- डॉ. मृण्मयी भजक

गाता येवो ना येवो,
आपण बाथरूममध्ये तरी
गायलाच हवं,
निदान स्वत:साठी!
अंघोळीला गेला आणि काही वेळातच ‘शायद मेरी शादी का ख्याल दिल मे आया है’चे स्वर अक्षरश: बाथरूमच्या दारावर आदळू लागले. त्याच्या या तारस्वराबद्दल तिची नेहमीच तक्र र असे. पण आज मात्र त्या स्वरांनी तिच्या मनावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. दोघांमधलं शीतयुद्ध आज तिसºया दिवशी संपलं होतं; पण तिनं घेतलेला निर्णय खरंच त्याला पटला आहे की नाही याबद्दल ती साशंक होती. तिच्या मनात शंका होतीच की तो अजूनही नाराज आहे. ती त्याला म्हणाली देखील की, ‘उगीच तोंडदेखलं सगळं छान छान आहे असं म्हणण्यात अर्थ नाही.’ पण आता ती निश्चिंत होती. ज्याअर्थी त्यानं बाथरूमात गाणं म्हणायला म्हणजे ओरडायला सुरुवात केली त्याअर्थी स्वारी खुशीत होती हे नक्की.
आपल्यापैकी अनेकांना बाथरूममध्ये गाणी म्हणायची सवय असते. काहींना तर फक्त बाथरूममध्येच गाणं म्हणता येतं. किंबहुना बाथरूममध्ये गेलं की आपोआप ते गाऊ लागतात. काहीजण गाणं गुणगुणतात, काही थोड्या मोठ्या आवाजात म्हणतात, कुणी साबणाचा किंवा शॉवरचा माइक करूनही गाणं म्हणतात, तर काही अगदी भान हरपून गाणं जगत असतात. काहीवेळा गाण्याची मूळ चाल आणि बाथरूममधली चाल यांचा संबंध दुरावला जातो आणि बाथरूमच्या बाहेरून गाणं थांबवण्याचा आदेश येतो; पण अशा बाहेरून येणाºया प्रतिसादाकडे, हसण्याकडे साफ दुर्लक्ष करण्याची ताकद त्या हरहुन्नरी कलाकारांकडे उपजतच असते. एखादी अवघड चाल म्हणण्याचा प्रयत्न करण्यासाठीदेखील बाथरूम ही उत्तम जागा असावी. अगदी तालासुरात गाणारेही बाथरूम सिंगर्स असतात.
बाथरूम ही अशी जागा आहे जिथे माणूस सगळ्यात एकटा आणि कोलाहलापासून दूर असतो. त्यामुळे तो आनंदी असतो आणि गाण्याला आपलंसं करतो. बाथरूम ही जागा आकारानं लहान असते, त्यामुळे स्वत:पुरती बंद असल्यासारखी वाटतं. खूप लोकांसमोर मोठ्या जागेत गाण्याऐवजी हा प्रकार बरा वाटतो. अंघोळ करताना पाण्याच्या आवाजातलं संगीत आणि कंठातलं संगीत याचाही काही संबंध असू शकतो. आणि बहुतेक बाथरूममध्ये टाइल्स असल्यानं ती टणक भिंत गाणा-याला अधिक सुरक्षित वाटत असावी.
अशा भिंतींमध्ये आवाज फार शोषला जात नाही आणि आवाजाचा पोत ऐकायला चांगला वाटतो (निदान गाणा-याला तरी), असं काही परदेशी अभ्यासक सांगतात.
अभ्यासक काहीही म्हणोत आपल्याला त्याच्याशी फारसं देणंघेणं असण्याचं कारण नाही.
आपण त्या जागेचे सुपरस्टार असतो. आपण गावं बिन्धास्त.. स्वत:साठी!


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.