- सायली राजाध्यक्ष


जगभरात सण हे हवामान व शेतीशी कमी- अधिक प्रमाणात जोडलेले असतात. शेतातली पिकं जेव्हा हाताशी येतात तो काळ म्हणजे सुगीचा. अशा या सुगीच्या काळात हमखास सण-उत्सवांची रेलचेल असते. आपल्या देशातले बहुतेक सण हे असेच शेतीच्या वेगवेगळ्या पर्वांशी जोडलेले आहेत. संक्र ांत म्हणजे ऐन सुगीतला सण. नुकतीच पिकाची कापणी झालेली असते. शिवाय थंड हवामानामुळे भाज्या, फळं, ऊस यांची रेलचेल असते.
संक्रांतीला सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात होते. सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो म्हणून ही मकरसंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत. 
भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात पारंपरिक स्वयंपाक करण्याची पद्धत आहे. मुगाची मऊ आसट खिचडी, बाजरीची भाकरी, टोमॅटोचं सार, लोणी, तिळाची चटणी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भोगीची भाजी. ही भोगीची भाजी न आवडणारा विरळाच. 
भोगीची भाजी ही मिश्र भाजी असते. वांगी, मेथी, गाजर, वालाच्या शेंगा, सोलाणे, मटार, तुरीचे दाणे घालून केलेली ही भाजी अतिशय चवदार लागते. यात फोडणीला तीळ असतातच. मराठी लोक जसे भोगीची भाजी करतात तसंच याच काळात पोपटी, उंधियो याही मिश्र भाज्या केल्या जातात. 
पोपटीमध्येही या काळात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून त्या एका माठात एकत्र केल्या जातात. त्या भाज्यांमध्ये हवा तो मसाला घालून तो घडा जमिनीखाली पुरतात आणि वरती विस्तव पेटवून पोपटी भाजतात.
उंधियोचं वैशिष्ट्य असं की, उंधियोमध्ये मुख्यत: शेंगा आणि कंदांचा वापर जास्त असतो. जसं की मटार आणि तुरीच्या शेंगांचे दाणे, पापडीच्या शेंगा, रताळं, कोनफळ, करंदी, बटाटे हे कंद उंधियोत वापरले जातात. उंधियोच्या मसाल्यात मुख्य असतो तो या काळात भरपूर मिळणारा ओला लसूण. लसणाची पात, कोथिंबीर, ओलं खोबरं, धणे-जिरे पूड, लिंबाचा रस, साखर, हिरव्या मिरच्या, आलं हे सगळं एकत्र वाटून उंधियोचा मसाला केला जातो. इतक्या सगळ्या भाज्यांचा एकत्रित स्वाद आणि वाटलेला ताजा मसाला, शिवाय सढळ हातानं ओतलेलं तेल.. काय बिशाद आहे, उंधियो चांगला न लागण्याची!
संक्रांतीच्या काळात येणारं प्रमुख धान्य म्हणजे तीळ. जेवणातल्या स्निग्ध पदार्थांची गरज भागवण्याचं काम तीळ करतात. संक्रांत जानेवारीत येते. या काळात हवा थंड असते. शरीराला जास्त स्निग्ध पदार्थांची गरज असते म्हणून या काळात तिळाचं महत्त्व. तिळाबरोबर गूळ चवीसाठी तर आहेच पण गूळही शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतो. त्यामुळे तीळ आणि गूळ खाण्याची प्रथा तयार झाली असावी. वर म्हटलं तसं भोगीच्या भाजीत तीळ घातले जातात, तिळाची चटणी केली जाते, इतकंच नव्हे तर टोमॅटोच्या सारात तिळाचं कूट घातलं जातं.
माझ्या माहेरी म्हणजे मराठवाड्यात तिळगुळाचे मऊ लाडू करतात. पाकातले कडक लाडू फार केले जात नाहीत. तिळगुळाचे मऊ लाडू करायला तर सोपे आहेतच पण पाकातल्या लाडूंपेक्षा ते जास्त खमंग लागतात असं माझं मत आहे. तीळ खमंग भाजून घेऊन ते कोमट असतानाच, मिक्सरवर जाडसर फिरवायचे. त्यात किसलेला गूळ (साधा, चिक्कीचा नव्हे) घालून हातानं चांगलं एकत्र करायचं. हवं असल्यास जायफळाची पूड घालायची. नाही घातली तरी चालतं. नंतर हे मिश्रण परत मिक्सरमधून हलकेच फिरवायचं. हातानं हव्या तितक्या आकाराचे लाडू वळायचे. तिळात तेल असल्यामुळे या लाडूंना वरून तेल-तूप घालावं लागत नाही. काहीजण यात सुकं खोबरं, दाण्याचं कूट, खसखस घालतात. पण या पदार्थांनी तिळगुळाच्या लाडूंची चव बिघडते असं मला वाटतं. पाकातले लाडूही बरेच लोक करतात. ते गरम असतानाच वळावे लागतात. हलवा करणं ही तर कलाच आहे. साखरेच्या पाकात गरम असतानाच तीळ घालून तो हलवा फुलवणं हे सुगरणीचंच लक्षण. हलवा करताना हातही भाजतात. संक्रांतीला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा कदाचित समृद्धीशी जोडलेली असावी. नवीन लग्न झालेल्या बाईला आणि लहान मुलांना हलव्याचे दागिने घालतात. हे दागिने पूर्वी घरोघरी केले जायचे. कारण हलवा घरोघरी केला जायचा. आता तर हलव्याचे दागिने करूनही मिळतात.
