- डॉ. मृण्मयी भजक 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मैत्रिणीला फोन केला होता. मैत्रिणीच्या सहा वर्षाच्या मुलीनं फोन उचलला. ती म्हणाली, ‘आई बाथरूममध्ये आहे, काही निरोप सांगू का?’ 
मी म्हटलं, ‘काही खास नाही गं, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता म्हणून सांग.’ 
यावर चिमुरडी मला म्हणाली, ‘मावशी तुझं व्हॉट्सअ‍ॅप बंद आहे का?’ 
‘का गं?’ मी विचारलं. 
‘आई तर व्हॉट्सअ‍ॅपवरूनच सगळ्यांना विश करते. टॉक करतच नाही ती !’ - मुलगी म्हणाली. 
पूर्वी सहज भेटीगाठी व्हायच्या. पूर्वनियोजित वेळ न ठरवता गप्पा रंगायच्या. कालौघात या गोष्टी मागे पडल्या. आणि संवाद हा दूरध्वनीवरून होऊ लागला. पण अत्याधुनिक तंत्रज्ञानानं आता आपण इतके दूर गेलो आहोत की दुरून येणाऱ्या का होईना त्या ध्वनीलाही आपण दुरावलोय. ‘काण्ट टॉक, व्हॉट्सअ‍ॅप ओन्ली’ हा संदेश तुम्ही महत्त्वाच्या कामात किंवा मीटिंगमध्ये असताना ठीक आहे, पण कायमच अशा या स्थितीत राहणं खरंच गरजेचं असतं का? हल्ली प्रत्येक सणाला वेगवेगळ्या माध्यमांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत असतो. बऱ्याचदा मजकूर न वाचताही आपल्याकडून एखादा आलेला मेसेज उत्तरादाखल पाठवला जातो. अगदी शिशुवर्गापासूनचं सर्व मित्रमंडळ एका क्लीकवर उपलब्ध असतं. शाळा, कॉलेज, कामाचं ठिकाण, सोसायटी, प्रवासातील सोबती असे अनेक ग्रुप्स, त्यात पुन्हा मुला-मुलींचा वेगळा ग्रुप असे शेकडो लोक आपल्या हुशार फोनमध्ये असतात. पण मानवी नात्यांचा ओलावा जपण्याची हुशारी ना आपल्या हुशार फोनमध्ये, ना आपल्यामध्ये उरली आहे असं वाटतं. 
असो पण यावर्षी मुद्दाम ठरवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी काही लोकांना फोन केले. विशेषत: अशा लोकांना ज्यांच्या संपर्कात गेले कित्येक दिवस, महिने, वर्षे मी फक्त टेक्स्टमधून आहे. खरंतर फोनसाठी कारण काहीच नव्हतं. नवीन वर्ष फक्त निमित्त. सहज काहीही कारण नसताना फोन करणं हल्ली अगदी विरळ झालंय. कधीतरी फोन आल्यावर, ‘काय गं, बरं आहे न सगळ?’ असा काळजीचा सूर आला तर नवल वाटू नये अशी स्थिती आहे. शिवाय होतं काय, की मेसेजमधून आपण सतत संपर्कात असल्यासारखं वाटल्यानं फोन करण्याची गरजच वाटत नाही. पण ते सगळं कितीही म्हटलं तरी आभासी. म्हणून भेटणं शक्य होत नाही. पण हल्ली बोलणंही माणसं टाळू लागली आहेत असं वाटायला लागलंय. टाळणं म्हणजे एखाद्या व्यक्तीला टाळणं या हेतूनं नाही, तर एकूणातच बोलण्यापेक्षा लोकांना टाईप करणं हे जास्त सहज वाटू लागलंय. एखाद्या माणसाशी लाइव्ह संवाद नकोसा वाटायला लागलाय. एकमेकांना भेटायला, भिडायला माणसं घाबरायला लागली आहेत की काय? अशी शंकादेखील मनात येते. 
मी फोन केल्यावर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. काहींना खूप आनंद झाला. माझ्या काही मैत्रिणींशी मी बऱ्याच वर्षांनी बोलले आणि एकूणच फोनवर दोन्ही बाजूंनी आनंदीआनंद झाला. काही माणसं अशी असतात की ज्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर नियमितपणे बोलणं होत असतं, हास्यविनोद होत असतात, कामासंदर्भात माहितीची देवाणघेवाण सर्रास होत असते. म्हटलं तर दररोज संवाद होत असतो पण आभासी असतो हे फोनवर बोलल्यावर जाणवतं. ती व्यक्ती कशी बोलते हेही आपण विसरलेले असतो. फोनवरच्या पहिल्या हॅलोनंतर ‘अच्छा असा आवाज आहे यांचा’ असंही वाटतं.
पूर्वी पत्रास कारण की असं लिहिण्याची पद्धत होती, आता फोन केल्यावर फोनास कारण की असं न बोललेलं वाक्य गृहीत धरलेलं असतं. पण कधीतरी कारणाशिवाय फोन करण्यातही गंमत असते. हल्ली फक्त टाईप करण्याची इतकी सवय झाली आहे की बोलण्याची इच्छा असूनही काहीशी भीड वाटून अथवा कंटाळा येऊन या गमतीपासून आपण दूरच राहतो. बोलण्याची इच्छाच कमी होणं किंवा त्यासाठी वेळ वाया जातोय असं वाटणं हे माणूसपणापासून दूर जाण्याचं लक्षण आहे असं नाही का वाटत तुम्हाला?
मग बोलायचं का आज कुणाशीतरी कारणाशिवाय?

(लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत.) 

drmrunmayeeb@gmail.com