Chhaya who takes responsibility of family after fathers death | वडिलांच्या निधनानंतर घराचा आधारस्तंभ बनलेली कर्तबगार छाया 
वडिलांच्या निधनानंतर घराचा आधारस्तंभ बनलेली कर्तबगार छाया 

मनोहर कुंभेजकर

मुंबई - छाया नाईक एक असे व्यक्तिमत्व जीने तीचे संपूर्ण आयुष्यच त्याग आणि समर्पणातच वेचलं. आयुष्यातली स्वर्णगथ समोर आली आणि स्वतः अविवाहित राहून तीने तीच्या लहान बहिणींची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून स्वतःच्या आईचाही सांभाळ केला.पोलिस खात्यात 37 वर्षे सचोटीने नोकरी केली.सध्या ती मुंबई पोलिस मुख्यालयात प्रशासकीय अधिकरो म्हणून कार्यरत आहे.उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त तीची बहीण मेघा नाईक शाह हिने दैनिक लोकमतशी बोलतांना कर्तबगार छाया विषयी व्यक्त केलेले मनोगत.

वयाच्या १६ व्या वर्षी छायाच्या खांद्यावर ५ बहिणींची जबाबदारी पडली.वडील पोलिस उपनिरीक्षक होते त्यामुळे छायाला ती नोकरी अनुकंपा तत्वावर मिळणार होती मात्र त्यासाठी तीला आणि तीच्या कुटुंबियांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत अजून २ वर्ष वाट पाहावी लागणार होती. त्यामुळे अनेक विनवण्या करून अखेर त्यांना राहत्या घरातच राहण्याची परवानगी मिळाली. वडिलांच्या फंडाचे पैसे आणि कपडे शिवून मिळवलेल्या पैशांतून छायाने मोठ्या हिमतीने घर सावरले.

पौगंडावस्थेत प्रवेश केलेल्या मनात गुलाबी स्वप्न असलेल्या छायाने मात्र आईला धीर देऊन बहिणींची जबाबदारी सांभाळणं हेच एकमेव ध्येय बनलं. त्यात नातेवाईकांनी तोंड फिरवलं मात्र तीच्या वडिलांचे मित्र अण्णा यांनी तिला आधार दिला.अखेर १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर रुपये 543 इतक्या मासिक वेतनावर वडिलांच्या जागी पोलिस खात्यात तीला नोकरी मिळाली.नोकरी ही बाबांची आहे,त्यांचं कर्तव्य ते त्यांची इच्छा असूनही पार पडू शकले नाहीत आता हि माझी जबाबदारी आहे आणि ती मला उचलायलाच हवी असा ठाम मनोनिग्रह करून तरुण छायाने घराबाहेर पाऊल टाकलं. नातन्या मुरडण्याच्या वयात कॉटनची साडी, गळाबंद लांब बाह्यांचा ब्लॉऊज, कानामागे २ वेण्या, काखेला छोटीशी बॅग अन कपाळावर मोठाली टिकली असा तीचा वेष असे. 

छायाने तीचं जग घर,आई आणि तीच्या बहिणींमध्येच पाहिलं. सुट्टीच्या दिवशी लहान बहिणींना अंघोळ घालून त्यांना खाऊ घालणे, पगार झाला कि न चुकता आईस्क्रीम किंवा मिठाई आणणे, सहलीला घेऊन जाणे आदी कौटुंबिक सुख देणा-या जबाबदा-या तीने आनंदाने स्वीकारायची. 

बहिणींसाठी दिवाळी मध्ये महागडा मोती साबण, फुलबाजा, टिकल्या, प्रत्येक बहिणीला १० रुपयांची दिवाळी भेट, आठवड्यातून एकदा तरी जेवणात गोढधोड केलेच जायचे. त्यावेळी घरात टीव्ही असणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण मानले जाई, आपल्या बहिणी शेजारी टीव्ही पाहायला जातात हे स्वाभिमानी छायाला आवडले नाही आणि तीने जिद्दीने हफ्त्यांवर टीव्ही घरी घेतला.ती सकाळी ऑफिस आणि रात्री शिवणकाम करायची. एखादं काम ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय तीला चैन पडत नसे. मग घरातली छोटी-छोटी कामं, वायरिंगची कामं, चप्पल दुरुस्त करणे, स्वयंपाकात मदत करणे, बहिणींचे केस कापणे हि कामे छाया लिलया करत असे.  

