Discipline | शिस्तीचा दरारा

- शुभा प्रभू-साटम

शिस्त आणि दरारा यामधील सीमारेषा फार अंधूक आहे. आपली मुलं आता आपलं अजिबात ऐकत नाहीत हे उगळणाºया पालकांनी प्रथम हा विचार करायला हवा की नक्की कधीपासून मुलं आपलं ऐकत नाहीत?
शिशूवर्गापासून साधारण पाचवी सहावीपर्यंत सर्व बिनबोभाट ऐकणारी मुलं अचानक का बंडखोर होतात?
अनेक कारणं आहेत.
मुलांचं पौंगडावस्थेत हळूहळू पदार्पण होत असतं. मित्र-मैत्रिणी अधिक जवळचे वाटू लागतात. अनेक गोष्टींबद्दल कुतूहल वाढतं. थोडक्यात मुलांचं विश्व वेगानं पालटत असतं. पण पालक मात्र केव्हाही शाळेतून धावत घरी येऊन आईला मिठी मारणाºया पाल्यातच अडकलेले असतात.
मुलं वाढतात म्हणजे त्यांच्यात नुसता शारीरिक बदल होतो असं नव्हे तर मानसिक बदलसुद्धा होतात.
आमच्यावेळी नव्हती ती ही थेरं असं बोलणं चूक आहे. या पालकांनी प्रामाणिकपणे आपले ते दिवस आठवून पाहावेत.
याच वयात मुलांचा विश्वास संपादन करणं गरजेचं असतं आणि आपल्याकडे याचवेळी चौफेर पहारा वाढू लागतो.
मूल हे बिघडलेलंच आहे आणि त्याला सुधारणं आपलं परमकर्तव्य आहे या भावनेनं पालक वागू लागतात. अतिसंशय घेतला जातो, मुलींच्या बाबतीत तर अधिकच. याचवेळी अभ्यास वाढत असतो जो आईबाबांंना घरी घेणं शक्य नसतं. मग कोचिंग, वेगवेगळे क्लासेस सुरू होतात. आधी शाळेमधून थेट घरी येणारं मूल अनेकदा बाहेर पडू लागतं. कधी क्लासला, कधी कुठल्या अ‍ॅक्टिव्हिटीला सतत बाहेर.
त्याचं विश्व मोठं होतं ज्यात पालक दुय्यम असतात.
आणि संघर्षाची पहिली ठिणगी येथेच पडते.
‘क्लास तर सातला सुटला; मग इतका वेळ कुठे होतीस?’ ‘याला अमुक मार्क पडले तुला का कमी?’ ‘यावेळी अमुकची अ‍ॅडमिशन तमुकवर क्लोज झालीय तेव्हा लक्षात ठेवा!’ असे संवाद झडू लागतात.
आणि शेवटी एका वाक्यानं समारोप, ‘आम्ही इतकं करतो तुमच्यासाठी; पण तुम्हाला किंमत नाही त्याची!’ हे भरतवाक्य उच्चारलं की मुलगा/मुलगी अशी का वागू लागलीय याचा ऊहापोह सुरू होतो.
आणि दोष मित्रांना.
‘संगतीमुळे बिघडला/ली’ असं बोलणाºया पालकांनी एक लक्षात घ्यायला हवं की आपलं मूलपण अन्य कोणाचा मित्र/मैत्रीण असू शकते. तिच्या/त्याच्या संगतीबद्दलपण असेच अन्य कोणी बोलत असेल.
मग वागायचं कसं?
सर्वप्रथम मुलाला साध्य मिळवायचं साधन म्हणून पाहाणं थांबवा. आपला पाल्य काय वकुबाचा आहे याची प्रामाणिकपणे पडताळणी करा. त्याच्या तिसरी चौथीतल्या मार्कावरून आठवी नववीमधले मार्क जोखू नका.
महत्त्वाचं म्हणजे एक विश्वास निर्माण करा की मुलाला त्याच्या हातून झालेल्या घोडचुका लपवाव्याश्या वाटणार नाहीत.
मुलांमधील मानसिक बदल पाहून आपलं वागणं निश्चित करा. मुलांवर लक्ष हवंच. वादच नाही. पण पहाराही नको.
बाहेरचं जग वाईट असू शकतं ते कसं? त्याकरता काय खबरदारी घ्यायची? या वयात काय गुन्हे घडू शकतात. या विषयी मोकळेपणानं चर्चा करा.
पालक म्हणून तुम्हाला जी भीती वाटते आहे ती समोर मांडा. वाटलं तर समुपदेशकाची मदत घ्या. त्यात गैर काय आहे?
आपण जन्म दिलेल्या मुलांना प्रेमानं, विश्वासानंच मोठे करा. मुलांना प्रोजेक्ट म्हणून वाढवू नका. जेणेकरून तुम्हाला खरोखरीचा मान मिळेल.


(लेखिका मुक्त पत्रकार असून,
स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.shubhaprabhusatam@gmail.com)