ललिता कुलकर्णी


दुकानातून किराणा घेतला पण रव्यात अळ्या, शेंगदाणे खवट निघाले. परत करायला गेलो तर दुकानदार ना बदलून देतो ना पटेल असे काही उत्तर देतो. तो त्या मालाची कोणतीही जबाबदारी घेत नाहीये. आता करायचं काय? हे नुकसान कोण भरून देईल?
- अनिल, नांदेड

किराणा घेताना सुटा माल घेत असाल तर तुम्ही तो विकत घेण्यापूर्वी नीट पाहूनच घ्यायला हवा. तरीपण त्यातील काही वस्तू खराब निघाल्या असतील उदा. शेंगदाणे, खोबरे खवट असेल, रवा, पोहे यांना जुनाट वास असेल तर खरेदीनंतर लगेच तक्रार केल्यावर दुकानदारानं तो माल बदलून देणं किंवा तो परत घेऊन ग्राहकाचे पैसे परत देणं ही दुकानदाराची कायदेशीर जबाबदारी आहे.


‘एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही’ ही तळटीप बिल / कॅश मेमो यावर छापता येणार नाही असा ग्राहक न्यायालयाचा निर्णयच आहे. त्यामुळे पावतीवर असं आम्ही छापलंय असं किराणा दुकानदार म्हणत असेल तरी त्याला काही आधार नाही. त्यानं खराब माल परत घ्यायला हवा. पण नसेल तो तसं करत तर स्थानिक ग्राहक संघटना किंवा सामाजिक कार्यकर्ता यांची मदत तक्रार सोडवण्यासाठी घ्यायला हवी. एक मात्र महत्त्वाचं, किराणा घेतल्यानंतर लगेच जर खराब दिसला तर परत करता येऊ शकतो. किराणा जर आपल्याच घरात महिना- दोन महिने पिशव्यांमध्ये पडून असला आणि नंतर आपण तो खराब आहे अशी तक्रार करत असू तर ग्राहकानं माल घरात काळजीपूर्वक न साठवल्यामुळे तो खराब झाला असं दुकानदार म्हणू शकतो.
पण हे सुट्या किराणाविषयी. 
ग्राहकाची तक्रार जर पॅकबंद वस्तूबद्दल असेल. उदा. तेल, तूप इ. तर ग्राहकाला माल घेउन उशीर झाला तरी तक्रार करता येते. प्रत्येक वस्तूच्या वेष्टनावर त्यासंदर्भात काही तक्रार असेल तर ती कुठं करायच याचा पत्ता छापलेला असतो. तेथे ग्राहक पत्र किंवा ईमेलनं तक्रार करू शकतात. त्यात वस्तूमध्ये नेमका काय दोष आहे ते लिहावं. आणि वस्तू बदलून मिळावी अशी मागणी करावी. एखादी स्थानिक ग्राहक संघटना असेल तर या पत्राची / मेलची एक प्रत त्यांना पाठवत असल्याची नोंद पत्रावर करावी. पत्राची एक प्रत दुकानदारालाही द्यावी. उत्पादक कंपनी आपल्या प्रतिनिधीद्वारा किंवा दुकानदाराकडून ग्राहकाला माल बदलून देण्याची व्यवस्था करेल. एका पत्रानं काम न झाल्यास सतत स्मरणपत्र पाठवावं लागेल.
मात्र दुकानदार दाद देत नाही म्हणून गप्प बसू नये.


(लेखिका ग्राहक मंचच्या कार्यकर्त्या आहेत.)