Ashvini Bhave compares pains and pleasures of stage, films, TV serials and ad-films | चार रस्ते
चार रस्ते

ठळक मुद्देव्यक्त-अव्यक्त : वेगवेगळी माध्यमं हाताळताना.. भाग दोन

-अश्विनी भावे

नाटकाकडून चित्रपटाकडे वळलेल्या कलाकारांना दोन्हीतून एका माध्यमाची निवड करायला लावणं म्हणजे पक्षपात आणि प्रतारणा केल्यासारखं आहे. असं असतानाही माझ्या मनानं चित्रपटांनाच कौल का बरं दिला असेल?
रंगमंचावर चालू शोमध्ये आयत्यावेळी काहीही होऊ शकतं, हे जरी खरं असलं तरी काय घडणार हे बहुतांशी कलाकारांच्याच हातात असतं. शिवाय पेपर टाकल्याक्षणी प्रेक्षकच निकाल पत्र तुमच्या हाती देतात, की चुका सुधारून पुन्हा पेपर द्यायला कलाकार मोकळे! या सगळ्यात थरार आहे, झिंग आहे हे खरं ; पण तरीही चित्रपटाच्या  माध्यमात कलाकाराच्या वाट्याला ‘अज्ञात जगात आंधळी-कोशिंबीरी’चा डाव येतो. त्यातला थरार कैक पटीनं मोठा असतो. कसा बरं?

समजा चार व्यक्तिरेखा असलेल्या एखाद्या सीनचे एकूण दहा टेक झाले तर त्या दहा टेकस्मध्ये चोख अभिनय करणं शक्य नाही कारण आम्ही देखील माणसंच असतो. शेवटी चित्रपटात या दहा टेक मधला कोणता शॉट संकलक लावेल आणि त्यात माझा अभिनय बरा असेल का? - कुठे ठाऊक असतं मला? तुकड्या-तुकड्यात चित्रित झालेली भूमिका जोडल्यावर कशी उभी राहिल यावर कलाकाराचं काहीच नियंत्रण नसतं. या सगळ्या शंकाकुशंका, अस्थिरता मनात घेऊन रिलिजपर्यंत म्हणजे कमीत कमी सहा महिने तरी वाट पहायची. चित्रपट हिट झालाच तर अमाप लोकप्रियता, पण पडला तर कलाकारच तोंडावर आपटतात. संवेदनशिलतेशी मांडलेला जुगारच नाही का हा? आणि जुगारात किती नशा असते हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. (हे तुम्ही समजू शकता!) 

लहानपणी कॅलिडोस्कोपच्या नळकांड्यात डोळा घालून पहिल्यावर हरखून गेल्याचं आठवतंय का तुम्हाला? सिनेमा म्हणजे ‘एन्डलेस पॉसिबिलीटीज’चा कॅलिडोस्कोप वाटतो मला! त्यात काम करताना मी आजही हरखून जाते.
या क्षेत्रात काम करताना मनाच्या कक्षा रूंदावल्या, नाटकाच्या मोजमापी आयुष्याच्या तुलनेत हे मोकळीकीचं आयुष्य मला जास्त भावलं आणि नवनवीन माध्यम हाताळायला माझं मन धजावलं, सरावलं!
तीन अंकी नाटक, अडीच तासाच्या चित्रपटावरून माझी गाडी थेट तीस सेकंदावर आली, जेव्हा मला जाहिरात पटांसाठी - म्हणजेच अँड- फिल्मसाठी मागणी येऊ लागली. ही दुनियाच वेगळी! चित्रपटांच्या तुलनेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नेमकेपणा जाणवत असे. जाहिरात आणि चित्रपट हे दोनही व्यवसाय इतके भिन्न आहेत की, त्यांच्या दृष्टीकोन, विषय हाताळण्याची पद्धत, लागणारा वेळ, बजेट, त्यातली मॉडेल्स, कॉन्ट्रक्टस, मिळणारा पैसा,  प्रसिद्धी या सगळ्यातच फरक असतो. चित्रपटात निदान मराठीत तरी स्क्रीन टेस्ट, ऑडिशनची भानगड नव्हती त्याकाळी. चित्रपट निर्माते नाटकाच्या शोला यायचे, तुमच्या कामाचा तोच दाखला असायचा. पण अँड-फिल्मसाठी मॉडेल को-ऑर्डिनेटर होते. त्यांच्याकडे तुमची जाडी, उंची, डोळ्याचा रंग.. सगळं काही टिपलेलं असायचं. तुमची निवड झालीच तर एक जाडजुड कॉन्ट्रॅक्ट तुमच्या हाती यायचं. जितकी मोठी एजन्सी तितकं मोठं कॉन्ट्रॅक्ट! ते इतक क्लिष्ट असतं की ते वाचताना आपण आपलं आयुष्यच लिहून देतोय/गहाण टाकतोय कि काय अशी शंका यावी.