सरकारी घरातला राहणं थांबलं आणि नाईक कुटुंबीय मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी भाड्याने राहू लागले. २ वर्षे तीथे राहिल्यावर हक्काचं घर मिळालं.तीचा स्वभाव सरळ आणि रोखठोक. ऑफिसला पोहोचायला वेळेपेक्षा उशीर झाला तर जेवढा उशीर तेवढा जास्त वेळ ती थांबून काम करे.ऑफिसचा फोन स्वतःच्या कामासाठी चुकून तातडीने वापरला तर १ रुपयाचा खोडरबर आणून ऑफिसला देत असे. ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम ऑफिसमध्ये करणे तिला पटत नसे. दुसऱ्या सहका-यांनी तसे केले तर एक जबाबदार व्यक्ती म्हणून ती त्यांना रागावते. 
तीची नवीन नोकरी होती, हातात प्रवासापुरते जेमतेम पैसे असायचे. नोकरीच्या ठिकाणी बक्षीस म्हणून दिवाळीमध्ये सगळ्यांना पैश्यांची पाकिटे येत असत तसेच छायाला सुद्धा १००-१५० रुपये ठासलेलं पाकीट आणून दिलं तर मला हे पैसे कशाला दिले, माझ्या पगाराव्यतिरिक्त हे पैसे आहेत ज्याच्यासाठी मी काहीही केलेले नाही, ते माझे नाही त्यामुळे ते घेणार नाही अशा कडक शब्दात छाया पाकीट देणा-याला सुनावत असे. छायाने ते पाकीट साहेबांना परत केले अन यापुढे कृपा करून मला देऊ नका असेही सांगितले. कुणाचे फुकट घेणार नाही अन कुणाला फुकट घेऊ देणार नाही असा तीचा दंडक असायचा. 

कोवळ्या वयात स्वाभिमानी जगणे, स्वतःवरचा दांडगा विश्वास आणि जाबदारीची जाणीव या भावनेतूनच एक एक करून छायाने सर्व बहिणींची लग्ने लावून दिली. लग्नानंतरचे माहेरवाशिणींचे सगळे लाड पुरवले. बहिणींची बाळंतपणं आणि त्यांच्या मुलांची बारशी थोरल्या भावाप्रमाणे पार पाडली. शिक्षणाची आवड असलेली छायाला फक्त १२ वी पर्यंतच शिकता आले.वयाच्या ४५ व्या वर्षी तिने जिद्दीने एमए ची पदवी प्राप्त केली.आज छायाला पोलिस खात्यात सरकारी नोकरीमध्ये 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. कुणाचे वशिले, शिफारस न घेता अधिकारीपद ती भूषवित आहेत. प्रत्येक भाऊबीजेला साड्यांची ओवाळणी न चुकता प्रत्येक बहिणीला त्या देतात. घरात ५ दिवसांचा गणपती असताना त्या पाहुणचारातच व्यस्त असतात. 

छाया ही गेली काही वर्षे
असाध्य रोगाशी दोन हाथ करून लढा देत आहेत.अशा परिस्थितीत देखील पोलिस खात्यात आपले कर्तव्य मनोभावे पार पाडते.आजार बाळावल्यामुळे गेली ६ महिने घर व डॉक्टर असा नित्यक्रम झाला आहे. मात्र त्यांच्यातला आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर त्या पुन्हा उभारी घेऊन पोलिस खात्यात आपली सेवा सचोटीने करतील असा विश्वास त्यांची बहीण मेघा नाईक- शाह यांनी व्यक्त केला. नेहेमीच व्यस्त असलेल्या छाया यांचा अपवाद असतो तो ८ मार्च या दिवशी कारण या दिवशी तीचा जन्मदिवस असतो.असा हा दुहेरी स्वर्णीम या दिवशी येणं म्हणजे फारच दुर्मिळ अशी गोष्ट आहे असे मत शेवटी त्यांनी व्यक्त केले.
 


Web Title: Chhaya who takes responsibility of family after fathers death
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.