- शुभा प्रभू-साटम

‘आम्ही नाही कधी वापरला तो मायक्रोवेव्ह, फॅडं नुस्ती’ - असले सासूचे टोमणे कानाआड करत मन मारलं, आणि आता ‘आई, अगं ओव्हनमध्ये पिझ्झा गरम कर ना’ - ही लेकाची फर्माईश पुरी करत सुनेसमोर कामं चाललीत! - दोन्ही टोकांना जुळवून घेण्याची 
कसरत हेच सतत नशिबी!!

एक मैत्रीण बऱ्याच दिवसांनी भेटली. गप्पा चालू होत्या. ती थोडी अस्वस्थच वाटली. जरा वेळानं तीच म्हणाली, ‘मुलगी आणि सासरे यांच्या जुगलबंदीत माझी अवघड अवस्था झालीय गं. दोन्हीकडून थपडा. आपली पिढीच विचित्र. आपण आई-वडिलांचं ऐकलं आणि मुलांचंही ऐकून घेतोय!’  वरवर बघायला अगदी साध्या वाटणाऱ्या या वाक्याला मोठा संदर्भ आहे. ही जी लेट फोर्टी म्हणता येईल अशी पालकांची किंवा बायकांची पिढी आहे ना ती अगदी त्रिशंकूच झालीय. जसजसा विचार करत गेले तसतसे पदर उलगडत गेले.


लहानपणी एक खेळ होता. तळ्यात मळ्यात. जी जी जागा उच्चारली जाईल तेथे उडी मारून जायचे. पूर्णपणे अस्थिर असा खेळ. आताच्या ज्या चाळिशी-पन्नाशीच्या बायका मी पाहतेय त्यांचं हेच होतंय (सन्माननीय अपवाद सोडून). साधारणपणे १९६० ते १९७५/७६ पर्यंत जन्मलेली ही पिढी. या काळातल्या बायका अनेक सामाजिक, आर्थिक अन् वैयक्तिक स्थित्यंतरांना सामोऱ्या गेल्यात. आणीबाणी, भूदान, जयप्रकाशजींचं आंदोलन, इंदिरा गांधी, राजीव गांधी हत्त्या, खलिस्तान चळवळ, स्त्रीमुक्ती इथपासून ते आताचे आर्थिक निश्चलीकरण. निर्विवादपणे या घटना राजकीय असल्या तरी त्याचे सामाजिक पडसाद उमटतात नव्हे उमटलेच. फाळणीच्या जखमा या काळातल्या वृद्धांना आजही जशा ताज्या असतात तसंच साधा काळ्या रंगाचा टेलिफोन अप्रुपाचं वाटणाऱ्या या वयोगटातल्या पिढीनं स्मार्टफोन सहजी हाताळण्यापर्यंत मजल मारलीय.

एका वाक्यात मी जरी हा प्रवास सांगितला असला तरी तो बराच मोठा आहे. एका बदलातून दुसऱ्या बदलाला ही पिढी सामोरी गेली आहे. तीही टक्केटोणपे खात. शॉर्टहँड टायपिंगमध्ये धन्यता मानणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी १९९० नंतर संगणक हाताळायला सुरुवात केली. हीच ती पिढी. जुने संस्कार, पद्धती, रूढी-परंपरा आणि नवीन आधुनिक विचार यात ओढाताण होत असणारी. आमच्याकडे सोमवार पाळतात... हे सासूचे ऐकून सोमवार करणारी ही स्त्री आज सुनेची संपूर्ण आधुनिक मानसिकता सहज स्वीकारतेय. गरज म्हणून नोकरी करणारी ही स्त्री आपली लेक चांगली नोकरी सोडून नवं काही करायला बघतेय तिला ती भरभरून पाठिंबा देतेय. आम्हाला मूल नकोच असं स्पष्टपणे सांगणाऱ्या लेकाला समजून घेतेय. समंजसपणे सुनेला वेगळा संसार मांडायला मदत करतेय. लेकीच्या आॅफिसातल्या समलैंगिक सहकाऱ्यांना जेवायला बोलावतेय. मंगळागौरीऐवजी मस्त पार्टी अ‍ॅरेंज करतेय आणि डोहाळेजेवणाऐवजी स्पा डेज साजरे करतेय तेही कौतुकानं आणि मनापासून.


