Are you happy | खूश आहेस का?
खूश आहेस का?

- मुकेश माचकर

एकट्याचा संसार म्हणजे तारेवरची कसरत, नव्हे, खरं तर तलवारीच्या धारेवरची कसरत. खासकरून त्याच्यासाठी, ज्याच्या मनात दुकटेपणाची चाह आहे, ज्याला कधीतरी दोनाचे चार करायचे आहेत, संसार, मुलंबाळं या सगळ्यात रमायचं आहे.
हा एकटेपणा सुरुवातीला एकदम जाळतबिळत असतो. खासकरून आजारी पडल्यावर, कोणाच्या तरी सोबतीची तीव्र गरज भासावी अशावेळी हा एकलेपणा चहूबाजूंनी अंगावर चाल करून येतो. ‘घर में हैं बस छह ही लोग, चार दीवारें, छत और मैं.’ या नाना पाटेकरांच्या कवितेची आठवण करून देतो. कधी रात्रभर खोकताना, तापात तळमळताना, अंगात त्राण नसल्यानं निपचित पडून राहावं लागल्यावर किंवा कधीतरी तोंडात पांघरूणाचा बोळा कोंबून धाय मोकलून नि:शब्द आकांतानं रडताना ते पाहायला या पाचांशिवाय असतं कोण?
पण एकट्याच्या संसारातली हीच असहाय्यता माणसाला कणखर बनवते. कधीकधी गरजेपेक्षा जास्त.
‘आपले आपणच’ ही भावना आपल्याही नकळत ‘आपल्यासारखे आपणच’च्या पत्त्यावर नेऊन पोहोचवते आपोआप. आसपासच्या कौटुंबिक मंडळींमध्ये एक नातेशरण अवलंबित्व असतं, ते नसलं की माणूस स्वतंत्र होतोच; पण रूक्ष आणि उर्मटही होतो. आपण स्वत:तच परिपूर्ण आहोत, असं वाटायला लागतं. अर्धनारीनटेश्वरासारखं. नराला त्याच्या नावशिक्क्याची मादी नाही इतकंच; बाकी नर-नारी दोहोंच्याही कामांचा भार तो सांभाळतोच आहे सक्षमपणे. मग या सघन एकांतात हव्यात कशाला सोबतीच्या भेगा आणि अवलंबित्वाच्या चिरा?
हाच तो डेंजर झोन. ते खरं तर असहाय्यतेचंच एक रूप असतं. लहान पोरानं मुखवटा घालून मोठ्यांना घाबरवायला निघावं, तसा एक आपण उभा केलेला बागुलबुवा. तो आधी आपल्याच आईबापांना घाबरवतो. एकट्या राहणाºया मुलाला सोबत व्हावी, त्याच्या पोटाला घरचे दोन घास मिळावेत, यासाठी ते वाट वाकडी करून, सवयीचं आणि स्वत:चं घर सोडून त्याच्याजवळ येतात. त्यानं पोराला काही शिस्त लागेल अशीही त्यांची अपेक्षा असते आणि मधून मधून ‘दोनाचे चार’चा विषय काढून त्याला गुंतवण्याची तयारी करावी, असा एक अंत:स्थ हेतू असतो.
पण, तोवर एकलेपणाची इतकी चटक लागलेली असते की मुळात या सद्हेतूंनी आलेल्या मातापित्यांचाच राग यायला लागतो. आपल्या उन्मुक्त एकाधिकारशाहीत हे दोघे का तडमडले आहेत? असं वाटायला लागतं. आईच्या हातच्या ज्या पदार्थांसाठी आपली जीभच नाही तर सगळं अस्तित्त्व आसुसलेलं होतं, ते तोंडात फिरायला लागतात. एकट्यानं जी घरकामं सहज पार पडतात, ती या स्थितीत बोजड वाटायला लागतात. येण्या-जाण्याच्या वेळा आणि तोंडाला, कपड्यांना वेळी-अवेळी येणारे व्यसनांचे वास आणखी खटके उडवतात... मुलगा आता मोठा झाला आहे आणि तो त्याच्या घराचा ‘मालक’ आहे, आपण पाहुणे आहोत, हे आईवडिलांना अतिशय क्रूर पद्धतीनं समजावून देतं हे एकलेपणाचं श्वापद... ते बिचारे कधीतरी थोबाडीत मारल्यासारखे निघून जातात गाशा गुंडाळून. तेव्हा त्यांच्या सोबतीच्या सवयीमुळे वाईट वाटतं ते दोन मिनिटांपुरतंच. पुढे कायम चालतो तो जल्लोष. स्वातंत्र्याचा जल्लोष. एकट्याच्या संसारातली ही वेळ संधिकाळच्या हुरहुर लावणाºया कातरवेळेसारखी डेंजर असते. इथे कधीतरी स्वत:ला समोर ठेवून नीट झाडाझडती घेऊन निवाडा करायला लागतो.
