मनीषा सबनीस

प्लेबॉय मासिकाचे संपादक हृयूथ हेफनर यांचं नुकतंच निधन झालं. हेफनर म्हणजे नग्नतेचे खंदे पुरस्कर्ते. त्यांची निधनाची बातमी येताच नग्नतेबद्दलचे नवे-जुने वाद पुन्हा झडू लागले.
पाश्चात्य देशांत आणि समाजांतही ‘न्यूइडीटी इज माय राइट’ असं मानणारा एक गट आहे. नग्नतेचे क्लबही काही ठिकाणी चालवले जातात.
काय आहे बरं ही नग्नतेची गोष्ट? नग्नता म्हणजे अश्लीलता का? ही खरोखरच पाश्चात्य संस्कृती आहे का? स्त्री-पुरुष संबंधांमध्ये नग्नतेची नक्की भूमिका काय? असे अनेक प्रश्न या नग्नतेभोवती आहेत.
भारतीय संस्कृतीला नग्नता नवीन नाही. खजुराहोच्या शिल्पांपासून राजा रविवर्मांच्या चित्रांपर्यंत अर्धनग्नता/नग्नता आपण बघत आलो आहोत.
विचारवंत आणि समाज स्वास्थ्य मासिकाचे संपादक- प्रकाशक रघुनाथ धोंडो कर्वे हे सुमारे ८० वर्षांपूर्वी आपल्या मराठी मासिकाच्या मुखपृष्ठावर नग्न स्त्रीचं चित्र छापीत असत. यामागे त्यांचं एक मत होतं - ‘चित्रात किंवा कोणत्याही वस्तूत श्लील/ अश्लील असं काही नसून ते विचार करणाºया माणसाच्या मेंदूत असतं’ असा त्यांचा यामागचा विचार होता.
या सगळ्या कलाकृतींना ‘कलाकृती’ म्हणून महत्त्वाचं स्थान आहे.
तसंच शरीरसंबंधामध्येही नग्नता ही आवश्यक गोष्ट आहे. डॉक्टरांसाठी जशी आजारी व्यक्तींची नग्नता अश्लील नाही. तशी शरीरसंबंधामध्येही नग्नता ही असभ्य किंवा अश्लील नाही.
आपलं शरीर हे आपलं साधन आहे. ज्यायोगे आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी करून घेत असतो. त्यामुळे त्या शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं. तसंच शरीराच्या सगळ्या गरजा समजावून घेणंही महत्त्वाचं. शरीराचा स्वीकारही गरजेचा. आपल्या जोडीदाराबरोबर जवळीक साधताना एकत्र असताना नग्नतेबद्दल अवाजवी लाज, शरम, भीती, न्युनगंड किंवा अंहगंड उपयोगाचा नाही.
अनेकदा बायकांच्या मनात हे सारं कळत नकळत रुतलेलं असतं.
संपूर्ण पृथ्वीतलावर आपल्या सारखे फक्त आपणच आहोत. इथे कोणाचीही कॉपी तयार होत नाही. यामुळे आपण सगळेच एकमेवद्वितीय आहोत. आणि हेच आपलं वेगळेपण आहे. सौंदर्य आहे. रंग, रुप, उंची, वजन, आकार या सगळ्या पलीकडे असते ती म्हणजे स्वत:च्या आणि एकमेकांच्या शरीराची नीट, स्पष्ट ओळख. एकमेकांना देण्यासाठी खूप काही असतं. या शरीराचा एक एक इंच अन् एक एक कोपरा महत्त्वाचा असतो.
शृंगारात काहीही अधिक/ उणं नसतं. फक्त आपलं मन सृजनशील आणि शरीर कृतिप्रवण असलं की झालं. आपल्यालाच आपल्या शरीराची लाज/ कमीपणा वाटत असेल तर समोरचा त्याची बुज कशी राखेल? यामुळे शरीरसंबंधाच्या वेळी नग्नतेची लाज बाळगू नये. शरीराकडे मायेनं पाहायला हवं. त्याच्या गरजा समजावून घ्यायला हव्यात. आवडते/ नावडते स्पर्श, स्पर्शाच्या जागा याकडे नीट लक्ष द्यायला हवं. आपल्या या लांबरुंद देहाइतकं कोणीच ‘आपलं’ नाही.
स्वत:च्या शरीराबरोबरच जोडीदाराच्या शरीरालाही तेवढंच महत्त्व द्यायला हवं.
एखाद्या वाद्यासारखं आहे हे शरीर. बासरी सारखं, व्हायोलियनसारखं. हळुवारपणे हाताळलं तर सूर बरसतात. त्यातून आनंद लहरी अवतरतात. अर्थात, या सगळ्या अनुभवांसाठी हवी थोडी सजगता.
मूलभूत स्वच्छता. स्वच्छ अंघोळ, रात्री दात घासणं, पोट साफ ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे.

आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अनाठायी लाजेला सोडचिठ्ठी. कोणाशीही कसलीही तुलना न करता आपल्या शरीराशी पूर्र्ण गट्टी जमायला हवी.
परस्परांच्या देहाप्रती उत्सुकता आदर वाटायला हवा. शेवटी काय आनंदी व्हावं. नातं रूजावं, बहरावं.
त्यासाठी मग नग्नतेकडे बघण्याची स्वच्छ नजर हवीच!

(लेखिका वित्त अधिकारी असून, ‘लैंगिक शिक्षण आणि मानसशास्त्र’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.