Delightful tips for descending age | चला, हवा येऊ द्या!  उतरत्या वयात मोकळा श्वास घेण्याच्या प्रसन्न युक्त्या
चला, हवा येऊ द्या!  उतरत्या वयात मोकळा श्वास घेण्याच्या प्रसन्न युक्त्या

- डॉ. लीली जोशी
 

कुणीसं म्हटलं आहे..


चार भिंती, एक छप्पर
यांचं म्हणे बनतं घर
हसरं घर नाचरं घर
नांदतं घर रांधतं घर
जखमेवरती फुंकर घालतं
चुकलेल्याला कुशीत घेतं
रडवल्याचे अश्रू पुसतं
थकलेल्याला लागतं घर
उन्हापावसात राखतं घर
आपली माणसं आपलं घर

...खरं सांगू? - हे कुणीसं वगैरे म्हटलेलं नाही, मीच म्हटलंय. मी लीली जोशी. सदुसष्ट वर्षांची तरुण म्हातारी. तीन नातवांची आजी. व्यवसायानं डॉक्टर, पण बरीचशी निवृत्त. त्यामुळे आता जास्तच ‘बिझी’. आजवर जमल्या नाहीत अशा सर्व गोष्टी करायला उत्सुक. कारण भरपूर वेळ आता हाताशी आहे. त्यातलीच एक गोष्ट - कट्ट्यावरच्या गप्पा. आमच्या वयात प्रत्येकाला कट्टा हवाच. मग तो आपल्या सोसायटीच्या आवारातला कट्टा असेल नाहीतर जवळच्या बागेतला, देवळातला कट्टा असेल. ते कोपºयावरचं कॉफी शॉप असेल किंवा ‘अमृततुल्य’ची टपरी.
कशासाठी हवाय कट्टा?
समवयस्कांना भेटण्यासाठी.
गप्पा मारण्यासाठी. गप्पा तरी कसल्या? राजकारण,
क्रिकेट आणि पैशांची गुंतवणूक हे खास पुरुषांचे विषय, तर सिनेमा, नाटक, गाण्यांचे कार्यक्रम याविषयी भरभरून बोलणं या बायकांना मोहवणाºया गोष्टी. ‘गॉसिपिंग’ हे स्त्री-पुरु ष दोघांनाही आवडतं आणि आवश्यकही आहे ते.
पण सगळ्यांच्या मनीमानसी अगदी जिव्हाळ्याच्या वाटणाºया गोष्टी म्हणजे माणसा-माणसातले आंतरिक संबंध. आपलं घर, आपल्या कुटुंबातली माणसं म्हणजे आपले जिवलग. त्यांच्याशी सुसंवाद असावा असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्यक्षात किती घरात आहे असा सुसंवाद? मुळात संवाद तरी किती कुटुंबांत उरला आहे?
एका घरात आजी-आजोबा, आई-बाबा आणि लहान मुलं अशा तीन पिढ्या सुखानं नांदताहेत, हे चित्र ‘आहे मनोहर तरी’ कधीकधी ‘गमते उदास’! आणि ही उदासीची अभ्रं किरकोळ असली तरी त्याबद्दल एकटं बसून धुमसत राहणं यात काही शहाणपणा नाहीये. इंग्रजीत एक म्हण आहे- ‘स्ट्यूइंग इन युअर ओन ज्युसेस.’ आपल्याच तापलेल्या भावनांमध्ये मन भाजून निघतं. छोटीशी खुपणारी गोष्ट असं एकट्यानं गोंजारत बसलं तर ही एवढी होऊन बसते.
म्हणून म्हणते - ‘चला, हवा येऊ द्या.’
घराघरातल्या ज्येष्ठांनो, कट्ट्यावर चला. मनं मोकळी करा. खूप गप्पा मारू, सुख-दु:खाच्या गोष्टी बोलू. मेंदूतली जळमटं झाडून साफ करू. चिंतांची गाठोडी इथेच सोडून ताज्यातवान्या मनानं घरी जाऊ. खेड्यातली माणसं संध्याकाळी चावडीवर, वडाच्या पारावर गोळा होतात, शिळोप्याच्या गप्पा मारतात. नक्कीच त्यामागे हा विचार असणार.
आज सुरू होणाºया या लेखमालेच्या माध्यमातून आपण कुटुंब आणि कुटुंबातल्या व्यक्तींकडे डोळसपणानं बघूया. आयुष्याच्या या टप्प्यावर शक्य तितकं तटस्थ निरीक्षकाच्या भूमिकेतून बघूया.
ज्या काही गोष्टी घरात घडत राहतात, भले त्या मनाविरुद्धही असतील त्यांना चंचल भावनांची प्रतिक्रिया चटकन न देता विचार करून शांतपणे प्रतिसाद द्यायला शिकूया. डोईवरच्या रुपेरी केसांबरोबर ही प्रगल्भतापण यायला हवी. मन:स्वास्थ्यासाठी, आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या.
या लेखमालेत आपल्याला वेगवेगळी माणसं डोकावताना दिसणार आहेत. त्यांच्या आर्थिक- सामाजिक परिस्थितीत थोडंफार कमी-जास्त असेल.
सांस्कृतिक-शैक्षणिक पातळीवरसुद्धा भिन्नता असेल. पण हे आहेत सगळे ज्येष्ठ नागरिक. घराघरातले आजी-आजोबा. त्यांच्या नजरेला कुटुंबातल्या कोणत्या गोष्टी सुखवतात-गुदगुल्या करतात, कोणत्या डाचतात-दुखवतात हे आपण छोट्या छोट्या प्रसंगातून पाहू. करमणूक करता करता हे लेख वाºयाची प्रसन्न झुळूक यावी तसं मनाला प्रसन्न करतील. ओठावर स्मित फुलवतील, तर कधी विचार करायला लावतील. स्वत:चं परीक्षण करायला शिकवतील. भेटूच मग या कट्ट्यावर..

(लेखिका सुप्रसिद्ध डॉक्टर आणि मनाने तरुण राहणं साधलेल्या आजी आहेत. drlilyjoshi@gmail.com )


Web Title: Delightful tips for descending age
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.