बेनझीर आणि जेसिंडा, ‘प्रेग्नन्सी पॉलिटिक्स’ला पुरून उरलेल्या महिला नेत्यांची धमक

By लोकमत न्यूज नेटवर्क on Mon, February 05, 2018 2:55pm

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी आपण गरोदर असल्याचं जाहीरपणे सांगितलं, एवढंच नव्हे, तर ‘जगातल्या अनेक स्त्रिया आई होतात आणि कामही सांभाळतात. माझं गरोदरपण हे त्या बायकांसारखंच असेल’, असंही त्यांनी स्पष्ट केलंय, हे विशेष! देशाच्या पंतप्रधानपदी असताना बाळाला जन्म देणाऱ्या त्या जगातील दुसºया महिला ठरतील. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या स्त्रियांच्या मातृत्वात काही कमी अडथळे आलेले नाहीत.. त्याबद्दल!

- कलीम अजीम

गेल्या महिन्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन गरोदर असल्याची बातमी माध्यमात ‘टॉप ट्रेण्ड’ ठरली. पंतप्रधानसारख्या महत्त्वाच्या पदावर असताना मातृत्व स्वीकारणं हा धाडसी निर्णय होता. जेसिंडा आर्डन यांनी मात्र सहजतेनं मातृत्व स्वीकारलं म्हणून त्यांच्या निर्णयाचं जगभरातून स्वागत करण्यात येत आहे. पंतप्रधानपदी असताना बाळाला जन्म देणाºया त्या जगातील दुसºया महिला ठरतील. याआधी १९८८ साली बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना मुलाला जन्म दिला होता. जेसिंडा आर्डन आणि त्यांच्या पतीनं जोडीनं इन्स्ट्राग्रामवर एक फोटो शेअर करत ही बातमी जगाला सांगितली. जगभरातील माध्यमांनी या बातमीला महत्त्व दिलं आहे. ‘दी गार्डियन’ आणि ‘बीबीसी’नं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांचा निर्णय आश्चर्याचा धक्का देणारा असल्याचं म्हटलंय, तर पाकिस्तानच्या ‘डॉन’ वृत्तपत्रानं जेसिंडा आर्डन यांची तुलना बेनझीर भुत्तोंशी करत टीकाकारांबद्दल रोष व्यक्त केला आहे. जेसिंडा आर्डन या न्यूझीलंडच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे ३७ वर्षे वयाच्या पंतप्रधान आहेत. ऑक्टोबर २०१७मध्ये त्या निवडणूक जिंकून पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. शपथविधीच्या अवघ्या सहा दिवस आधी त्यांना प्रेग्नन्सीची बातमी समजली. ‘न्यूझीलंड हेरॉल्ड’ वृत्तपत्रानं जेसिंडा आर्डन यांच्या गरोदरपणासंदर्भात त्यांची एक मुलाखतही प्रसिद्ध केली. मातृत्वासारखा सुखद क्षण अनुभवण्यासाठी आपण सहा आठवड्यांची सुट्टी घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू असताना टीका करणाºयांचीही कमतरता नव्हती. जगभरातील पुरुषी मानसिकता जेसिंडा आर्डन यांच्याविरोधात उतरली होती. प्रेग्नन्सीच्या निर्णयानं जेसिंडा आर्डन सोशल मीडियात ट्रोलही झाल्या. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने मात्र ट्रोलर्सना फटकारलं आहे, ‘आमचं दुर्दैव आहे की, ३० वर्षांनंतरही बेनझीरवर टीका करणारे कमी झालेले नाही’, असं डॉननं म्हटलंय. बेनझीर भुत्तोशिवाय जेसिंडा आर्डन यांची चर्चा पूर्ण होणार नाही. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या निमित्तानं ३० वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं पुनरावलोकन होत आहे. १९८८ साली पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी खंबीरपणे सर्व टीकाकारांना उत्तर दिलं होतं. १९८७ साली बेनझीर भुत्तोचा देशातील सैन्य शासन उलथवून टाकण्याचा लढा सुरू होता. पाकिस्तानचे सैन्यशासक जनरल जिया उल-हक यांनी लोकशाही पद्धतीनं निवडणुका घेण्याचं जाहीर केलं. बेनझीर भुत्तो गरोदर असल्यानं निवडणुकीत भाग घेऊ शकणार नाही असं हक यांना वाटलं. निवडणूक नाट्यानंतर काळजीवाहू सरकार स्थापन करू, असा जिया उल-हक यांचा