dhapate receipy | उकड धपाटे,  उरलेल्या मिठाया आणि शिळ्या आमटी-उसळींचा ताजा फर्मास बेत
उकड धपाटे,  उरलेल्या मिठाया आणि शिळ्या आमटी-उसळींचा ताजा फर्मास बेत


- शुभा प्रभू-साटम

आपल्याकडे शिळासप्तमी साजरी केली जाते. त्या दिवशी आदल्या दिवशी केलेलं खायचं असतं. पण जुन्यातून नवं करूनही शिळासप्तमी साजरी करता येते दिवाळीला, सणाला किंवा हल्ली एरवीही घरात विविध मिठाया आणल्या जातात. त्यातल्या बंगाली मिठाया ज्या पनीरच्या असतात त्या मात्र घ्यायच्या नाहीत. काजू कतली, म्हैसूर. बालूशाही, मलई बर्फी अशा ज्या मिठाया असतात त्या सर्व मिक्सरमधून जाड भरडसर वाटायच्या.
साधं व्हॅनिला आइस्क्रीम आणायचं, त्यात हे भरड घालायचं आणि परत फ्रीझरमध्ये ते सेट करायचं. यात हवं तर अर्धं उरलेलं चॉकलेट किंवा सुका-मेवा घालू शकता. अनेकदा दोन-चार प्रकारचे आइस्क्रीम थोडी थोडी उरतात. ती यात वापरता येतात. वेळ असेल तर आइस्क्रीम बाउलमध्ये वेगवेगळे घालून वर काजू पूड भरभरून द्यायची. हे दिसतंही मस्त. यावर चॉकलेट किसून घातलं तर उत्तमच.
ही मिठाईची भरडपूड हलव्यातही वापरता येते. खव्याऐवजी. हलव्यात पनीरच्या मिठाया मात्र घालायच्या नाहीत. मुलांना या भरडपूडचे गोड सॅण्डविचही देता येतं. नटीला अथवा जॅममध्ये मिक्स करून सॅण्डविच करायचं. मिल्कशेकमध्येही ही भरडपूड वापरता येते किंवा ही पूड जरा बारीक करून उकडलेल्या बटाट्यात घालून गोड पराठे होतात. अफाट चवीचे लागतात.
अनेकदा आमटी/वरण उरलं तर परत फोडणी तरी किती आणि कशी देणार? खासकरून सणवार म्हणा अथवा काही कार्य झालं की अशी आमटी / वरण उरतेच उरते. अशा वेळी एका जाड बुडाच्या पातेल्यात तुरीचं अथवा मुगाचं वरण घ्यायचं. त्यात गोडा मसाला गूळ, मीठ, तिखट घालून त्या वरणाला उकळी आणायची. वरण थोडं पातळ हवं. त्यात कणीक/ ज्वारी किंवा बाजरी पीठ/ थालीपीठ भाजणी हवं तसं घालून दणदणीत उकड काढायची यात उरलेली पालेभाजीपण ढकलू शकता. ही उकड मग चांगली मळून घ्यावी.
आणि नेहमी करतो तसे थालिपीठ/धपाटे करायचे. जेवणाऐवजी हेच. सोबत मस्त चटणी. अत्यंत फर्मास लागतं. उसळ उरली असेल तर ती थोडी चेचून घेऊन त्यात उकडलेला बटाटा, ब्रेड घालून टिक्की होते. बर्गरची पॅटी म्हणून खपवून द्यायची.

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाºया लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)
 


Web Title: dhapate receipy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.