डॉ. वर्षा जोशी

घरातल्या सगळ्या माणसांची जेवणं झाली की आपण उरलेल्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतो. कालची भाजी, परवाची आमटी, दोन दिवसांपूर्वीचा भात अशा वस्तूंनी फ्रीज भरलेला असतो आणि या सर्व गोष्टी कितीही दिवस टिकणार अशी आपली समजूत असते.
पण तसं नसतं. या सर्व गोष्टींमध्ये पाण्याचा अंश असतो आणि त्यांच्यावर सूक्ष्म जिवाणू सहज हल्ला चढवू शकतात. घरातली अनेक माणसं अनेक कारणांनी फ्रीज उघडत असतात, त्यामुळे त्यामध्ये तपमान जेवढं कमी असायला हवं तेवढं राहात नाही. आणि तपमान वाढलं की, सूक्ष्म जिवाणूंची वाढ जलद होऊ लागते. रासायनिक अभिक्रियाही जलद होऊ लागतात. अन्नाचं विघटन लवकर होऊ लागतं. आणि पदार्थ लवकर नासू लागतो.
आपला अनुभव असतो की लोणची, मुरांबे वगैरे गोष्टी बराच काळ टिकतात. पण लोणच्यामध्ये वरती तेलाचा थर त्यासाठीच आवश्यक असतो; ज्यामुळे लोणच्याचा संपर्क हवेशी येत नाही. हवेमधलेच सूक्ष्म जिवाणू पदार्थांवर हल्ला करण्यासाठी टपलेले असतात. पण, तरीही ज्या पदार्थात पाण्याचा अंश कमी असतो ते जास्त काळ टिकू शकतात. लोणचं, मुरांबा हे पदार्थ बरणीतून काढताना म्हणूनच चमचा अगदी कोरडा असावा लागतो.

शिळ्या भाताचं काय?
भात, भाजी, आमटी, पोळ्यांची कणीक या गोष्टी उरल्यावर फ्रीजमध्ये जास्तीत जास्त दोन दिवस ठेवाव्यात. ठेवतानाही ज्या भांड्यात या गोष्टी ठेवायच्या त्यावर क्लिगरॅपचा तुकडा घट्ट बसवून मग ठेवाव्यात. असं केल्याने त्या वस्तूंचा संपर्क कमीत कमी हवेशी येतो आणि त्या लवकर नासत नाहीत. खरं तर अशा उरलेल्या गोष्टी संपवण्याचे अनेक छान मार्ग आहेत. शिळा भात उरल्यास त्याचा फोडणीचा भात, दहीबुत्ती, चित्रान्न, मेथीराईस, लिंबूराईस, टॅमरिण्डराईस असे अनेक प्रकार करता येतात. कारण भाताच्या या सगळ्या प्रकारांसाठी तो आधी मोकळा शिजवून गार करावा लागतो. शिळा भात मोकळा झाला असेल तर हे सर्व प्रकार करता येतात; पण भात जर मऊ असेल तर दहीबुत्ती किंवा बीसीबेळी भातच बनवावा लागतो.

उरलेल्या भाज्यांचे कटलेट्स
दोन दिवसांच्या तीन-चार भाज्या थोड्या थोड्या उरल्या असतील तर त्या एकत्र करून हवं असल्यास त्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करून घालावा. आलं, लसूण, मीठ, मिरचीचं वाटण घालून त्यात ब्रेडचा मिक्सरमध्ये केलेला चुरा किंवा कॉर्नफ्लॉअर घालून गोळा करून त्याची कटलेट्स बनवता येतात. ब्रेडच्या चुºयात, कॉर्नफ्लॉअरमध्ये किंवा तांदळाच्या पिठात घोळून ते शॅलो फ्राय करता येतात. थोडा मऊसर भात उरला असल्यास तोही यात घालता येतो.
फोडणीची पोळी अन् पोळीचे गुलाबजाम
शिळ्या पोळीची फोडणीची पोळी, पोळीचा लाडू, फ्रॅन्की असे प्रकार तर करता येतातच; पण मिक्सरवर एकदम बारीक करून थोडं थोडं दूध घालून गोळा बनवून त्याचे गुलाबजाम करता येतात. शिळ्या भाकरीचे बारीक तुकडे करून त्यात कांदा, मिरची, दही घालून खाता येतं. शिळा पाव मिक्सरमध्ये घालून बनवलेले ब्रेड क्रम्ब्स पॅटिस, कटलेट यांचं आवरण बनविण्यासाठी वापरता येतात. फोडणीच्या पोळीसारखा फोडणीचा ब्रेडही बनवता येतो किंवा पोळीप्रमाणे गुलाबजामही बनू शकतात. पदार्थ फार शिळे बनण्याआधीच त्यापासून चविष्ट पदार्थ बनवून ते संपवण्याचे अनेक मार्ग आहेत. शिळ्या आमटीतही तांदळाचं पीठ घालून धिरडी करता येतात. या सगळ्या उपायांमुळे पदार्थ नासण्याचा प्रश्नच येत नाही.

नासलेला पदार्थ कसा ओळखाल?
पदार्थ नासलाय म्हणजेच खाण्याजोगा उरलेला नाही हे ओळखण्याचे चार मार्ग आहेत. नासल्यामुळे त्याचा रंग, पोत, वास आणि चव यामध्ये जाणवण्याइतका फरक पडतो. उदाहरणार्थ- फळांचा रंग बदलतो. ती लिबलिबीत होतात. शिजवलेल्या भाज्या, उसळी, डाळ या गोष्टी तसंच भातसुद्धा बुळबुळीत होतो. नारळाच्या चटणीला आंबल्याचा वास येतो. खरं तर ओलं खोबरं ज्यात असतं त्या गोष्टी लवकर नासतात; पण हे टाळण्यासाठी आपण हे पदार्थ डीप फ्रीझरमध्ये ठेवले तर ते जास्त दिवस टिकतात.

धान्य खराब होऊ नये म्हणून
तांदूळ, गहू या धान्यांना कीड लागू नये म्हणून त्यात कडूलिंबाचा पाला किंवा पाºयाच्या गोळ्या ठेवल्या जातात. काही घरांमध्ये बोरिक पावडरही धान्यांना लावली जाते. गहू, डाळी, कडधान्यं कडक उन्हात चार- पाच दिवस ठेवतात म्हणजे त्यातला पाण्याचा अंश निघून जातो आणि धान्यं लवकर खराब होत नाही.
पदार्थ विकत घेताना त्यावरची उत्पादनाची तारीख आणि एक्स्पायरीची तारीख बघूनच तो विकत घ्यावा आणि एक्स्पायरी डेट होण्याआधी संपवावा. काही पदार्थांवर मॅन्युफॅक्चरिंग डेट दिलेली असते आणि बेस्ट बिफोरच्या पुढे किती महिन्यात पदार्थ संपवावा हे दिलेलं असतं. याचं काटेकोर पालन करावं. म्हणजे पदार्थ नासणार नाही आणि खराब होणार नाही.
डीप फ्रीझरमध्ये ठेवलेल्या गोष्टी मात्र एकदा बाहेर काढल्या की लगेच संपवाव्या लागतात.

(लेखिका भौतिकशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून, त्यांची दैनंदिन विज्ञानाबद्दलची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.