Criticism on Serena William's Cat suit | सेरेनाच्या कॅटसूटवर का तुटून पडलेय टीकाकार?
सेरेनाच्या कॅटसूटवर का तुटून पडलेय टीकाकार?


-कलीम अजीम

टेनिस चॅम्पियन सेरेना विल्यम्सला ब्लॅक कॅटसूट घालून टेनिस खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या मुद्दय़ावरून नेटीझन्समध्ये गेल्या दोन आठवड्यापासून उलटसुलट चर्चा रंगलीय. तिच्या फॅन्सनी या निर्णयाला रेसिझमशी जोडलं, तर अनेकांनी याला सेक्सीझमशी जोडलं आहे. टेनिस फेडरेशननं ड्रेसकोडबाबत चौकटीतले परिमाणं पुढे करून आगामी स्पर्धेत खेळण्यास मज्जाव केला आहे. तिच्यावर होणा-या या वर्णभेदी हल्ल्यामुळे सेरेना पुरती व्यथित झाली आहे. मातृत्व काळानंतर जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत असलेली सेरेना यामुळे मात्र  अचानक एकाकी पडली आहे.
 

सेरेना एप्रिल 2017 पासून प्रसूती रजेवर होती. गेल्या सप्टेंबरमध्ये तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर तिला अतिशय गुंतागुंतीच्या अशा ‘ब्लड क्लॉट्स’ आजारानं घेरलं. फुप्फुसाच्या या विकारामुळे तिच्या रक्तात गुठळ्या होत होत्या. 

प्रसूतीनंतर तिच्यावर चार शस्त्रक्रिया झाल्या. तब्बल सहा आठवडे ती अंथरुणाला खिळून होती.  पण पुढे आठच महिन्यांत रिकव्हर होत सेरेनानं टेनिस कोर्ट गाठलं. इतक्या कमी कालावधीत टेनिस कोर्टवर परतणं तिच्यासाठी एक मोठं आव्हान होतं. इतर कामात ठीक आहे, पण ताकदीच्या अशा मैदानी खेळात ते धोकादायक मानलं जातं. केवळ खेळाप्रती समर्पित भावनेतून तिनं अशा नाजूक अवस्थेतही हातात बॅट घेतली. शारीरिकदृष्ट्या अनफिट असतानाही ती कोर्टवर जिद्दीनं उतरली; पण मातृत्व आणि आजारानं थकलेल्या शरीरानं तिला साथ दिली नाही आणि  तिला ग्रँण्ड स्लॅममध्ये दारुण पराभव पत्करावा लागला.

प्रसूती रजेवर जाण्यापूर्वी सेरेना जागतिक टेनिस रॅँकिंगमध्ये नंबर एकवर होती.  आता ती 26 क्र मांकावर घसरली आहे. इतक्या गुंतागुंतीच्या काळातही ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होती; पण तिच्या प्रयत्नांना फ्रेंच टेनिस फेडरेशननं अचानक झटका दिला. टेनिस फेडरेशननं तिच्या कॅटसूटला टेनिस कोर्टमध्ये मनाई केली आहे. 
आगामी फ्रेंच ओपनमध्ये तिला कॅटसूट घालून खेळता येणार नाही असा आदेश काढला आहे. फेडरेशननं ‘दी गार्डीयन’ला प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, ‘कॅटसूटमध्ये खेळणं हा टेनिसचा अपमान आहे. खेळ आणि त्याच्या नियमांचा सर्वांनी सन्मान करावा.’ दुसरीकडे प्रतिस्पर्धी खेळाडूंनी तक्रार केलीय की, सेरेनाचं शरीर बलदंड आहे त्यामुळे बॉडीसूटमुळे तिला दुखापत होऊ शकते.

सेक्झिझम आणि रेसिझमविरोधात लढणारी सेरेना फेडरेशनच्या या निर्णयावर प्रचंड दु:खी झाली आहे. नव्या बॉडीसूटमध्ये तिला सुपरहिरोचा फील येत होता असं तिनं म्हटलं होतं. ‘ब्लड क्लॉट्स’ आजारावर इलाज म्हणून तिनं हा काळ्या रंगाचा टाइट बॉडीसूट परिधान केला होता. स्किन टाइट असलेल्या या ड्रेसमुळे सतत वेदना देणा-या स्नायूंना आधार मिळत होता. या सूटमध्य़े तिला अतिशय कम्फर्टेबल वाटत होतं. 