बाबा रे, तुला नेमकं काय हवंय? गीताबालीबरोबर संसारसुख भोगून, दोन अपत्यं जन्माला घालून तिच्या निधनानंतर बेबंद बाई-बाटलीबाज एकल आयुष्य जगलेल्या शम्मी कपूरच्या आत्मचरित्रात असा एक काटा आणणारा प्रसंग आहे. एका पार्टीनंतर एकटा झालेल्या शम्मीनं अखेर धीर करून स्वत:ला समोर उभा करून विचारलं, ‘हे काय केलंस तू तुझ्या आयुष्याचं? तुझ्या मुलांच्या आयुष्याचं? हे सगळं काय चाललंय? हे तुला हवं होतं का? यात तू खरोखरच खूश आहेस का?’ त्यातून मिळालेल्या उत्तरांनी शम्मीचं सगळं आयुष्य बदलून गेलं.
तो आयुष्यात कधीही कोणाही स्त्रीबरोबर संसार करू शकणार नाही, हे त्याच्या जवळच्या यच्चयावत सगळ्यांचं मत खोटं पाडून त्यानं अजिबात ग्लॅमरस नसलेल्या एका स्त्रीबरोबर सुखाचा संसार केला. आधीच्या प्रतिमेपेक्षा संपूर्णत: वेगळ्या रूपात तो दिसल्यावर ‘दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही लग्न’, अशा पैजा लावणारे मित्र तोंडघशी पडले.
हे रूप बाहेरून येत नाही. असलं तर आपल्या आतच असतं. ते आहे की नाही, याचा फैसला या वयात होतो. इथे एक तिढा येतोच येतो. एक रस्ता आयुष्यभर एकट्यानं राहण्याची मजा अनुभवायचा असतो, दुसरा असतो संसाराचा, दुकटेपणाचा फाटा. त्याला आणखी फांद्या फुटण्याची शक्यता असते. एकीकडे प्रबळ ‘स्व’चा प्रखर निखारा चोवीस तास डोळ्यांत तेल घालून हातात घेऊन चालायचं; दुसरीकडे बायको, मुलं, नातेवाईक, सण-समारंभ, जबाबदाºया यांच्या असंख्य रक्तवाहिन्यांसारख्या बारीक बारीक होत जाणाºया सूक्ष्मतंतूंमधून स्वत:ला पातळ करून पाझरवत जायचं.
यातला कोणता मार्ग आपला हे ठरवणं भयंकर कठीण असतं. कोणत्याही मार्गानं गेलं तरी ‘मागे सुटली ती वाट चाललो असतो तर, तीच आपली होती का?’ असं वाटणार असतंच.
एकेकाळी काही वर्षं अनेक तास, अनेक दिवस आणि त्याहून कैकपट रात्री ठार एकटा राहिलेला माणूस संसारात पडल्यानंतर बायको माहेरी निघाली, मुलं-मुलीही सोबत जाणार म्हटल्यावर एकदम असहाय्य होऊन जातो. रात्री माफक पेयपान करून टीव्हीवर जुनी गाणी मनसोक्त पाहता येतील, त्यांच्याबरोबर हसता-रडता येईल, याचं आकर्षण असतं; पण नंतर लाइट मालवायच्या वेळी काय होईल, मालवल्यानंतर काय होईल, ही साधीशी कल्पनाही भयकल्पना बनून बसते. सगळे गेल्यावर काही काळ तो भावविव्हळ होतो. मुलांचे चेहरे डोळ्यांसमोर तरळतात, बायकोचा नुसता वावर कसा घर भरतो आणि ती नसताना जीव तुटका तुटका होतो म्हणजे काय, हे त्याला कळू लागतं. मग तो रात्रीच्या तयारीकडे वळतो. भाज्या चिरता चिरता, फोडण्या देता देता मनानं जुन्या एकलगीताची लय कधी साधली, ते कळतच नाही. तो स्वत:शीच बडबडायला लागतो, हसायला लागतो, दोन पेग पोटात गेल्यावर आरशासमोर उभा राहून रडायलाही लागतो, टीव्हीवरच्या राजेश खन्नाबरोबर, अमिताभबरोबर गाणंही गायला लागतो.
अचानक लक्षात येतं. आपण कम्फर्टेबल आहोत. जाम कम्फर्टेबल. आपल्या कल्पनेपेक्षाही जास्त कम्फर्टेबल.
ही भयकारी जाणीव अंगावर सर्रकन काटा आणून जाते. म्हणजे, अनेक वर्षांच्या एकांतसाधनेतून रक्तात मुरलेलं एकलेपणाचं हटवादी श्वापद आसपासच असतं दबा धरून. नंतरसुद्धा. कायमच.


(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘गृहकृत्यदक्ष’ गृहस्थ असून, दोन मुलींचा बाबा आहे.)


Web Title: Are you happy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.