डाव होता. पण बेनझीर कणखर होत्या. त्यांना वडील झुल्फीखार अली भुत्तोंच्या खुनींना हरू द्यायचं नव्हतं. बेनझीर यांनी निवडणुकीत सहभाग घेतला आणि त्या भरघोस मतानं जिंकूनही आल्या. बेनझीर पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या. पण विरोधकांनी ‘मॅटर्निटी लीव्ह’वरून बेनझीर यांचा छळ सुरू ठेवला. या त्रासात बेनझीर यांनी एका प्री-मॅच्युअर बाळाला जन्म दिला. ‘प्रेग्नन्सी एण्ड पॉलिटिक्स’ या बीबीसीच्या लेखातून त्यांनी आपल्या टीकाकारांना खरमरीत उत्तर दिलं होतं. विरोधकांचे मनसुभे हाणून पाडत त्यांनी मातृत्व स्वीकारलं होतं. अपत्यहीन आणि अविवाहित म्हणून अनेक राजकारणी महिलांना जगभर छळण्यात आलं आहे. २००५ साली जर्मनीच्या चान्सलर अंजेला मर्कल यांच्यावर मूल जन्माला न घातल्यामुळे चिखलफेक झाली होती. आस्ॅट्रेलियाच्या एका बड्या राजकीय नेत्यानं २०१० साली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान राहिलेल्या जुलिया गिलार्ड यांना वांझोटी म्हणून हिणवलं होतं. ‘वांझ महिला शासन करण्यास अनफिट असतात’ अशा गलिच्छ भाषेत जुलिया गिलार्ड यांच्यावर टीका झाली होती. जुलिया गिलार्ड यांनी नंतर सत्तेवर येताच महिलासांठी विशेष कायदे केले. संसदेत महिला खासदारांना बाळाला स्तनपान करण्याचा अधिकारही त्यांनीच ऑस्ट्रेलियन महिलांना दिला. भारतातही एकट्या राजकीय महिलांना छळण्याचा काळाकुट्ट इतिहास आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी, ममता बनर्जी, जयललिता, मायावती, शीला दीक्षित, उमा भारती आणि वसुंधरा राजे यांच्यावर अनेकदा चिखलफेक झाली आहे. मायावती आणि जयललिता यांच्याबाबतीत अनेक गैरसमज नियोजितपणे पसरवले. मुळात महिला अविवाहित आहे की विवाहित, माता आहे की नाही हे सक्षम राजकारणाचं परिमाण असूच शकत नाही. पण आजच्या भारतातही अनेकजण ही तुलना करू पाहतात. मातृत्व हे महिलेच्या आयुष्यातलं एक महत्त्वपूर्ण वळण असतं. मातृत्व हा पूर्णत: स्त्रीचा अधिकार आहे. तो तिच्यावर लादता येत नाही. मातृत्वाबद्दल पाश्चिमात्य देशातील अनेक राष्ट्रात महिलांना मातृत्वाशी निगडित पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आजही मागासच कशाला विकसित देशांतही राजकीय क्षेत्रात कार्यरत महिलांवरही पुरुषप्रधान मानसिकता लादण्याचा प्रयत्न होतो. महिला ते सारं झुगारून इतिहास रचतात हे आजवरचा जगाचा इतिहास सांगतोच. जेसिंडा आर्डन यांच्या निमित्तानं मातृत्व आणि राजकारण हे विषय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, इतकंच. राजकीय क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी काळ अजूनही कठोर आणि त्यांच्या वाटेच्या लढाया बिकट आहेत याचंच हे उदाहरण आहे.

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

संबंधित

भारतीय देहाचे आकार उकार साजरे करण्याची संधी साइज इंडियात आहे. ती कशी?
आपल्या मापाचे कपडे देणारी साइज इंडिया प्रत्यक्षात मिळू लागली तर..
अश्विनी भावे आणि त्यांच्या बाबांचा ‘सुखी माणसाचा सदरा’ एका विलक्षण नात्याची कहाणी.
घर नीटनेटकं ठेवायचं असेल तर लागतं तितकंच घ्या.
देवाच्या गोष्टी.. आता काळानुसार यातही बदल हवाच!

सखी कडून आणखी

भारतीय देहाचे आकार उकार साजरे करण्याची संधी साइज इंडियात आहे. ती कशी?
आपल्या मापाचे कपडे देणारी साइज इंडिया प्रत्यक्षात मिळू लागली तर..
अश्विनी भावे आणि त्यांच्या बाबांचा ‘सुखी माणसाचा सदरा’ एका विलक्षण नात्याची कहाणी.
घर नीटनेटकं ठेवायचं असेल तर लागतं तितकंच घ्या.
देवाच्या गोष्टी.. आता काळानुसार यातही बदल हवाच!

आणखी वाचा