-अनुजा पांचाळ

आता सर्वांना गौरी- गणपतीच्या आगमनाचे वेध लागले आहेत. बाप्पाचं आगमन तर अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. सध्या घरोघर चर्चा एकच बाप्पासाठी सुरेखशी आरास करण्याची! आजच्या धावपळीच्या व सर्वकाही इन्स्टंट मिळविण्याच्या जमान्यात बरेचजण आरास सजावटीसाठी  रेडिमेड फुलं, थर्माकोल यांसारखे पर्याय निवडतात; परंतु यंदा थर्माकोल व प्लॅस्टिक वापरावर बंदी असल्यानं आणि ते पर्यावरणास घातक असल्यानंही  त्यांचा वापर आरास करण्यासाठी न करणं हेच उत्तम. 

यासाठी पर्याय म्हणून काही सोपे, कमी खर्चीक, झटपट होणारे, नावीन्यपूर्ण- कलात्मक व पर्यावरणपूरक असे आरास सजविण्याचे प्रकार सहज करता येतील. 

मुख्य म्हणजे ते वेळखाऊ नाहीत. हे सजावटीचे प्रकार अगदी बाप्पाच्या आगमनाच्या आदल्या दिवशीही झटपट करता येतील.  

कृत्रिम फुलांची तोरणं

इको-फ्रेण्डली पर्याय म्हणून अनेकजण गौरी-गणपतीसाठी नैसर्गिक फुलांची आरास करतात; परंतु फुलं फार काळ टिकाऊ नसल्यानं ज्यांच्याकडे बाप्पा दीड दिवसांपेक्षा जास्त मुक्काम करणार आहेत त्यांना नैसर्गिक पानाफुलांची आरास करणं शक्य होत नाही. त्यासाठी पर्याय आहे कृत्रिम फुलांचा! यामध्ये विविध ओरिगामी पद्धतींची फुले-पानं, टिंटेड पेपरची गुलाबाची फुलं, जापनीज पद्धतीची कुसुदामा फुलं, पतंगी कागदापासून झेंडूची फुलं, मक्याच्या कणसाच्या सालीपासून फुलांचा गुच्छ, लसूण पाकळ्यांच्या सालींना रंगवून त्यापासून नाजूकशी रंगीबेरंगी फुलं, लोकरीपासून गोंडे, टिशू पेपरची फुलं इ. नानाविध कृत्रिम फुलांची तोरणं बनवून त्यापासून आरास सजवता येईल. 

झटपट ओरिगामी पेपर डेकोरेशन

बाप्पाची कलरफुल आरास सजवण्यासाठी कागदी चायनिज पंख्याचा वापर करता येईल. रंगीत कार्डपेपर्स, टिंटेड पेपर्स, टेक्श्चर पेपर्स, रंगीत प्रिंटेड डिझाइन्सचे पेपर्स घेऊन त्यास एक सुलट-एक उलट अशा घड्या घालत त्यापासून वेगवेगळ्या व्यासाचे वर्तुळाकार चायनिज पंखे बनवावेत. भिंतीवर पांढरा पडदा बांधून त्यावर या रंगबेरंगी चायनीज पंख्यांना एकापुढे एक डबल टेपच्या साहाय्याने चिकटवून  रचना करावी.
कागदाला चकलीसारख्या आकारात सलग कापून तो ताणल्यास स्प्रिंगसारखी डिझाइन तयार होईल व त्याखाली कागदी चांदणी चिकटवल्यास एक मस्त हँगिंग बनेल. असे अनेक हँगिंग्स भिंतीवरून सोडून बॅकड्रॉप डिझाइन करता येईल.  

 

चौरसाकृती रंगीत टिंटेड पेपर्स घेऊन त्यांचे भेळेच्या पुडीसारखे कोन्स बनवून घ्यावेत. एका वर्तुळाकार कार्डबोर्डवर परिघापासून सुरुवात करत हे रंगीबेरंगी कोन्स एकापुढे एक वर्तुळाकारात पाकळ्यांप्रमाणे लावत वर्तुळाच्या मध्यभागापर्यंत लावत येत कलरफुल डेलियाचे मोठाली कागदी फुलं बनवावीत. अशी अनेक फुलं बनवून त्यांची सुरेख रचना करून आरास सजवावी.  

