Ashvini Bhave re-lives the magic of docomentaries. | फिल्मी आभासाच्या पलीकडे नेऊन जगण्याची वीण उलगडणारं 'दुसरं’ जग
फिल्मी आभासाच्या पलीकडे नेऊन जगण्याची वीण उलगडणारं 'दुसरं’ जग

-अश्विनी भावे

डॉक्युमेंटरी या माध्यमाशी माझी खरी तोंडओळख झाली ती अमेरिकेत असताना, फिल्म स्कूलला जाण्याच्याही आधी !
नाही म्हणायला तरुणपणी दूरदर्शनवर पाहिल्या होत्या काही.  अर्थात  एचबीओ, नॅशनल जिओग्रॅफिक   वगैरे भारतात आलं नव्हतं. त्यावेळचे दूरदर्शनवर दाखवले जाणारे माहितीपट पाहून मनात या माध्यमाविषयी एक ‘ग्रह’ झाला होता. गूढ-गंभीर आवाजातलं निवेदन आणि मांडणीतला बोजडपणा यामुळे हे माहितीपट पाहाणं म्हणजे नावडत्या शिक्षकाच्या तासाला बकोटीला धरून बसवल्यासारखंच वाटायचं.

तशी नवीनच होते मी अमेरिकेत तेव्हाची गोष्ट ! एकदा सहज एका आळसातल्या दुपारी टीव्ही लावला.  चॅनल्स चाळता चाळता एकावर थांबले. अठराव्या शतकातल्या एका युरोपियन कंपोझरवरचा माहितीपट पाहण्यात मी बुडून गेले. कानावर पडणारं म्युझिक आणि समोर दिसणारी दृश्य.. यात कोण कोणाचं प्रतिबिंब आहे याचा विसर पडावा, असा एक विलक्षण अनुभव होता तो. त्या तरल चित्रातून हळुहळु त्या कंपोझरचं आयुष्य खुलत गेलं आणि माझी ऑपेराशी पहिल्यांदाच ओळखभेट झाली. 

.. तो माहितीपट अजून माझ्या मनात रेंगाळतच होता, तोच आमच्या सार्वजनिक वाचनालयात डॉक्युमेंटरीचं एक अख्खं दालनच मला सापडलं. मग मी त्यावेळच्या त्या व्हिडीओ कॅसेट पाहाण्याचा सपाटाच लावला. या डॉक्युमेंटरीजनी माझ्या पुढय़ात ज्ञानाचं नव दालनच उघडं केलं. अमेरिकेचा इतिहास, तिथलं सिव्हिल वॉर, गुलामगिरीचा इतिहास, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची धोरणं.. मी जिथे राहायला आले होते, तो देश समजून घेण्याचा माझा प्रवास या डॉक्युमेंटरीजनी फार सोपा आणि वेधक केला. कित्ती काय काय पाहिलं मी.. आफ्रिकेचं जंगल, अलास्काचे आइसबर्ग, जगविख्यात चित्रकार व्हॅन गॉग.. आणि असे कितीतरी ! नकळत चित्रपट आणि माहितीपट या मनोरंजनाच्या दोन माध्यमांची तुलना मनात सुरू झाली. चित्रपट जितका आभासी तितकाच माहितीपट सत्याकडे खेचून नेणारा आणि वास्तववादी.

