेवावं एखाद्या सवलत योजनेबद्दल काही शंका असेल तर तेथील कर्मचारी वर्गाकडून आधी माहिती घ्यावी आणि मगच खरेदी करावी.

(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्या आहेत.)


Web Title:  Expiry Date or Chakwa ... If the packed food has expired, then where will you complain?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.