- माधवी वागेश्वरी
'दि डे आय बिकेम वूमन’ हा मारझिच मखलबाफ यांचा इराणी सिनेमा . एक नऊ वर्षांची चिमुरडी, एक प्रौढ स्त्री आणि एक म्हातारी यांची ही एक फार साधी गोष्ट म्हणूनच जरा जास्त विचार करायला लावणारी. वय वेगवेगळं असलं तरी तिघींना सांधणारा एक समान धागा आहे आणि तो म्हणजे - ‘बाई होण्याचा, बाईपणाचा’. चित्रपट सुरू होतो तो एक लहान मुलीच्या गोष्टीनं. तिचं नाव हवा. ती आज नऊ वर्षांची झाली म्हणजे ती ‘बाई’ झाली असं तिला सांगणारी तिची आई दिसते. आता तिला मुलांसोबत खेळता येणार नाही. सतत बुरखा घालून राहावं लागेल. 
‘हवा’चा जन्म दुपारी बारा वाजता झाला होता, त्यामुळे आता सकाळपासून १२ वाजेपर्यंतच ‘हसन’ या तिच्या मित्रासोबत खेळण्याचं, त्याच्यासोबत मिळून चॉकलेट खाण्याचं तिचं स्वातंत्र्य राहणार आहे. घराबाहेर पडताना तिची आजी तिच्या जवळ एक काठी देते. तिची सावली नाहीशी झाली की तिची वेळ संपली. धर्मानं, रूढीनं, पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेनं मुली कशा पिचल्या गेल्या आहेत याचं प्रतीक म्हणून ती काठी (छडी?) तिच्यासोबत फिरत राहते.काठीची सावली संपते आणि हवा बाई होते. 
भरधाव वेगानं कोणीतरी घोडा दामटत येतंय, वेग वाढतच जातो. तो पुरु ष कोणाचा तरी पाठलाग करतोय. मग दिसायला लागतात काळ्या कपड्यातील सायकलवर ऊर फुटेस्तोवर वेगानं जाणाऱ्या बायका. यांच्यातच आहे एक ‘आहू’. त्या घोड्यावरच्या पुरुषाची बायको. तो तिला दरडावून सांगतो, ‘या सायकलीवरून खाली उतर नाही तर परिणाम वाईट होईल.’ पण ती मात्र अजिबात न जुमानता सायकल चालवतच राहते. वेग वाढतच चाललाय. एकीकडे तिचं लक्ष आहे सायकल स्पर्धकांकडे आणि दुसरं तिच्या नवऱ्याकडे. ती जिवाच्या आकांतानं सायकल चालवत राहते. तो तिथल्या तिथे तिच्याशी घटस्फोट घेतो. घटस्फोट झाला तरी तिला फिकीर नाही. तिचा वेग वाढतोच आहे. आता तिला समजवायला तिच्या माहेरचे पुरुष, तिच्या जमातातील पुरुष येतात. ‘ही सायकल नाही तर ‘दैत्याचं वाहन आहे’ अशी अक्कल तिला शिकवतात. ती अजिबात ऐकत नाही. स्पर्धेत जिंकण्याच्या ईर्ष्येपेक्षा ‘मला माझ्या मनाप्रमाणे सायकल चालवू द्या’ हे ती एकही शब्द न उच्चारता सांगत राहते. तिला पाहून आपलीच दमछाक व्हायला लागते. घोड्यावर बसून तिला चालवणारा ‘तो’ आणि आधुनिकतेचे (?) प्रतीक असणाऱ्या सायकलीवर असणारी ‘ती’. आता तो थेट तिच्यासमोर येऊन उभा राहतो. तिचा वेग मंदावतो. कॅमेरा तिच्यापासून दूर जायला लागतो. आपलाच जीव कासावीस व्हायला लागतो. ‘आहू’चं आता काय होणार? ‘स्वतंत्र बाई’ बनण्याचं तिचं स्वप्न अपूर्णच राहील का? याची अस्वस्थ जाणीव करून देत कॅमेरा आपल्याला तिसऱ्या कथेकडे वळवतो.