एक चांगला चित्रपट पाहाताना आपण त्यातल्या माणसांच्या गोष्टीमध्ये गुंतत जातो. एक उत्तम डॉक्युमेंटरी पाहाताना आपल्या विचारांना नवी दिशा मिळते, जगाकडे, स्वत:च्या आयुष्याकडे पाहाण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो, गप्पांसाठी-चर्चेसाठी नवे विषय सापडतात आणि वेळ सत्कारणी लागल्याचं समाधानही मिळतं. मनोरंजनाच्या या दोन माध्यमांकडे मी पाहाते तेव्हा जाणवतं, या दोघांची मांडणीची प्रक्रिया किती भिन्न असते ते ! चित्रपट हा आधी बेतला जातो आणि मग संहितेबरहुकूम चित्रित केला जातो. कधी लेखक तर कधी लेखक आणि दिग्दर्शकाची जोडी.. आपल्या कल्पनेतून एक जग निर्माण करतात आणि त्या कल्पनाविश्वाला पटकथेत बंदिस्त करतात. मग दुसरी फळी कामाला लागते. कलादिग्दर्शक त्या बरहुकूम वातावरण निर्मिती करतो.. मग तो भन्साळींनी कल्पिलेला मस्तानी महाल असो अथवा गॅँग्ज ऑफ वासेपूरमधलं रखरखीत चटके देणारं खरबरीत पोताचं वास्तव ! मग कॉस्च्युम्स डिझायनर्स दिग्दर्शकाच्या मनातल्या व्यक्तिरेखांना कपडे चढवतात. आणि कलाकार त्यांना हाडामांसाची माणसं बनवतात. प्रेक्षकांना स्वप्ननगरीत न्यायचं; खोट्या चकचकाटात न्यायचं, की उन्हाचे चटके बसतील इतक्या वास्तव दुनियेत घेऊन जायचं ते असतं कॅमेरामनच्या हातात. थोडक्यात सगळे क्रिएटिव्ह जीव आपापल्या (रंगांच्या) ब्रशनं रंग भरत लेखकानं कागदावर उतरवलेल्या एक मितीच्या चित्राला 3 डी बनवतात आणि प्रेक्षकांना अक्षरश: भुलवतात. डॉक्युमेंटरीची प्रक्रिया याच्याबरोबर उलट असते. वास्तवाचा हात धरून फिल्ममेकर जसा एका प्रवासालाच निघतो, सत्य काय आहे याच्या शोधात ! तसे ढोबळ अंदाज असतात त्याच्या मनात, पण कोरा कॅनव्हास घेऊन तो निघतो. ख-या  खु-या लोकेशनवर जाऊन हाडामांसाच्या माणसांच्या मुलाखतीतून त्या प्रोजेक्टचा पोत ठरत जातो, नि तो विषय उलगडत जातो. शूटिंग संपल्यावर एडिटिंगच्या टेबलावर त्या फिल्मला मूर्त स्वरूप दिलं जातं आणि सर्वात शेवटी त्याचं स्क्रिप्ट लिहिलं जातं. आहे की नाही उलटा प्रवास? जर ही दोन्ही माध्यमं मनोरंजनातच मोडतात, तर चित्रपट दिग्दर्शक आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आपल्या जागांची अदलाबदल करू शकतील का? फार विरळा ! कारण या दोन्ही कामांसाठी फारच वेगळी मानसिकता लागते. 

आफ्रिकेतली डॉक्युमेंटरी पाहताना, एखादा गवा जेव्हा सिंहाला सळो की पळो करून सोडतो, एक हत्तीण आपल्या हरवलेल्या पिल्लाला शोधायला निघते; तेव्हा पुढे काय होणार हे फिल्ममेकरला कुठे ठाऊक असतं? सावज पकडण्यासाठी बिबट्याने केलेला थरारक पाठलाग, त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी हरणाची धडपड, त्याच्या काळ्याभोर डोळ्यातली अगतिकता आणि मग सुटलेली आशा.. काय कमाल चित्रित करतात नाही ते ! त्यांचा वेग टिपणारा कॅमेरा क्षणार्धात हरणाच्या डोळ्यातून आपल्याला त्याच्या अंतरंगात नेतो. पण पुढच्याच क्षणाला   'Survival of the fittest'  या जगरहाटी बरहुकूम आपण प्रेक्षक त्या हरणाच्या डोळ्याला विसरूनही पुढे जातोच, कारण फिल्ममेकर आपल्याला आफ्रिकेतल्या पुढच्या थांब्यावर नेत असतो.. हे चित्रित करणा-या दिग्दर्शकाकडे किती पेशन्स असतो असं वाटत तुम्हाला? आज आपल्या कॅमे-यासमोर काय घडणार आहे याची कसलीही खात्री नसताना ही मंडळी तासनतास कॅमेरा लावून बसतात ते एका अनपेक्षित क्षणाची वाट पाहात ! तेसुद्धा खर्‍याखुर्‍या जंगलात.. सोपं नाही ते. मला आठवतंय, मी आफ्रिकेत गोरांगोरोमध्ये होते. माझा अद्ययावत कॅमेरा मी झुम इन केला. त्याक्षणी त्या सिंहिणीच्या भेदक नजरेतला निखारा दिसला आणि क्षणभरच दचकलेच. खरं तर, ती शांतपणे माझ्या कॅमे-याकडे वळली होती, नि माझी घाबरगुंडी उडाली. खरं तर ती शांत बसली होती; पण मला मात्र ती माझ्यावरच झडप घालेल अशी भीती वाटून कॅमेरा माझ्या हातूनच निसटला. त्यामुळे मी कल्पना करू शकते की नॅशनल जिओग्राफिकच्या फिल्ममेकरना नुसता पेशन्सच नव्हे, तर धारिष्ट्यही किती लागत असेल!!
कॅमेरा वन्य जीवनातला थरार टिपत असो अथवा सागराच्या पोटात आपल्याला नेत असो, तेव्हा आपण प्रेक्षक फक्त बघ्याच्या भूमिकेत असतो. पण मानवानी छेडलेली युद्ध.. मग ती सत्ता लालसेपोटी असोत अथवा धर्माच्या नावाखाली भडकवलेली असोत, डॉक्युमेंटरी फिल्ममेकरचा कॅमेरा जगाच्या एका टोकावरल्या कोण्या देशातली  विमनस्क  झालेली एखादी आई किंवा उद्ध्वस्त गावाच्या एका कोप-यात भयभीत झालेलं एखादं एकाकी पोर जेव्हा चित्रित करतो, तेव्हा हे युद्ध नक्की कोणाचं आहे? ते ‘जिंकणं’ याचा अर्थ काय आहे? - अशा प्रश्नाचं भान जिवंत ठेवतो. अशावेळी हा फिल्ममेकर ह्युमन स्टोरीमध्ये वाहवत न जाणारा हाडाचा पत्रकार  असतो. तो निष्पक्षपातीपणानं सर्वांचं म्हणणं आपल्या पुढे मांडतो आणि आपल्याला मताचं पूर्ण स्वातंत्र्य देतो. त्या बुद्धिमान फिल्ममेकरला स्वत:ची मतं नक्कीच असतात; पण ती प्रेक्षकांवर न लादण्यासाठी त्याला किती संयम ठेवावा लागत असेल? मला स्वत:ला अशा फिल्म्स खूप आवडतात. ढोबळ मानानं पाहिलं तर याखेरीज अजून चार-पाच प्रकार असतात या माहितीपटांचे!