क्वीलिंग आर्ट

मॉडर्न आर्टफॉर्ममध्ये गणपतीची आरास सजवायची असल्यास भिंतीवरील क्वीलिंग आर्टचा उपयोग करता येईल. त्यासाठी भिंतीवर आधी माउंटबोर्ड चिकटवून डेकोरेशनं बॅकग्राउंड बनवून घ्यावं व त्यावर जे डिझाइन साकारायचं आहे त्याचं चित्न पेन्सिलीने हलक्या हाताने काढून घावे. रंगीत टिंटेड कागदांच्या एक ते दीड इंच जाडीच्या लांबलचक पट्टय़ा कापून, क्वीलिंग आर्टमध्ये जसे कागदाला गुंडाळून वळण दिले जाते त्यानुसार पट्टय़ांना बोटांनी वळण द्यावं व पट्टय़ांच्या एका कडेला फेविकोल लावून पेन्सिलीने काढलेल्या डिझाइनवर चिकटवून डिझाइन पूर्ण करावं.  अशारीतीने क्वीलिंग आर्टचा वापर करून भिंतीवर थ्रीडी डिझाइन साकारत आकर्षक बॅकग्राउंड साकारता येईल.

 

नावीन्यपूर्ण पडद्यांची सजावट 

बरेचदा सजावटीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने बाप्पाच्या मागे केवळ रंगीत कापडाने भिंतीवर बॅकड्रॉप बनवून त्यावरून दिव्याच्या माळा सोडून सजावट केली जाते; पण या नेहमीच्या टिपिकल सजावटीत थोडे नावीन्य आणण्यासाठी एकाच प्लेन रंगाच्या कापडाचे बॅकड्रॉप डिझाइन करण्याऐवजी आपण घरच्या घरी  टाय अँण्ड डायच्या खूप सोप्या पद्धतीचा वापर करून निरनिराळ्या पॅटर्नचे रंगीबेरंगी पडदे अगदी 15 ते 20 मिनिटांत रंगवू शकतो व बाप्पाच्या मागे कलरफुल पडद्यांचे बॅकड्रॉप सजवू शकतो. 

त्यासाठी पांढरे मोठाले चौरसाकृती सुती कापड घेऊन त्याला पाण्यात भिजवून, कापड पिळून, जास्तीचं पाणी पूर्णपणे निथळून टाकावं. ओल्या कापड्याच्या पंख्यासारख्या एक उलट एक सुलट अशा घड्या घालाव्यात किंवा रुमालाच्या घडीप्रमाणे घडी घालावी (जशी घडी बदलेल तशी कपड्यावरील डिझाइन बदलेल). 

घड्या घातलेल्या ओल्या कपड्यावर विविध रंगांच्या फॅब्रिक रंगांनी तिरप्या पट्टय़ा समसमान अंतरावर रंगवाव्यात. दोन रंगांमध्ये पुरेसं अंतर सोडावं जेणेकरून कपड्याचा पांढरा रंगही दिसेल. फॅब्रिक रंग पंखाघडीच्या प्रत्येक घडीत लागला आहे ना याची खबरदारी घ्यावी. रंगवून पूर्ण झाल्यावर कापड ओलं असतानाच ते उघडावं. पांढ-या कापडावर सुंदरशी रंगीबेरंगी डिझाइन तयार झालेली दिसेल. या घरच्या घरी रंगविलेल्या कलरफुल कापडांचा वापर करून बाप्पासाठी आकर्षक बॅकड्रॉप सजवता येईल.  

‘टेपआर्ट’चा वापर करूनही कलरफुल बॅकड्रॉप अगदी झटपट रंगवता येईल. त्यासाठी पांढ-या कपड्यावर चिकटपट्टय़ा चिकटवून डिझाइन करून घ्यावी, जेणेकरून चिकटपट्टय़ांच्यामध्ये निरनिराळ्या आकारांचे पॅचेस तयार होतील. या पॅचेसमध्ये स्पंजच्या साहाय्याने फॅब्रिक रंगांनी विविध रंग भरावेत. रंगकाम करून पूर्ण झाल्यावर चिकटपट्टय़ा टाकाव्यात. अशारीतीने कापडावर रंगीबेरंगी डिझाइन्स व पांढ-या पट्टय़ांच्या संगतीने सुंदर नक्षीकाम तयार होईल जे बाप्पाच्या बॅकड्रॉप सजावटीसाठी उपयोगी ठरेल.  