लहान बाळांना संक्रांतीलाच बोरन्हाण घालतात. बोरं, टहाळा, उसाच्या गंडेऱ्या, कुरमुरे, हलवा, रेवड्या असं सगळं एकत्र करून ते लहान बाळाच्या डोक्यावर ओतायचं. आजूबाजूच्या लहान मुलांना बोलावून त्यांनी हा खाऊ लुटायचा अशी पद्धत.
माझं जेव्हा लग्न ठरलं तेव्हा माझ्या सासूबार्इंनी मला खरेदी करताना सांगितलं की तू लगेचच संक्रांतीची साडी घेऊन टाक. कारण लग्न नोव्हेंबरमध्ये होतं आणि लग्नानंतरचा पहिला सण संक्रांत होता. मुंबईतल्या बनारस सिल्क हाऊसमध्ये मला फार सुंदर काळी तलम म्हैसूर सिल्क मिळाली होती. तलम काळ्या रंगावर फिक्या सोनेरी रंगाची बारीक बुट्टी आणि बारीकसे सोनेरी काठ अशी ती साडी फार सुरेख दिसायची. मी ती साडी खूप नेसली. नंतर ती चिरली तेव्हा फार वाईट वाटलं.
संक्रांतीला काळे कपडे घालतात. बरेच लोक काळे कपडे घालणं अशुभ मानतात. का मानतात हा खरंच प्रश्न आहे, कारण काळे कपडे फार सुरेख दिसतात. पण संक्रांत हा एकमेव सण असा आहे की या सणाला काळेच कपडे घालतात. लहान मुलांना बोरन्हाणालाही काळेच कपडे घालतात. नुसते काळेच नव्हे तर खडीचे काळे कपडे घालतात. खडी म्हणजे पांढऱ्या रंगाचं ब्लॉक प्रिंट. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला बाई आणि पुरुष दोघेही काळे कपडे घालतात. पुरुषांना काळे कुडते, तर बाईला काळी साडी दिली जाते. कदाचित असंही असू शकतं की संक्रांत जानेवारीत येते आणि त्यावेळी थंडी असते, काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून काळ्या रंगाचे कपडे घालायचे.
जे लोक शुभ-अशुभ मानतात त्यांना काळे कपडे घेण्याची ही एकच संधी असल्यामुळे काळ्या रंगाच्या साड्यांमध्ये खूप वैविध्य बघायला मिळतं. काळ्या इरकल आणि त्याला जर्द पिवळे किंवा गडद हिरवे, लाल भडक काठ अशी कॉम्बिनेशन्स उठून दिसतात. हल्ली नारायणपेठी साड्या फारशा दिसत नाहीत. पण काळी नारायणपेठी तलम सिल्क आणि तिला गडद मरून रंगाचे काठ असं कॉम्बिनेशन मला फार आवडायचं. माझ्या आईकडे होती अशी साडी, ती मी अनेकदा नेसले आहे. म्हैसूर सिल्कचा काळा रंग वेगळाच दिसतो. शिवाय म्हैसूर सिल्कच्या बारीक काठांमुळे या साड्यांना एक वेगळाच ग्रेस असतो. काही वर्षांपूर्वी मी त्रिवेंद्रमला गेले होते. तिथे जयलक्ष्मी नावाच्या साड्यांच्या प्रसिद्ध दुकानात काळ्या साड्यांचे इतके सुंदर प्रकार बघितले होते की संपूर्ण दुकान विकत घ्यावं असं मला मनापासून वाटलं होतं! काळ्याभोर कांजीवरमला सोनेरी रंगाची स्कर्ट बॉर्डर, काळ्याच कांजीवरमला पोपटी हिरव्या रंगाची टेंपल बॉर्डर, काळ्या तलम सिल्कला चंदेरी रंगांचे नाजूक वेलबुट्टीचे काठ, पूर्ण काळी थिक सिल्क साडी आणि त्याचा पिवळाजर्द पदर, काळ्या सिल्कवर चांदण्यांसारखी बुट्टी, काळ्या रंगावर सोनेरी पोलका डॉट्स अशा असंख्य काळ्या साड्या तिथे बघितल्या आणि तृप्त झाले. हल्लीच मी एक काळी पैठणी घेतली. पैठणीच्या त्या प्रकाराला महाराणी पैठणी म्हणतात असं मला नुकतंच कळलं आहे. अंगभर काळ्या रंगावर सोनेरी सूर्यफुलांची बुट्टी, अंजिरी रंगाचे काठ आणि अंजिरी रंगाचाच टिश्यू पदर अशी ती साडी आहे. काळी पैठणी घेण्याचं अनेक दिवस मनात होतं. पण पैठणी हा साडीचा असा प्रकार आहे की तो फक्त समारंभांमध्येच वापरता येतो. तो इतरत्र सहजासहजी वापरला जात नाही. म्हणून मी टाळत होते. पण कोल्हापूरच्या इंगळे हाउसमध्ये ती साडी बघितली आणि तिच्या प्रेमातच पडले आणि घेतलीही. नेसल्यावर अंगावर फार सुरेख दिसते ही साडी.
शेवटी काय आहे ना काळी चंद्रकळा म्हटलं की मला इंदिरा संतांचे शब्द आठवतात. त्यांची एक कविता आहे- मीही लाडकी बहीण. त्यात त्यांनी वेगवेगळ्या साड्यांचं इतकं सुरेख वर्णन केलं आहे की ही कविता पुन्हा पुन्हा वाचतच राहावंसं वाटतं. या कवितेत त्या चंद्रकळेबद्दल लिहितात-
आणिक ही चंद्रकळा 
भारी माझ्या आवडीची,
पदराला चंद्र चंद्र 
नक्षत्राच्या कशिद्याची.


(लेखिका मुक्त पत्रकार आणि ब्लॉगर आहेत.)

sayali.rajadhyaksha@gmail.com