वर सांगितल्याच्या अगदी उलट असतात मायकेला मूरच्या फिल्म्स ! तो, जे त्याला पटलेलं असतं ते सत्य आपल्याला दाखवतो ! ते सत्य की असत्य, खरं की खोटं हे ठरवण्याची मुभा तो प्रेक्षकांना देत नाही. मनोरंजक पद्धतीनं तो त्याचं म्हणणं मोठय़ा हिकमतीने आपल्या गळी उतरवत असतो. माझं विचाराल तर त्याच्या फिल्मशी माझी ‘लव्ह अँण्ड हेट रिलेशनशिप’ आहे. काहीवेळा फिल्ममेकर स्वत:च या फिल्ममधल्या प्रवासात सहभागी होतो. त्यात स्वत:चे मार्मिक भाव व्यक्त करतो आणि निवेदकाच्या भूमिकेत शिरतो. फिल्म स्कूलमध्ये असताना ‘वारली आर्ट अँण्ड कल्चर’ नावाची डॉक्युमेंटरी मी बनवली ती या प्रकारची होती. वारली कलेवरचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्या कलेवरच्या प्रेमामुळे आणि कुतुहलापोटी मी ती फिल्म करायला घेतली. डहाणूच्या पाड्यात जेव्हा राष्ट्रीय पारितोषक विजेते वारली कलाकार जिवा सोमा म्हशे यांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांची चित्र म्हणजे जणू आदिवासींचा जीवनपटच आहे, हे मला उलगडत गेलं. त्यांचा साधेपणाच त्याच्या कलेत दिसतो. मी जाताना काही पक्के विचार घेऊन गेले होते. पण तिथे गेल्यावर मात्र त्यांची जीवनशैली आणि कला यातलं साधर्म्य  दाखवणारं निवेदन मी ऑन द स्पॉट लिहिलं त्यामुळे त्यात ताजेपणा आला.

काही वर्षांपूर्वी मी एका आंतरराष्ट्रीय डॉक्युमेंटरीची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होते. रोजच्या आयुष्यात वापरल्या जाणा-या  केमिकल्सचा आपल्यावर काय परिणाम होतो? त्यावरचा रिसर्च बाहेर येऊ नये याकरिता ही इंडस्ट्री लॉबिंगसाठी कसा पैसा ओतते, याविषयी समग्र माहिती देणारी ‘द ह्युमन एक्सपेरिमेण्ट’ नावाची ही फिल्म ! वर सांगितलेल्या कोणत्या प्रकारात मोडते हे तुम्हीच पाहून ठरवा ! 

आता चित्रपटांच्या आभासी जगात रमायचं,  डेली सोपच्या निबरुद्ध ‘तोच तो’पणात अडकायचं, की सत्यावर आधारलेल्या, जगण्यावर भाष्य  करणा-या , विचारांना नवी दिशा देणा-या आयुष्याचं- विश्वाचं न कळलेलं गुपित उलगडून सांगणारी डॉक्युमेंटरी पहायची? - द चॉइस इज यूवर्स !

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)  

ashvini.bhave19@gmail.com 


Web Title: Ashvini Bhave re-lives the magic of docomentaries.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.