Dombivli Return Review: एक भरकटलेला प्रवास !

By सुवर्णा जैन | Published: February 22, 2019 04:11 PM2019-02-22T16:11:40+5:302023-08-08T20:09:54+5:30

चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे.

Dombivli Return Review | Dombivli Return Review: एक भरकटलेला प्रवास !

Dombivli Return Review: एक भरकटलेला प्रवास !

Release Date: February 22,2019Language: मराठी
Cast: संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, हृषीकेश जोशी, अमोल पराशर, त्रिक्रिशा शिंदे, सिया पाटील
Producer: करंबोला क्रिएशन्सDirector: महेंद्र तेरेदेसाई
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

डोंबिवली फास्ट चित्रपटातील सामान्य माणसाची व्यथा मांडणारा माधव आपटे रसिकांच्या मनात घर करुन आहे. लोकलमधील विंडो सीटसाठी त्याची हुरहूर आजही अनेक मुंबईकरांच्या रोजच्या लोकल प्रवासाचा अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळे हाच माधव आपटे रुपेरी पडद्यावर पुन्हा कधी भेटीला येणार याची उत्सुकता होती. डोंबिवली रिटर्न या चित्रपटाकडे डोंबिवली फास्ट चित्रपटाचा सिक्वेल म्हणून पाहिलं जात होतं. जे जातं तेच परत येतं या चित्रपटाच्या टॅगलाइनमुळे रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र हा विचार घेऊन तुम्ही डोंबिवली रिटर्न्स चित्रपट पाहण्यासाठी गेला तर तुमचा हिरमोडच होईल.

कारण चित्रपटाच्या शीर्षकामधील डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी सोडलं तर या चित्रपटाचा ‘डोंबिवली फास्ट’शी काहीही संबंध नाही. दोन्ही चित्रपटांची तुलना होऊच शकत नाही. डोंबिवली रिटर्न ही एक पूर्णपणे वेगळी कथा आहे. अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) आणि त्याचं आनंदी कुटुंब यांच्या अवतीभवती या चित्रपटाचं कथानक फिरतं. एक मध्यमवर्गीय दक्षिण मुंबईत सरकारी नोकरी करणारा, दररोज डोंबिवली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा मुंबईची लाइफलाईन लोकलने प्रवास करणारा असा अनंत वेलणकर. त्याचा हा नित्यक्रम सुरु असतो, मात्र अचानक एका घटनेमुळं वेलणकरच्या आयुष्यात एक वादळ येतं आणि ज्यामुळे त्याचं आयुष्य पालटतं. 


अनंत वेलणकर,  मंत्रालयातील जनसंपर्क विभागात काम करणारा प्रामाणिक अधिकारी. आपल्या अनेक वर्षांच्या नोकरीच्या कार्यकाळात एक रुपयाही लाच न घेता निष्ठेने काम करणारा वेलणकर. मात्र त्याच्या हाती एक हायप्रोफाइल हत्येचा पुरावा असणारा फोटो लागतो. राजकारणात दबदबा असलेल्या दादासाहेबांनी कुणा एकाची हत्या घडवून आणल्याचा पुरावा म्हणजे हा फोटो असतो. त्यातच दादासाहेब हे अनंतचे आवडचे राजकारणी. आपल्या नेत्यावर वेलणकरची लयभारी श्रद्धा आणि विश्वास असतो. त्यामुळेच तो आपल्याकडील हा पुरावा दादासाहेबांना नेऊन देतो. या बदल्यात दादासाहेब त्याला भरपूर पैसा, घर असं बरंच काही देऊ करतात. मात्र निष्ठावान आणि तत्त्वांना मानणारा वेलणकर हे सगळं नाकातो. मात्र त्याचा हाच नकार त्याचा घात करतो. यानंतर वेलणकरच्या आयुष्यात मोठं वादळ येतं आणि चित्रपटाची कथा वेग पकडते.

आयुष्यात पैसा नसताना सुखात जगणाऱ्या अनंतचं भरपूर पैसा आल्यावर नेमकं काय होतं याची उत्तरं चित्रपट पाहिल्यावरच मिळतील या चित्रपटाचा पूर्वांध थ्रिलिंग आणि रसिकांना खिळवून ठेवणारा आहे. वेलणकरच्या जीवनात एकामागून एक थरारक गोष्टी घडत जातात आणि कथा आणखी खुलत जाते. अनंतचे त्याची पत्नी उज्ज्वला (राजेश्वरी सचदेव), लेक अंतरा (त्रिक्रिशा शिंदे) आणि भाऊ अनंत (अमोल पराशर) यांच्याशी असलेले भावनिक नातंही या रोमांचकारी कथेसह समांतररित्या उलगडत जातं. संदीप कुलकर्णी यांनी मोठ्या खुबीने अनंत वेलणकर साकारला आहे. त्यांचं अभिनय कौशल्य प्रत्येक दृष्यांमध्ये अगदी उठून दिसतं आणि जे रसिकांना अक्षरक्षा खिळवून ठेवतं. राजेश्वरी सचदेवनं साकारलेली वेलणकरची साधीभोळी पत्नीही कथेला साजेशी वाटते. 


कलाकारांचा दमदार अभिनय आणि कथेतील निरनिराळ्या टप्प्यावर येणारे ट्विस्ट यामुळे चित्रपटाचा पूर्वांध रंजक वाटतो. मात्र उत्तरार्धात चित्रपटाचा वेग मंदावतो आणि बऱ्याच ठिकाणी रसिकांना भ्रमित करणाऱ्या गोष्टी कथेत घडू लागतात. चित्रपटात मसाला म्हणून वापरलेली गाणी आणि आयटम साँग यांचा कथेशी काहीही मेळ बसत नाही. काही प्रसंग आणि घटना चित्रपटाच्या कथेत उगाच का घुसवल्यात असा प्रश्न पडतो. अनंत वेलणकर आणि चित्रपटातील एक व्यक्तीरेखा असलेल्या दीक्षित यांच्यातील हॉट सीनचा चित्रपटाच्या कथेशी काहीही संबंध वाटत नाही. तरीही चित्रपटाचा शेवट काहीसा रंजक आहे. मात्र पूर्वांर्धात रंजक वाटणारा चित्रपट उत्तरार्धात रटाळ वाटू लागतो.  

या चित्रपटाची ताकद म्हणजे कथा आहे. कथालेखक महेंद्र तेरेेदेसाई हेच दिग्दर्शक असल्यामुळे ती पडद्यावरही पूर्वार्धापर्यंत ती नेमकी उतरलीय. मात्र उत्तरार्धात चित्रपट भरकटतो. डोंबिवली फास्ट आणि डोंबिवली रिटर्न यांत फक्त डोंबिवली नाव आणि संदीप कुलकर्णी एवढंच काय ते कॉमन पाहून रसिकांचा मोठा भ्रमनिरास होतो. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू उत्तम आहेत. शिवाय संदीप कुलकर्णी, राजेश्वरीसह इतर कलाकारांनी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.  
 

Web Title: Dombivli Return Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.