एका विमानातून एक आजीबाई उतरतात. प्रवाशांचे सामान घेण्यासाठी लहान मुलं पटकन पुढे सरसावतात. एक छोटा मुलगा या आजीबार्इंकडे येतो. जवळ जवळ ८० पर्यंत वय असलेल्या या आजीचं नाव आहे ‘हुरा’. हुराला खूप सारं फर्निचर विकत घ्यायचं आहे. काय काय घ्यायचं आहे या आठवणीसाठी तिनं आपल्या हातांच्या बोटाला चिंध्या बांधलेल्या आहेत. मोठमोठ्या, आलिशान दुकानातून तो मुलगा हुराला फिरवत राहतो आणि ती अतिशय आनंदानं सामान विकत घेत राहते. ‘मला माझ्या इच्छेप्रमाणे आयुष्यात काहीच विकत घेता आलं नाही आणि आज मला ते घेता येतं आहे’ त्यामुळे आजचा तिचा दिवस आहे ‘स्वतंत्र बाई’ होण्याचा. तिला मिळत जाणाऱ्या वस्तू, तिचा आनंद, ‘माझा मुलगा होशील का?’ असं तिनं सोबत आलेल्या छोट्या मुलाला सारखं विचारणं, इथे एक गंमत दिग्दर्र्शिकेनं अशी केली आहे की या आजीबार्इंची गोष्ट ‘आहू’च्या सायकल रेसमधल्या तिला भेटलेल्या मुलींनी पुढे सरकत राहते. ही आजी मोठी खट्याळ आहे. तिचं मिस्कील बोलणं ऐकून आपल्याला हसायला येतं. पण मग प्रश्नही पडतो, आपण नेमकं कशाला हसतोय? शेवटी हुरा आजीला तिच्या सामानासकट पोहोचवलं जातं एका मुख्य बोटीच्या दिशेनं. किनाऱ्यावर एवढं मोठं सामान कोण घेऊन चाललंय हे पाहणारी पहिल्या गोष्टीतली ती निष्पाप पोर (हवा) आपल्याला दिसते. तिघींना एकत्र गुंफून चित्रपट संपतो.
सगळ्यांचं सारखं ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं म्हणजे चांगुलपणा. सतत दुसऱ्याचं मन राखणं म्हणजे सभ्यपणा, परंपरा सांभाळण्याचं जोखड कायम मानगुटीवर आणि हे काय कमी आहे म्हणून त्यावर कट्टर धार्मिक वातावरण अशा परिस्थितीत राहणाऱ्या मुस्लीमबहुल राष्ट्रांतील स्त्रियांच्या नशिबी ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असतो. जिथे सुबत्ता आहे, भरभराट आहे, वेगवान तंत्रज्ञान उपलब्ध आहे, शिक्षणाच्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या सोयी आहेत अशा विकसित आणि विकसनशील देशांमध्ये तरी बाई, तिचं बाईपण, त्याची मर्यादा भेदणारं तिचं माणूसपण या गोष्टी किती साध्य होऊ शकल्या आहेत हा प्रश्न आहेच. सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या हिलरी क्लिंटन यांच्या पराभवाची जी काही कारणं असतील ती असतील; परंतु त्यात ‘बाईचं काय म्हणून आम्ही पुरुषांनी ऐकायचं?’, ‘बाई हुकूम सोडणार आणि आपण वागणार?’ हे असं काहीतरी माध्यमात छापून आलंच. म्हणजे त्या केवळ स्त्री आहेत हेही त्यांच्या हरण्याचं कारण होऊ शकतं हे कशाचं द्योतक आहे? आणि स्त्रियांविषयी हीन बोलून पुन्हा ट्रम्प यांना विजयी करण्यासाठी मतदान करणाऱ्या बायका हे वाचून भोवळ येणं बाकी राहतं. बाईपणाची मर्यादा ओलांडायची तरी कधी? अशावेळी या चित्रपटातील ‘हवा’, ‘आहू’ आणि ‘हुरा’चे क्लोजअप आठवत राहतात. स्वांतत्र्य मिळवण्याची आस असणं आणि ते मिळाल्यावर ते झेपण्याची ताकद असणं यात किती फरक आहे याची अस्वस्थ जाणीव होत राहते. मखमलबाफ यांना उत्तर सापडलं असं नाही. या चित्रपटातून त्या शोध घेत आहेत, बाई म्हणून बाईकडे बघण्याची शुद्ध नजर असायला हवी असं सूचवत आहेत आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे. बाई, मग ती जगाच्या पाठीवर कोठेही राहणारी असो, त्या प्रत्येकीनं एकदा तरी या दिवसाचा विचार करायला हवा- ‘द डे आय बिकेम वूमन’.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.) 

madhavi.wageshwari@gmail.com