रंगीत कापडी बॅकड्रॉपला पर्याय ठरू शकतो कागदी पडद्यांचा! वेगवेगळ्या रंगांचे व आकारांचे चौरसाकृती घोटीव किंवा टिंटेड कागद घेऊन त्यास कर्णात (डायगोनली) दुमडून कागदी त्रिकोणी समोसे बनवावेत. 
वेगवेगळ्या रंगांचे-आकारांचे हे त्रिकोणी समोसे मांजासारख्या जाड धाग्यावर एका खाली एक सरळ रेषेत गुंफून हव्या तेवढय़ा लांबीच्या कलरफुल माळा बनवून, अशा अनेक माळा एका जाडसर धाग्याला किंवा आडव्या बांबूला एकापुढे एक बांधून पडद्यासारखी रचना करावी. 

या त्रिकोणी कागदी पडद्यांमध्ये रंगीबेरंगी मणी गुंफून त्यांचे सौंदर्य आणखीन खुलवता येईल.

टाकाऊतून टिकाऊ आरास

जुन्या मासिकांमधील रंगीबेरंगी कागदं फाडून त्यांचे कोलाज साकारून कलरफुल डेकोरेशन करता येईल. जुन्या खराब झालेल्या सीडीजवर थ्रीडी लाइनरने डिझाइन साकारून त्यात ग्लास कलर्स भरून डिझाइन केलेल्या अशा सीडीज हँग करून सजावट करता येईल किंवा खराब सीडीजचे तुकडे कापून त्याचे मोझेइक पॅटर्नमध्ये डिझाइन साकारून झगमगाटी आरास सजवता येईल. 

सीडीजप्रमाणे काचांचे तुकडे, कलरफुल स्टोन्स व पेबल्स यांना ग्लूगनच्या साहाय्याने मोझेइक पॅटर्नमध्ये चिकटवून आगळी-वेगळी सजावट करता येईल.

पारंपरिक चित्रकला प्रकार
पारंपरिक कलाप्रकारांचा वापर करून गणपतीसाठी सजावट करायची असल्यास वारली चित्रकला, कच्छी लिपण आर्ट, गोंद आर्ट इत्यादी कलाप्रकारांचा वापर करू शकतो. गेरू रंगाच्या पडद्यावर किंवा कागदावर वर्तुळ, रेषा व त्रिकोण यांचा वापर करून पांढर्‍या रंगात सहज-सोपी वारली चित्नं साकारून बाप्पासाठी साधी पण सुंदर अशी ट्रायबल डिझाइनची आरास सजावट येईल. 

वारली चित्रे  काढण्याचे काम आणखीन सोपं करायचं असल्यास ठसेकाम करता येईल. त्यासाठी बटाटा मधोमध कापून त्यावर त्रिकोण, गोल आखून फक्त त्रिकोणाकार, गोलाकार भाग वर येतील अशारीतीने बटाट्याच्या बाजूचा भाग कापून ठसे तयार करावेत व ते रंगात बुडवून ठसेकामातून वारली चित्र झटपट साकारावे. गुजरातमधील पारंपरिक कच्छी लिपण आर्टचा वापर करूनही बाप्पासाठी छानशी पारंपरिक आरास साकारता येईल. 

 

पारंपरिक लिपण आर्टमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या आरशाच्या तुकड्यांचा व माती आणि उंटाच्या शेणाच्या मिश्रणाचा वापर करून नक्षीकाम केले जातं. आपण याऐवजी बाजारात मिळणा-या क्राफ्ट करण्यासाठी वापरण्यात येणा-या मोल्ड इट (शिल्पकार)चा वापर करून लिपण आर्ट साकारू शकतो. विविध आकारांच्या आरशांच्या तुकड्यांची रांगोळी पॅटर्नमध्ये रचना करून बाप्पासाठी सुंदरशी आरास साकारता येईल.

अशारीतीने थोडी कल्पनाशक्ती लढवून आणि कलाकौशल्य वापरून आपण गौरी-गणपतीसाठी नानाप्रकारे सुंदर व आकर्षक आरास साकारू शकतो.

(लेखिका आर्किटेक्ट आणि अर्बन प्लॅनर आहेत.)

anuja.architecture@gmail.com

 


Web Title: Easy And Eco freindly Methods of decoration for Ganpati.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.