Dhappa Marathi Movie Review | Dhappa Marathi Movie Review : एकात्मतेचा हलका फुलका 'धप्पा'
Dhappa Marathi Movie Review : एकात्मतेचा हलका फुलका 'धप्पा'
Release Date: February 01,2019Language: मराठी
Cast: आकाश कांबळे, शारवी कुलकर्णी, अक्षय यादव, शर्व वढवेकर,श्रीहरी अभ्यंकर,दीपाली बोरकर,अभिजीत शिंदे,नील देशपांडे, वृषाली कुलकर्णी,इरावती हर्षे, गिरीश कुलकर्णी
Producer: सुमतीलाल शाहDirector: निपुण धर्माधिकारी
Duration: १ तास ५५ मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

- तेजल गावडे

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आजपर्यंत अनेक चित्रपटांमधून भाष्य करण्यात आले आहे. मात्र आपल्या आजूबाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणणारे असंख्य प्रसंग घडत असतात आणि आपण मात्र अशा गोष्टींकडे कानाडोळा करीत असतो. याच विषयावर हलक्याफुलक्या पद्धतीनं भाष्य करीत एकात्मतेतून प्रत्युत्तर देणारा निपुण धर्माधिकारीचा 'धप्पा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

'धप्पा' चित्रपटाची कथा एका सोसायटीत गणेशोत्सवानिमित्त होणाऱ्या लहान मुलांच्या नाटकावर आधारीत आहे. या सोसायटीतील लहान मुले अनुराधा देवधर उर्फ अनू मावशी (वृषाली कुलकर्णी )च्या मदतीने नाटक बसवित असतात. मानवी उत्क्रांती आणि पर्यावरण या विषयाच्या माध्यमातून मुलांना पर्यावरणाची जाणीव करून देण्यासाठी झाडे पळाली हे नाटक करण्याचे ठरते. या नाटकात परी, तुकाराम, येशु ख्रिस्त यांचा समावेश असतो. मात्र येशुवर आधारीत नाटक असल्यामुळे एका राजकीय नेत्याचे कार्यकर्ते मुलांचा सराव सुरू असतो, त्या ठिकाणी जाऊन सुरक्षारक्षकाला मारहाण करतात आणि मुलांनी बनवलेल्या वस्तूंची नासधूस करतात. इतकेच नाही तर गणेशोत्सवात फक्त गणपतीच असायला हवा, येशू ख्रिस्त येता कामा नये, अशी धमकी ते मुलांना व अनू मावशीला देऊन निघून जातात. त्यानंतर सोसायटीतील रहिवाशी शांतता भंग होऊ नये, यासाठी हे नाटक न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे मुलांचा हिरमोड होतो. मात्र मुले पालकांच्या नकळत हे नाटक गणेशोत्सवात करण्याचा निर्णय घेतात. हे नाटक सोसायटीत होते की नाही किंवा ते गुंड पुन्हा हे नाटक हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात का, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पहावा लागेल.

एका सोसायटीतील मुलांवर हा सिनेमा जरी भाष्य करीत असला तरी तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गुंतून ठेवतो. एका छोट्याशा नाटकातील विविध पात्रांच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या व काळाची गरज असणाऱ्या गोष्टींची जाणीव करून देतो. आपले अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हा संदेश या सिनेमातून बालकलाकारांनी दिला आहे. या चित्रपटात मुलांमधील कलागुण अधोरेखित करण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या सोसायटीतील व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींची आठवण करून देतात. या सिनेमातील मुलांच्या गमतीजमती पाहून आपल्या बालपणींच्या खोडकर व मजेशीर आठवणींना उजाळा मिळतो. त्याशिवाय आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलते. राजकीय व्यक्ती छोट्या कारणांवरून सामान्य नागरिकांमध्ये कशाप्रकारे आपली दहशत माजवू पाहतात, याचे चित्रण उत्तमरित्या केले आहे. इतकेच नाही तर गणेशोत्सवात येशूचा उल्लेख चालत नाही मात्र बिभस्त नाचलेले चालते, असे बरेचसे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत. दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीने गंभीर विषय हलक्या फुलक्या पद्धतीने या सिनेमातून मांडला आहे. या चित्रपटातील सर्व बालकलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे आणि त्यांना वृषाली कुलकर्णी, इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप, ज्योती सुभाष व चंद्रकांत काळे या दिग्गज कलाकारांची साथ लाभली आहे. 

लहान मुलं बऱ्याचदा आपल्या कृत्यातून मोठ्या व्यक्तींना आपल्या चुकांची जाणीव नकळतपणे करून देत असतात आणि या सिनेमातील लहानग्यांनी अभिव्यक्त होण्याचा व एकात्मतेचा हलकाफुलका धप्पा देण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय.


 


Web Title: Dhappa Marathi Movie Review
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.