अँड-फिल्ममध्ये इतका नेमकेपणा, क्वॉलिटीला इतकं महत्व का बरं असावं? याचं गुपित ते करण्यामागच्या हेतूत आणि त्याच्या लांबीत आहे.  सिनेमा असतो दोन ते अडीच तासाचा आणि अँड-फिल्म असते एक मिनिट किंवा तीस सेकंदाची. आणि हेतूचं म्हणाल, तर सिनेमा तुम्हाला स्वप्न विकतो आणि अँड-फिल्म वस्तू विकते. म्हणजे पद्धत तीच पण एकाच्या शेवटी तुम्ही फारतर पॉपकार्न, समोसे विकत घ्याल पण दुस-याच्या शेवटी पाकिटात हात घालाल ते वस्तू घेण्यासाठी. या जाहिराती तुमच्या मनाचा ताबा घेतात. आपल्या नकळत आपली लॉयल्टी विकत घेतात, आणि ओघानं खिसा-पाकिट सुद्धा!
एकदा तुमचा ‘लक्ष्य’ ठरलं की सगळ्याच प्रयत्नांना एक(च) दिशा येते. एखादी गोष्ट सांगायला तुमच्याकडे फक्त एक मिनिट आहे असं कुणी सांगितलं तर आपण कसे डायरेक्ट मुद्यालाच हात घालतो. जाहिरातीच्या जगातल्या ‘कॉपी रायटर’कडे हीच हातोटी असते. 100 शब्द खर्च करून ललित लेखनात आपण जे सांगण्याचा प्रयत्न करू  ते तो एका वाक्यात सांगून लक्ष वेधून घेतो आणि या एजन्सी त्या करता त्यांना लठ्ठ पगारही देतात.

परवा मी ‘सोयरे सकळ’ नाटकाचा प्रयोग पाहिला त्यातल्या नऊवारी साड्यासुद्धा रंगसंगती ठरवून केल्या होत्या. त्यामुळे किती मोहक वाटल्या. या रंगसंगतीचं महत्व मला पहिल्या प्रथम कळलं ते अँड-फिल्म करताना शुटींगच्या आधी त्यांची सगळी रंगसंगती ठरलेली असे आणि जे एकदा ठरलं ते ठरलं त्यात आयत्यावेळी बदल वगैरे नाही. रंगच कशाला, त्यांचा प्रत्येक शॉट देखील स्टोरीबोर्डवर ठरलेला असतो.

मी त्याकाळात म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असताना आणि मराठी चित्रपटात स्वत:चा ठसा उमटवला होता त्याकाळात मी लिंटास, त्रिकाया ग्रे सारख्या टॉप एजन्सीजबरोबर कॉन्ट्रॅक्टमध्ये होते. लक्सच्या अँडमध्ये नसेन झळकले पण रिन, सन सिल्क सारख्या मोठय़ा ब्रॅण्डस्च्या जाहिराती केल्या होत्या. खरंतर, कामाचे कमी दिवस आणि जास्त पैसे (मिळकत) म्हणजे मी या क्षेत्रात लक्ष केंद्रीत करायला हवं होतं. पण तसं झालं नाही.
 

रिनच्या जाहिरातीचं  शुटींग मी 3 दिवस करणार होते. शुटींगच्या दिवशी मला एका सुंदर सोफे असलेल्या रूममध्ये नेलं गेलं. तिथे दहा-बारा जण गोलाकार रूममध्ये बसले होते. हे कोण विचारलं तेव्हा कळलं की ते सारे भाषा  तज्ञ किंवा शिक्षक होते. त्या तीन दिवसात मी तीे फिल्म (फक्त टॉकी शॉटस्) 13-14 भाषेत शूट केले. 3 भाषा मला येत होत्या आणि उरलेल्या या शिक्षकांकडून शिकले. यात एक चॅलेंज होतं, गम्मत होती आणि मला ते उत्तम जमलं होतं. अँडची टिमही माझ्या वेगवान (स्पीडवर) कामावर खुष होती. पण मी मात्र खुष नव्हते त्यांच्यावर!

