डॉ. मृण्मयी भजक

सानिकाच्या हातावरची मेंदी काढून पूर्ण झाली आणि त्या मेंदीकडे ती पाहतच राहिली. तिच्या चार मैत्रिणींनी मिळून काढलेली ती मेंदी. ‘थँक यू’ एवढंच ती म्हणाली आणि तिला भरून आलं. दोन दिवसानंतर सानूचं लग्न होतं. आपल्या लग्नात, आपल्या हातावर आपल्या जवळच्या माणसांनीच मेंदी काढावी ही तिची इच्छा ! कारण तिला मेंदी आणि त्या मेंदीच्या मागचा ओलावाही ठाऊक होता. लग्नातली मेंदी मैत्रिणींकडूनच काढून घ्यायची हा तिचा आग्रह. खरं तर अगदी सुंदर मेंदी कुणालाच काढता येत नव्हती. पण कुणा पार्लरवालीकडून ती खास मेंदी काढून घेण्याऐवजी कशी का असेना; पण तिच्या जवळच्या मैत्रिणींनीच तिच्या हातावर मेंदी काढावी असं तिनं ठरवलं.
पाच वर्षांची पन्नू अगदी जपून पावलं टाकत होती. कारण तिच्या मामीनं आज तिच्या हाताला आणि पायांना मेंदी लावली होती. ती नक्षी बघून पन्नू अगदी हरखून गेली होती. मेंदी पुसू नये म्हणून काळजी घेत होती.
आशातार्इंनी सकाळी हात धुतले तेव्हा मेंदी छान रंगली होती. त्या मेंदीकडे बघता बघता त्यांच्या डोळ्यातले दोन थेंब हातावर कसे पडले कळलंच नाही. त्यांना त्यांच्या लग्नात काढलेली मेंदी आठवली. आज लेकीच्या लग्नासाठी काढलेली मेंदी त्या डोळे भरून पाहात होत्या.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मेंदीचे रंग वेगवेगळे असतात. हातावर उमटणारे रंग असतातच; पण ते रंग पाहून मनात भरले जाणारे जे रंग असतात ते खरे रंग.
पूर्वी मेंदीचा पाला आणला जायचा. तो म्हणे पाट्या वरवंट्यावर वाटला जायचा आणि ती मेंदी मग हातावर रंग आणायची. पुढे मेंदीची पावडर आली, मग ती भिजवून बोटानं पाच ठिपके काढले जात. मधला मोठा आणि कडेचे छोटे. बोटाची वरची पेरं रंगायची आणि त्याबरोबर नखही. हातावरची मेंदी फिकी होई; पण नखांची लाली तर किती दिवस उतरायची नाही. त्यानंतर काडेपेटीच्या काडीनं छान रेषारेषांची नक्षी काढली जायची. जरा जाडी भरडी असे; पण जपून काढलेल्या त्या रेषा आणि ठिपक्यांमध्ये ओतप्रोत प्रेम पाझरत असे. नंतर मस्त कोन आले. मेंदी अधिक नीटस झाली. वेगवेगळी नक्षी वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध झाली. मेंदी कशीही असली तरी कोणत्याही नक्षीची असली, हातभर असली किंवा पाच ठिपक्यांची असली तरी ती आपल्याला आनंद देऊन जाते.
हल्ली कितीतरी मॉलच्या बाहेर दहा मिनिटात मेंदी काढून देणारे असतात. काही ठिकाणी तर एक तासात रंगणारी मेंदीपण असते. ही म्हणजे झटपट मेंदी. ती काढणं, रंगणं आणि निघून जाणं, तिच्यात रमणं सगळंच झटपट !
पण मायेनं काढलेल्या मेंदीचे रंग हातावरच नाही तर मनातही राहतात..
आठवणी तर रंगलेल्याच असतात कायम!

(लेखिका निवेदिका आणि कार्यशाळा प्रशिक्षक आहेत.)