65-year-old Savita Padmawar became an oldest sky driver in the world. How could be possible for her? | ...अन् यवतमाळच्या शेतकरी आजींनी १५,००० फुटांवरून मारली विश्वविक्रमी उडी!
...अन् यवतमाळच्या शेतकरी आजींनी १५,००० फुटांवरून मारली विश्वविक्रमी उडी!

-अविनाश साबापुरे

वयानं पासष्टी गाठल्यानंतर बायका काय करतात?

- अर्थातच नातवंडांत रमतात. तीर्थयात्रांना जातात. छोट्या-मोठय़ा कौटुंबिक सहलींचा आनंद घेतात. स्वत:ला जपत कुटुंबावर मायेचं छत्र धरतात. या वयात धाडस वगैरे शब्द तर त्यांच्या शब्दकोशातून गळून पडलेले असतात. इतरांनाही छोट्या छोट्या गोष्टींसाठी ‘..जरा जपून!’ चा सल्ला आवर्जून  देतात.

पण यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रसच्या सविता पद्मावार या मात्र याला अपवाद आहेत. आपल्या एका उडीनं त्यांनी अवघ्या जगाला आश्चर्यचकित केलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न शहरातल्या आकाशात त्यांनी 15 हजार फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग केलं. त्यांच्या या धाडसाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’नंही घेतली आहे. खरं तर सविता आजीनं ही उडी मागच्याच वर्षी घेतली होती; पण एवढय़ा उंचावरून ही उडी घेऊन आपण काही अचाट पराक्रम केला हे त्यांच्या गावीही नव्हतं. त्या आपल्या या साहसाकडे एक छोटीशी हौस म्हणूनच बघत होत्या. त्यामुळे त्यांच्या माहितीतल्या चार-दोन लोकांशिवाय कोणाला याची खबरबातही नव्हती. मात्र यावर्षी जानेवारीत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं एक विश्वविक्रम म्हणून सविता आजीच्या उडीची नोंद घेतली आणि ही बातमी जगभर पसरली. 

सविता आजीनं घेतलेली उडी जशी कौतुकाचा विषय ठरली तशीच कुतूहलाचाही. वयाच्या पासष्टीत सविता आजीला हे धाडस का करावंसं वाटलं असेल? कोणता हेतू आणि कोणती ऊर्जा असेल या उडीच्या तळाशी, असे प्रश्न लोकं आश्चर्यानं विचारत असताना सविता आजी मात्र, ‘मला विक्रम वगैरे काही करायचा नव्हता. मला इच्छा झाली आणि मी उडी घेतली.’ इतकं सहज आणि शांत उत्तर देतात. सविता आजींना आपली ही उडी म्हणजे जगण्याची हौस वाटते. ‘बायांनी जरा उडलंच पाहिजे’, असा सल्लाही त्या बायकांना देतात.

सविता पद्मावार या यवतमाळपासून 50 किलोमीटर अंतरावर लाख रायाजी (ता. दिग्रस) या खेड्यात राहातात. आपल्या 12 एकर शेतीत आजही त्या पदर खोचून काम करतात. बालपणापासूनच त्यांचं मन फुलपाखरू होतं. सतत धडपडा स्वभाव त्यांना तेव्हाही शांत बसू देत नव्हता आणि आताही.  माहेर मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यातल्या हादगावचं. त्या केवळ दहावीपर्यंत शिकल्या. पण प्रत्यक्ष जीवनाच्या शाळेत त्यांनी बरंच काही अवगत केलं. लग्न होऊन त्या दिग्रसला आल्या. घर चोख सांभाळताना शेतीही त्यांचा प्राण बनली. शेताशिवारात काम करताना शिवारात उडणारे पाखरांचे थवे त्यांना नेहमी आकषरून घ्यायचे. ‘पंख असते तर आपणही नसतो का उडलो’, असं त्या सारखं मनातल्या मनात म्हणत. मुलं शिकली. नोकरीनिमित्त परदेशात आणि शहरात जाऊन स्थायिक झाली; पण  सविता आजी मात्र आपल्या पतीसमवेत दिग्रसमध्येच राहातात. मुलगा-मुलगी अधून-मधून आईवडिलांना अमेरिका अन् ऑस्ट्रेलियाला नेतात.

मागच्या वर्षी सविता आजी सहज म्हणून मुलीकडे अमेरिकेत गेल्या  होत्या. ‘तिथे काही माणसांना त्यांनी आकाशात उडताना पाहिलं. याला स्काय डायव्हिंग म्हणतात हे  त्यांना नंतर कळालं, त्यांना हा प्रकार खूप आवडला. त्यांनी आतापर्यंत शिवारात पाखरं उडताना पाहिली होती. पण माणसांना असं उडताना पहिल्यांदाच पाहिलं. आणि त्यांनाही उडण्याची इच्छा झाली.

