ringan movie review : रिंगणः आयुष्य जगण्याची सकारात्मक वारी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2017 11:18 AM2017-06-30T11:18:43+5:302017-06-30T16:48:43+5:30

शशांक शेंडे यांची प्रमुख भूमिका असलेला रिंगण...

ringan movie review : रिंगणः आयुष्य जगण्याची सकारात्मक वारी...! | ringan movie review : रिंगणः आयुष्य जगण्याची सकारात्मक वारी...!

ringan movie review : रिंगणः आयुष्य जगण्याची सकारात्मक वारी...!

googlenewsNext
Release Date: June 30,2017Language: मराठी
Cast: शशांक शेंडे, सुहास शिरसाट, शंतनू गांगणे, उमेश जगताप, अभय महाजन, दत्त्तात्रय जगताप, विजय साळवे
Producer: विठ्ठल पाटील, गणेश फुके, महेश येवले, योगेश निकम, मकरंद माने, संजय दावराDirector: मकरंद माने
Duration: 1 तास 45 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>राज चिंचणकर 

पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी यातायात, डोक्यावर कर्जाचा बोजा, निसर्गाची अवकृपा आणि एकूणच पिचलेले आयुष्य अशा रिंगणात तग धरणे म्हणजे तारेवरची कसरतच!  हे दुष्टचक्र शेतकऱ्याशिवाय अजून कुणाच्या वाट्याला येणार? याचा थेट परिणाम म्हणून, आत्महत्येचा पर्याय स्वीकारणारा बळीराजा हे आजचे वास्तव आहे. पण त्यातूनही आयुष्याचा एखादा बंध घट्ट असल्यास, जीवनाची वारी करताना त्यात सकारात्मकतेचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. 'रिंगण' या चित्रपटात याची स्वच्छ प्रतिमा उमटली आहे. 
घर आणि जमीन सावकाराकडे गहाण पडलेली आणि एक लाखाचे कर्ज डोक्यावर असलेला अर्जुन हा शेतकरी या कथेचा नायक आहे. निसर्गाने वाढून ठेवलेल्या रिकाम्या ताटामुळे त्याच्या आयुष्यातच दुष्काळ निर्माण झाला आहे. पदरी ५-६ वर्षांचा अभिमन्यू हा मुलगा आईच्या मायेच्या छत्राला पारखा झालेला आहे. त्यामुळे वडीलच त्याची माऊली आहे. अभिमन्यूला अर्जुन लाडाने 'अबडू' म्हणत असला, तरी कथेच्या दृष्टीने त्याच्या अभिमन्यू या नावाला गहिरा अर्थ आहे. अर्जुनला जगण्याचा अर्थ समजून चुकला असला, तरी अबडूला तो कोण समजावून सांगणार? साहजिकच, त्याच्या नसलेल्या आईचा त्याच्यापरीने शोध सुरु आहे. परिस्थितीला शरण गेलेल्या अर्जुनकडे आप्तांनीही पाठ फिरवली आहे. त्यामुळे तो देवाच्या गावाला, अर्थात माऊलीच्या पंढरपुराकडे निघाला आहे. या देवाच्या गावी येऊनही काम न मिळाल्याने तो माऊलीचे अस्तित्व प्रथम नाकारतो; मात्र एका क्षणी त्याच्या प्रयत्नांना यश येते आणि त्याच्या हाताला काम मिळते. दुसरीकडे, देवाच्या गावी असलेल्या आईला भेटण्यासाठी अबडूचे प्रयत्न सुरु होतात आणि त्याला ती सापडते सुद्धा; मात्र या दोघांचे रिंगण अजून पूर्ण व्हायचे आहे याची जाणीव निर्माण देत करून देत ही कथा या चक्रात फिरत राहते. 
शब्दाविना कळले सारे, अशा पद्धतीची मांडणी लेखक व दिग्दर्शक मकरंद माने याने या चित्रपटात केलेली दिसते. फ्रेम्सचा केलेला अचूक वापर आणि त्यातून 'बिटवीन द लाईन्स' असे बरेच काही सांगण्यात त्याने अजिबात कसूर केलेली नाही. परिणामी, हा चित्रपट खास असा अनुभव देऊन जातो. त्याने बांधलेली कथेची वीण इतकी घट्ट आहे की त्यातून एकही धागा सुटा निघालेला आढळत नाही. मूळ कथेला पंढरीच्या पार्श्वभूमीवर गुंफण्याची कलाही स्तुत्य आहे. परिणामी, ऐन आषाढीच्या माहोलात माणसाच्या मनातल्या माऊलीचे दर्शनही घडले आहे. अभिजीत आब्दे यांचे कॅमेरावर्क लक्षवेधी या पठडीत मोडणारे आहे. अनेक प्रसंग त्यांच्या कॅमेऱ्याने टिपत हा कॅमेरा अधिक बोलका केला आहे. सुचित्रा साठे यांचे संकलन आणि रोहित नागभिडे यांचे संगीत ही सुद्धा या चित्रपटाची जमेची बाजू आहे. 
या चित्रपटात अर्जुन या शेतकऱ्याची भूमिका रंगवणारे शशांक शेंडे यांची अफलातून कामगिरी हे या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य आहे. सच्चेपणा, मुलावरचे प्रेम, डोळ्यांत दिसणाऱ्या परंतु त्यावर ताबा ठेवत ओघळू न देणाऱ्या व्यथा, आयुष्याचे पिचलेपण आणि त्यातून सकारात्मक विचाराची कास धरत चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रा यांचा अजोड संगम त्यांनी त्यांच्या या भूमिकेतून मांडत ठोस परिणाम साधला आहे. साहिल जोशी या बालकलाकाराने त्यांना चांगली साथ दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्याच्यातली निरागसता अबाधित ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने केलेला प्रयत्न सुफळ संपूर्ण झाला आहे. अनेक प्रसंगात त्याचा चेहराही खूप काही बोलून जातो. छोटीशी भूमिका असूनही कल्याणी मुळे हिने तिची ताकद त्यात जाणवून दिली आहे. सुहास शिरसाट, शंतनू गांगणे, उमेश जगताप, अभय महाजन, दत्त्तात्रय जगताप, विजय साळवे आदी कलाकारांनी या रिंगणात चांगली अदाकारी पेश केली आहे. एकूणच, माऊलीचा गजर करत जीवनाकडे चांगल्या दृष्टीने पाहण्यासाठी या रिंगणात उतरण्यावाचून पर्याय नाही. 

Web Title: ringan movie review : रिंगणः आयुष्य जगण्याची सकारात्मक वारी...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.