- अजित जोशी

दोन बाटल्या परफ्यूम एका माणसाला कशाला लागतं हो एका महिन्यात?’ - रमा तावातावाने सांगत होती. 
‘हो ना, पण दोन नवे जोड लागतात काहो हाय हिल्सचे?’ - स्वामीजींनी मिश्कीलपणे विचारलं. स्वामीजींच्या खोलीत रमा गेल्या महिनाभराच्या हिशेबाचे कागद पसरून बसली होती. ‘नाही म्हणजे, आॅफिस पार्टीला मॅचिंग लागतात ना’ - रमा वरमूनच म्हणाली जरा!
‘ते ठीक आहे हो’ - हसत हसत स्वामीजी सांगायला लागले, ‘असं आपण एकेका गोष्टीचा हिशेब घेऊन बसायचं नाही. आधी एक काम करू, सगळ्या महिनाभराच्या खर्चाची वर्गवारी करू. एक करा घरखर्च म्हणजे किराणा, डॉक्टर, खाऊ, मोबाइल, इंटरनेट, केबल आणि शिवाय रोजचं आॅफिसला जाणं-येणं, डबेवाले वगैरे पण यातच घ्या! हा खर्च आपण टाळूच शकत नाही असा. दुसरा म्हणजे चैनीचा. छान छान कपडे, हॉटेलिंग, सिनेमे, फिरून येणं हे सगळं त्यात. शिवाय व्यसनांचा एक वेगळा हिशेब ठेवा. थोडीबहुत चालणारी आचमन आणि पाकिटं वगैरे त्यात जाऊ दे. मग मुलांचा शिक्षण खर्च आणि याशिवाय तुम्ही नियमित करत असाल असे सगळे खर्च शोधून त्याचेही हवे तसे वर्ग बनवा. आणि मग हा सग्गळा हिशेब हातात घेऊन म्हणा ‘वाढत्या पैशाच्या उपयुक्ततेचा’ मंत्र...!
आता रमाला अनुभवाने माहीत होतं की स्वामीजींचे मंत्र पुटपुटण्याचे नसतात आणि तंत्र तर फारच धमाल असतं. 
स्वामीजी सांगू लागले, ‘म्हणजे असं की समजा तुम्हाला बोनस म्हणून दोन हजार रु पये मिळाले तर तुम्हाला आनंद होईल पण ठीकठाकच. हेच जर तुमच्या घरी काम करायला येणाऱ्या महिलेस मिळाले तर ती म्हणजे काय एकदम खूश होऊन जाईल, हो की नाही? याचं कारण असं की एखाद्या नुसत्या रकमेला मूल्य नसतं, तर ती रक्कम तुम्हाला कशाच्या तरी प्रमाणात पाहावी लागते.’
‘अच्छा, म्हणजे आमच्या आजोबांना सहाशे रुपये पगार होता आणि एक रु पया किलो भाजी होती, असं?’
‘अगदी बरोब्बर, म्हणूनच कोणत्या गोष्टीवर किती पैसे खर्च केले ते पाहू नका, तर किती टक्के खर्च केले ते समजून घ्या. आणि मग तुम्हाला खर्चातल्या तीन यक्षप्रश्नांची चिरंतन उत्तरं मिळतील. पहिला, यातले कोणते खर्च पूर्णपणे अनावश्यक होते? दुसरा, यातल्या कोणत्या खर्चात कटौती झाली पाहिजे होती? आणि तिसरा, कोणत्या खर्चांना कमी खर्चिक पर्याय होता?’
‘व्वा, स्वामीजी, किती चांगलं सांगितलं तुम्ही हे सगळ’ - रमाला हे फारच इंटरेस्टिंग वाटत होतं. ‘पण काय हो, तुम्ही काय ते गुंतवणूक गुरू आहात असं म्हणाली होती नीता आणि आपण अजून गुंतवणुकीविषयी काहीच बोललेलो नाही.’
‘बरं, म्हणजे गुंतवणुकीवर कसं बोलायचं म्हणता?’ - स्वामीजींनीच उलट विचारलं.
‘नाही म्हणजे ते रिटायरमेंट प्लॅनिंगचं असतं काहीतरी आणि मुलांच्या शिक्षणाची पॉलिसी... शिवाय मला वाटलं शेअर्सचं पण सांगाल चांगले रिटर्न्स देणाऱ्या..’ - रमाचं पूर्ण समाधान झालेलं नव्हतं. 
‘छे छे, ये असला सबकुछ हम नही देते...! काय आहे रमा, आपल्या बहुतेकांची हीच चूक होते. आपल्याला गुंतवणुकीचा एखादा पर्याय दिसतो, मग ‘रिस्क’, ‘परतावा’, कराची बचत असले काही काही शब्द आपण ऐकतो आणि काहीतरी मोठ्ठं घबाड मिळाल्यासारखं लगेच चेक फाडायला घेतो. पण गुंतवणुकीची सुरु वात ही नव्हे, ती आहे बचत! आधी बचत म्हणजे काय ते कळायला पाहिजे. ती किती होऊ शकते? कशी करायची? कशी वाढवायची? त्याचा प्लॅन बनला पाहिजे. आणि तो प्लॅन बनवायचा असेल तर खर्चाचा पक्का हिशेब पाहिजे. 
आपल्या बचतीचा अंदाज आला की हळूहळू आपल्याला नक्की कशासाठी गुंतवणूक करायची ते ठरवता येतं आणि मग आपण पर्याय पाहू शकतो.
तेव्हा दृष्टांत लक्षात ठेवा.. 
‘हिशेब म्हणजे लगाम,
बचत म्हणजे आपला घोडा.
आणि घोड्याची ताकद पाहून, कुठं जायचं ते ठरवून जो रस्ता बनतो, तो म्हणजे.. ‘गुंतवणूक’.

(लेखक चार्टर्ड अकाउंटंट असून, मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत.)

dhanmandira@gmail.com