तो बॉक्स कसा धरावा, किती अँगलला तो तिरका वळवावा म्हणजे रिन शब्दावर हायलाईट येईल, किती सेंटीमिटर हसलं तर योग्य वाटेल.. यातला त्यांना अपेक्षित असलेला नेमकेपणाच मला खटकत होता. त्यात कलाकार म्हणून वाव नाही आणि महत्व देखील नाही. शिवाय साबणाच्या वडीचा तोच अँगल, तेच मोजकं हसू 13 वेळा करताना माझं डोकं पिकलं होतं. त्यामुळे पुढे त्या क्षेत्रात माझं मन रमलं नाही. पण तरीही त्यांच्या कामातली शिस्त, पूर्व नियोजन आणि नेमकेपणा आत्मसात करण्याचा प्रयत्न मी आजही  करते.
 या दरम्यान मी आणखी एक माध्यम हाताळलं, ते होतं टीव्ही सिरीयलचं. तेव्हा होतं फक्त दूरदर्शन. आजसारख्या खाजगी वाहिन्या नव्हत्या आणि आजसारखी कामाची जीवघेणी पध्दतही नव्हती.

वपुंच्या  ‘पार्टनर’या कादंबरीवर आधारलेली  टीव्ही सिरियल. बिनय आपटे दिग्दर्शक. पार्टनरला कोण नाही म्हणणार? विजय कदम, सुलभा ताई, विक्रम गोखले अशा उत्तम कलाकारांबरोबर काम करताना शिकायला तर मिळणारच!

- मग तो एक वेगळा प्रवास सुरू झाला.  हे नवीन माध्यम प्रेक्षकांशी जास्त काळ जोडून ठेवतं, थेट त्यांच्या दिवाणखान्यात नेतं, हे जाणवलं. 
मी एकाच वेळेला तीन माध्यमं हाताळत होते. त्याचा ताण होता. एके दिवशी तो ताण अंगावर आला. शुटींगच्या सेटवर लोकांना ‘और एक शॉट’चा मोह आवरत नाही आणि मग कलाकारांच्या अंगाशी येतं. एकदा माझा  ‘वासूची सासू’ नाटकाचा दुपारी 3 चा शो शिवाजी मंदिरला होता. मुंबईच्या दुस-या टोकाला म्हणजे मढ गावात शुटींग चालू होतं. ‘एकच शॉट’ असं करत त्यांनी मला उशिरा सोडलं. त्यावेळी ड्रायव्हर नव्हता माझ्याकडे. मी गाडी हाणली. पण उशीर झाला होता. त्या टेन्शनमध्ये सेनाभवनच्या सिग्नलवर छोटा अँक्सिडेंट झाला. पुढे शिवाजी मंदिरच्या अडनिड्या पार्कींग लॉटमध्ये रिव्हर्स करताना मी गाडी पुन्हा एकदा ठोकली. हृदयात धडधड, मनात गिल्ट आणि चेहरा पडलेला.. अक्षरश: कसा बसा प्रयोग निभावला. शुटींगच्या धबडग्यात नाटकाचं तंत्र सांभाळणं अशक्य वाटायला लागलं आणि काही मग वर्षांकरता तर नाटक सुटलं.

नंतर मी टीव्ही साठी  ‘राऊ’ मधली मस्तानी केली. मी केलेली एकमेव डेलीसोप म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या लढय़ावर आधारलेली ‘युग’!
.. मी अनुभवलेलं टीव्ही सिरीयलचं ते जग वेगळं होतं. चॅनेलची संख्या वाढत गेली, पैशाचं गणित बदललं, स्पर्धा वाढली, कलाकारांची लोकप्रियता तर कित्येक पटीनं वाढली. आता कलाकार इतके थेट दिवाणखान्यात घुसले आहेत की लोक हल्ली पानाभोवती चित्रावली घालताना एक घास आवडत्या सिरिअलच्या नावानं सुध्दा घालतील!

(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आहेत.)

 ashvini.bhave19@gmail.com


Web Title: Ashvini Bhave compares pains and pleasures of stage, films, TV serials and ad-films
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.