Bus Stop Marathi Movie:अपेक्षाभंगाचे दुःख मोठे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2017 05:35 AM2017-07-01T05:35:38+5:302023-08-08T19:16:16+5:30

कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणं, मैत्री ट्रेलरमध्ये दिसून येत असून, दुसऱ्या बाजुला पालकांची मानसिकतादेखील सिनेमात मांडण्यात आली आहे.

Bus Stop Marathi Movie: Wretched sorrow ...! | Bus Stop Marathi Movie:अपेक्षाभंगाचे दुःख मोठे...!

Bus Stop Marathi Movie:अपेक्षाभंगाचे दुःख मोठे...!

Release Date: July 21,2017Language: मराठी
Cast: अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, सुयोग गोरे, अविनाश नारकर,संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी
Producer: पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानीDirector: समीर हेमंत जोशी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>राज चिंचणकर


संजय मोने, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी असे अनुभवी व सिनिअर कलावंत; तसेच अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे आदी युवा कलावंत यांची तगडी टीम एकाच चित्रपटात आहे म्हटल्यावर जे काही उत्साहवर्धक चित्र डोळ्यांसमोर येईल त्याला 'बस स्टॉप' हा चित्रपट अपवाद ठरला आहे. इतके नावाजलेले कलाकार एखाद्या कथेचा भाग आहेत म्हणजे ती कथा भन्नाट असणारच; हा अंदाज यात चुकला आहे. त्यामुळे या चित्रपटाची बस चुकीच्या स्टॉपवर येऊन थांबल्याचे चित्र दिसून येते. 

चित्रपटाची कथा म्हणजे तुकड्यातुकड्यांत घडणारे प्रसंग आणि त्यांची मांडणी असे रसायन आहे. नाही म्हणायला, यात प्रेमवीरांच्या जोड्या आहेत, त्यांच्या प्रेमाला घरून होणारा आणि नेहमीचा ठरलेला विरोध आहे; म्हणजे ही कथा तशी ओळखीची आहे. पण तरीही तिची छाप पडत नाही. आघाडीच्या कलावंतांची मोट एकत्र बांधल्यावर तो चित्रपट उत्तमच होणार, हा अति-आत्मविश्वास या चित्रपटाला नडला आहे. मूळ कथेत नसलेला दम आणि त्याची भरकटलेली मांडणी या चित्रपटात आढळून येते. यापूर्वी काही चांगले चित्रपट देणाऱ्या समीर हेमंत जोशी यांनी हा चित्रपट केला आहे, यावर सहज विश्वास बसणे कठीण आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी या चित्रपटाची चौफेर जबाबदारी त्यांनी पेलली आहे; परंतु त्यांची ही मेहनत पडद्यावर वाया गेल्याचे स्पष्ट दिसते. विनोदाच्या नावाखाली वाट्टेल तसा घालण्यात आलेला धिंगाणा म्हणजे हा 'बस स्टॉप' आहे. 

सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, विद्याधर जोशी, अविनाश नारकर यांनी या चित्रपटात जान आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला आहे. परंतु एकूणच या कलावंतांचे 'श्रम' सत्कारणी लागलेले नाहीत. हेमंत ढोमे याने मागच्या पानावरुन पुढे चालू, अशी त्याची अभिनयाची प्रॅक्टिस यातही सुरु ठेवली आहे. यातले नावाजलेले 'युवा' कलावंत कोणत्याही अँगलने कॉलेजमध्ये शिकणारे तरुण विद्यार्थी वाटत नाहीत. संजय मोने, उदय टिकेकर, शरद पोंक्षे यांची झालेली केविलवाणी अवस्था यात नाईलाजाने पाहावी लागते. काय पाहून या मंडळींनी हा चित्रपट स्वीकारला असावा, याचे कोडेही काही केल्या उलगडत नाही. फार काही अपेक्षाच नसतील तर एकवेळ सोडून देता येते; परंतु मराठी चित्रपटसृष्टीतली कलावंतांची उत्तम टीम असूनही या चित्रपटातून निष्पन्न काही होत नसल्याने होणारे अपेक्षाभंगाचे मोठे दुःख मात्र जिव्हारी लागणारे आहे.   


    

Web Title: Bus Stop Marathi Movie: Wretched sorrow ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.