मग काही दिवसांनी सविताबाई मुलाकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या होत्या. तिथे बोलता बोलता  ‘आपल्यालाही आकाशातून उडी घ्यायची आहे’ हे त्यांनी सांगितलं. सविता आजींनी ही इच्छा बोलून दाखवताच त्यांच्या सुनेनं त्यांना मेलबर्नच्या समुद्रकिना-यावर नेलं. तिथे स्काय डायव्हिंगची सोय करून देणा-या संस्थेशी त्यांची गाठ घालून दिली.  65 वर्षांची बाई पाहून त्या लोकांनाही जरा आश्चर्यच वाटलं. पण सविता आजींचा हट्ट पाहून त्यांनी  स्काय डायव्हिंगची सर्व माहिती दिली. माहिती देणारे इंग्रजीतून काय बोलत होते हे त्यांना कळत नव्हतं. पण सुनेनं त्यांना समजावून सांगितलं. त्या लोकांनी  टीव्हीवर स्काय डायव्हिंगचा एक पंधरा मीनिटांचा डेमोही दाखवला. डेमोनंतर आणखी थोडी माहिती दिली.  आणि अवघ्या तासाभराच्या या प्रशिक्षणानंतर सविता आजी आकाशात उडण्यासाठी सज्ज झाल्या.

आजीचे हात थरथरले नाही की त्यांच्या काळजात धडधडलं नाही. उलट त्यांचे डोळे नव्या उत्साहानं चमकले. विमानातून 15 हजार फूट उंचीवरून त्यांनी हवेत झेप घेतली. दुसरा कुणी असता तर उडी घेताना पोटात खड्डा पडला असता. पण सविता आजींच्या पोटात फुलपाखरं उडत होती. हे धाडसाबद्दल सविता आजी सांगतात की, ‘माझ्या चेह-यावर त्यावेळी भीतीची एक रेषाही उमटली नाही. उलट उडी घेताना मी आनंदी होते.’ पॅरॉशूटसारखा पडदा उघडेपर्यंत सविता आजी एखाद्या दगडासारख्या जमिनीकडे ‘पडत’ राहिल्या. तो एक मिनिटाचा काळ त्या पूर्ण निराधार होत्या. तेव्हा त्यांचा आत्मविश्वास हाच त्यांचा आधार होता.  ‘आत्ता मिनिटभरात पडदा उघडेल आणि आपण तरंगू’  हा विश्वास त्यांना होता. आणि तो खरा ठरला. पॅरॉशूट उघडल्यावर त्या पाखरू झाल्या. खाली सून, नातवंडं त्यांच्याकडे पाहून ‘चीअरअप’ करत होते अन् सविताबाई स्वत:च्या जीवनाला नव्या उमेदीचे पंख लावत होत्या. पुन्हा जमिनीवर उतरल्या तेव्हा, त्यांच्या चेह-यावर आनंद होता. आपण जीवनात काहीतरी वेगळं केल्याचं समाधान होतं. तो दिवस होता 26 डिसेंबर 2017 आणि ते स्थळ होते मेलर्बनचा सेंट किल्डा हा समुद्रकिनारा. आपण विश्वविक्रम केलाय हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं. पण पराक्रम करणा-याकडे जग मोठय़ा बारकाईनं पाहात असतं. सविता आजीच्या या कामगिरीची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड घेतली. जानेवारी 2019च्या प्रकाशनात लिम्का बुकनं ‘सविता विनायकराव पद्मावार’ हे नाव विक्रमवीर म्हणून कोरलं आहे.  जगातील सर्वाधिक वयोवृद्ध स्कायडाव्हर म्हणून सविता पद्मावार विक्रमवीर ठरल्या आहेत.

वयाच्या पासष्टीत ‘आता काय शक्य आहे’ असं म्हणणा-या बायकांसमोर त्यांनी आपल्या या उडीतून एक नवं उदाहरण उभं केलं आहे. स्वत:चा आनंद पूर्ण करणं हे आपल्याच हातात असतं आणि या आनंदाला वयाची सीमा नसते हेच सविता आजीनं दाखवून दिलं आहे.  

--------------------------

सविता आजी म्हणतात.
‘ग्रामीण भागातील बाई सहसा स्वत:च्या आवडी-निवडीला महत्त्व देत नाही. आपल्या आवडीपेक्षा कुटुंबीयांच्या गरजा लक्षात घेऊनच ती जगत असते. कुटुंबीयांसाठी तर केलंच पाहिजे. पण बाईनं स्वत:च्या इच्छाही जपल्या पाहिजे.’

‘उडण्याचा विक्रम होत असतो, हे मला ठाऊकही नव्हतं. पण पाखरांना उडताना पाहिलं, तेव्हा आपणही का उडू नये, असा प्रश्न मनात आला. विमानात अनेकदा बसले होते. पण नुसतं एकट्या माणसानं पक्ष्यासारखं आकाशात तरंगत राहणं, जमिनीकडे झेपावणं हा प्रकार मला खूप आवडला. म्हणून तो करून पाहण्याचा निश्चय केला. माझ्या या निर्णयाला कुटुंबीयांनीही पूर्ण पाठिंबा दिला. 
‘तुझं वय झालं आहे, तू हे करू नको, 
असं कुणीही मला म्हणालं नाही. 
म्हणूनच सारं शक्य झालं.’

(लेखक  लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)  

lokmatytl@gmail.com


Web Title: 65-year-old Savita Padmawar became an oldest sky driver in the world. How could be possible for her?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.