वरील उदाहरणं अगदी वरवरची आहेत पण आजच्या या स्त्रीचा एवढा मोठा प्रवास लक्षात आणून द्यायला पुरेशी आहेत. प्रश्न हा आहे की ही कसरत करताना तिला स्वत:चं मत मांडून त्याप्रमाणे निर्णय घ्यायचे अन् त्याची अंमलबजावणी करण्याचे धैर्य आहे? किंवा तेवढे स्वातंत्र्य तरी तिला आहे का? करिअरिस्ट लेकी-सुनेला समजून घेणारी ही स्त्री स्वत:ला समजून घेऊ शकलीय का? आपल्याला नक्की काय हवंय हे तरी तिला कळलंय का? कळलंच तर ती ते निर्णय घेऊ शकतेय का? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसे कमावणं नाही तर निर्णय घेणंही आहे, हे तिला कळलंय काय?
आजूबाजूला जरा पाहिलं तर वेगवेगळी उत्तरं मिळतात. (मी इथे सर्वसाधारणपणे शहरी आणि निमशहरी भागातल्या स्त्रियांना गृहीत धरलं आहे. ग्रामीण भागात वेगळं चित्र आणि संदर्भ आढळतात.)

आधी म्हटल्याप्रमाणे या स्त्रीची तळ्यात मळ्यात अवस्था आहे हे नक्की. साधं उदाहरण द्यायचं तर फोनच्या खरेदीबद्दल बोलू. नवरा आणि मुलं यांच्याकडे state of art फोन असतात. पण आईकडे मात्र तुलनेने साधा फोन असतो. स्मार्टफोन पण साधा. तेच लॅपटॉपच्याही बाबतीत. तिला ते नकोच असतं असं नाही, तर कुटुंबाच्या आवडीनिवडींना प्राधान्य देण्याची पारंपरिक वृत्ती त्यागता आली नसल्याचं ते द्योतक आहे. ही वृत्ती चूक आहे की बरोबर हा मुद्दा वादाचा ठरू शकतो. त्याचा इथे विचार न करता असं का? हे बघायला हवं. आजची तरुणपिढी स्वतंत्र विचार करणारी आणि स्वत:ला काय हवं आहे याची पूर्ण कल्पना असणारी आहे. आजूबाजूला ते दिसतंच आणि जी वृद्ध पिढी आहे (म्हणजे ६५च्या वरची) ती वृद्ध/ज्येष्ठांना वयामुळे सहजी मिळणाऱ्या आदरामुळे आपल्या आवडी- निवडीबाबत आग्रही आहे. (गंमत म्हणजे late or early forties  मधली पिढीच त्यांचं ऐकते.) मधे भरडली जातेय ती हीच पिढी. त्यातही स्त्री/बाई. तीच असते कायम अस्थिर, तळ्यात-मळ्यात असल्यासारखी. ‘आम्ही नाही कधी वापरला तो मायक्रोवेव्ह. नवीन फॅडं आहे नस्ती’ असे सासूचे उद्गार कानाआड करत, ‘आई अगं पिझ्झा ओव्हनमध्ये गरम कर ना’ ही लेकाची फर्माईश पुरी करतेय. उदाहरण अगदी वरवरचं असलं तरी दोनही टोकांना जुळवून घेण्याची कसरत स्पष्ट करणारे आहे हे नक्की. आणि नेमकी हीच मन:स्थिती या स्त्रीला नेहमी व्यापून असते. जुनं सोडवलं नाही आणि नव्याला घट्ट पकडता येत नाही.
‘तळ्यात-मळ्यात’ या सदरातून आपण याच मन:स्थितीचा विचार करणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रात, अनेक प्रसंगात, नात्यात दृष्टिक्षेपात येणारी ही स्थिती. कधी विनोदी वाटणारी, तर कधी गंभीरपणे विचार करायला लावणारी. कधी हसवणारी, तर कधी कातर करणारी. 
तळ्यात की मळ्यात?

(लेखिका मुक्त पत्रकार असून, स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.) shubhaprabhusatam@gmail.com