‘नाईके’ नावाच्या प्रतिष्ठित कंपनीनं हा सूट खास सेरेनासाठी डिझाइन केला होता. ‘नाईके’च्या मते या पोशाखामुळे सेरेनाच्या स्नायूंत रक्तात गुठळ्या होणार नाही, कारण स्नायूंना ताणून धरणारं विशिष्ट प्रकारचं इलास्टिक कंपनीनं यात वापरलं होतं.

23 वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणारी सेरेना येणार्‍या फ्रेंच ओपनमध्ये आपला प्रिय काळा सूट परिधान करू शकणार नाही. हा ड्रेस तिनं तमाम मातांना सर्मपित केला होता. अनेकांनी या ड्रेसला अश्लील आणि शरीराचं बीभत्स प्रदर्शन करणारं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर अनेकांनी या ड्रेसवर तिला ट्रोल करत गलिच्छ भाषेत टीका केली आहे. 

सेरेनाच्या या मुस्कटदाबीवर अनेक स्त्रीवादीविश्लेषकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महिलांचं भाव विश्व टिपणा-या स्कॅरी मॉमी (scary mommy)  या वेबसाइटनं सेरेनाच्या नव्या ड्रेसचं सेक्सिझमशी जोडून विश्लेषण केलं आहे. 
या ड्रेसमध्ये सेरेनाचे क्लीव्हिज आणि वक्षस्थळं दिसत नाहीत, त्यामुळे तिच्या खेळाला ग्लॅमर मिळू शकणार नाही, यामुळे तिचा बॉडीसूटला विरोध होत असावा असं भाष्य या वेबसाइटनं केलंय, तर काहींच्या मते सेरेनाचा कॅटसूटच बीभत्स आहे.

  ‘दी गार्डियन’मध्ये चित्ना रामास्वामी यांनी सेरेनावर एक छोटासा लेख लिहिला आहे, यात त्यांनी एका अमेरिकन रेडिओ जॉकीचा कोट दिलाय तो म्हणतो, ‘त्या दोघी (विल्यम्स भगिनी) खेळताना खूपच किळसवाण्या दिसतात, जास्त वेळ मी त्यांना कोर्टवर पाहू शकत नाही.’ 

दुसरा उल्लेख अजून धक्कादायक आहे, Afua Hirsch या ब्रिटिश लेखिकेनं आपल्या पुस्तकात मारीया शारापोवा आणि सेरेनाची तुलना करत म्हटलंय की, ‘कोर्टवर खेळणा-या गो-या स्त्नीची लैंगिकता मनोरंजक असते, याउलट एका काळ्या महिलेची तेवढीच आक्षेपार्ह आणि अश्लील असते.’ 

रामास्वामी यांनी गोर्‍या मानसिकतेच्या वर्णद्वेषाची लाज काढली आहे. पब्लिक फिगर असणा-या व्यक्तींनी जाहीररीत्या विल्यम्स बहिणींची बदनामी केली होती.

कॅटसूट एक प्रकारचा बॉडीसूट आहे त्याला जिम्नॅस्ट परिधान करतात. याला एक वेगळं ग्लॅमर आहे. फॅशन जगतात या पोशाखाला फॅटिश  म्हणजे कामुकता वाढवणा-या वस्त्र प्रकारात गणलं जातं. पण टेनिसमध्ये फ्रॉक किंवा स्कर्ट महिलांसाठी  स्टॅण्डर्ड मानला गेला आहे. फ्रेंच ओपनमध्ये याच वस्त्नांना स्टॅण्डर्ड मानण्यात आलं आहे.

1885 साली अशा प्रकारचा ड्रेस कृष्णवर्णीय खेळाडू ऐन वाइट यानं विम्बल्डनमध्ये परिधान केला होता. 2016 साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये इजिप्तची एक महिला व्हॉलिबॉल खेळाडू कॅटसूटसारखाच बुर्किनीसूट घालून खेळली होती. रिओत दुस-याही अरब राष्ट्रातील महिला खेळाडू बुर्किनी घालून खेळल्या होत्या. अरब राष्ट्रात महिलांचं शरीरावर कमी कपडे असणं निषिद्ध मानलं जातं. 

या बुर्किनीवरून स्वत:ला सुधारणावादी म्हणवणा-यानी या महिला खेळाडूंवर तोंडसुख घेतलं होतं. आता याच वर्गानं सेरेनाच्या बॉडीसूटवर आपल्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन घडवलं आहे. 

टेनिस फेडरेशननंदेखील बाजारुवृत्तीच्या आहारी जाऊन यूएसपीचा असा विकृत पायंडा पाडावा त्याहून अधिक दुर्दैवी आहे.
(लेखक मुक्तपत्रकार आहेत.) 

kalimazim2@gmail.com 


Web Title: Criticism on Serena William's Cat suit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.