Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review | Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review: असा 'भाई' पुन्हा होणे नाही
Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review: असा 'भाई' पुन्हा होणे नाही
Release Date: February 09,2019Language: मराठी
Cast: सागर देशमुख ,इरावती हर्षे,विजय केंकरे,शुभांगी दामले
Producer: महेश मांजरेकरDirector: महेश मांजरेकर
Duration: १ तास ५४ मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

- अजय परचुरे

सुनिता देशपांडे यांच्या तोंडी सिनेमात एक महत्वाचा संवाद आहे. भाई अर्थात पु.ल.देशपांडे पार्किन्सनच्या आजाराने पुण्यात हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना. सुनिताबाई बाहेर त्यांच्या शुध्दीवर येण्याची वाट पाहत असतात.कोेणीतरी त्यांना म्हणतं की बाई जरा घरी जा..थोडा वेळ आराम करा .तेव्हा बाई म्हणतात नाही मी थांबते विज्ञानाने काही चमत्कार केला तर भाई शुध्दीवर येईल. आणि शुध्दीवर आल्यावर मी नाही दिसले तर तो खजिल होईल. सुनिताबाईंच्या या वाक्यातच भाई व्यक्ती आणि वल्ली सिनेमाच्या उत्तरार्ध भागाचा अर्थ दडलाय.. अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या पु.ल.देशपांडे या एका अवलिया माणसाची जीवनकथा पूर्वाधात अनुभवल्यानंतर उत्तरार्धात त्यांच्या अजून काही घटनांचा आलेख अनुभवण्याचं रसभरीत भाग्य प्रेक्षकांना लाभणार आहे. विज्ञानाची खरंच का कृपादृष्टी असती तर हेच भाई अजून बरीच वर्ष रसिकांच्या मनावर राज्य करत असते. त्यामुळे असा भाई एकमेवच ,असा भाई होणे नाही ही भावना पूर्वाधात आलीच होती. मात्र उत्तरार्धात ती तुम्हांला पाहिल्यावर अजून दृढ होते. 


    पूर्वाधात भाईंच्या लहानपणापासून ते लग्नापर्यंतच्या आणि सुरवातीच्या कलाक्षेत्रातील जडणघडणीच्या रंजक कथा दाखवण्यात आल्या. पूर्वार्ध संपताना कुमार गंधर्व,भीमसेन जोशी आणि वसंतराव देशपांडे आणि पेटीवर दस्तुरखुद्द भाईंची बोटं फिरत असताना आणि त्या सुरेल मैफिलीचा आस्वाद घेताना पुढे जाऊन महाराष्ट्रात पु.ल.देशपांडे हे रसायन हास्याचा धुमाकुळ घालणार आहे हे निश्चित स्पष्ट होते.  दिग्दर्शक महेश मांजरेकर ,पटकथाकार गणेश मतकरी आणि संवादकार रत्नाकर मतकरी यांनी तितक्याच सफाईने उत्तरार्धही रंगवला आहे.उत्तरार्धात भाईंच्या दूरदर्शनाच्या कामापासून त्यांच्या राजीनाम्यापर्यंत आणि मराठी रंगभूमीवर बटाट्याची चाळ साकारण्यापासून अद्भुत अशी मराठी नाटकं रसिकप्रेक्षकांना देण्याचा काळ झरझरपणे सरकत जातो. या प्रवासात सुनिताबाईंनी भाईंना दिलेली साथ आणि त्याचवेळी रसिकांच्या मनावर राज्य करणारे भाई , आनंदवन,मुक्तांगण अश्या समाजपोयोगी गोष्टींना सढळ हस्ताने मदत करणारे भाई, आणि आणीबाणीच्या काळात न डगमगता विचारस्वातंत्र्यांचा पुरस्कार करणारे भाई हे कित्येक पैलू सिनेमात एकामागोमाग एक येत असतात. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात आलेली दत्तारामपासून ते भक्ती बर्वे आणि आचार्य अत्रे, विजय तेंडुलकर ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंतची झंझावती व्यक्तिमत्वं ही अगदी चपखलपणे या दरम्यान आपल्याला भेटत जातात. त्यामुळे पूर्वाधापेक्षा सिनेमाचा उत्तरार्ध जास्त रंजक आणि वेगवान वाटतो. 
    पूर्वाधात भाईंची आणि सुनिताबाईंची भूमिका साकारणारे सागर देशमुख आणि इरावती हर्षे ह्या भागातही आपलं काम तितकंच चोख करतात मात्र वृध्दापकाळातील विजय केंकरे आणि शुभांगी दामले यांनी साकारलेली भाई आणि सुनिताबाईंची पात्रेही तितकीच सुंदर झाली आहेत. विजया मेहता यांच्या तरूणपणातील आणि वृध्दापकाळातील भूमिका साकारणाºया अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि नीना कुलकर्णी यांनी विजयाबाईंना हुबेहुब साकारलं आहे. बाबा आमटेंची भूमिका साकारणाºया संजय खापरेचं आणि बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाºया सारंग साठे यांनी छोट्या प्रसंगातही कमाल केली आहे. 
    पूर्वाधात सिनेमाच्या संगीताने खरंच जान आणली होती. उत्तरार्धातही नाच रे मोरा आंब्याच्या वनात आणि दिग्गजांची पुन्हा रंगलेली अलौलिक मैफिल कानाला तृप्त करते. आणि ही मेजवानी संगीतमय स्वरूपात पुन्हा अनुभव करून देण्यासाठी संगीतकार अजित परब यांची मेहनत दिसते. 
    सिनेमात एके ठिकाणी भाई आणि सुनिताबाईंच्या बोलण्यात भाईंचा कलेचा वारसा आता पुढे कोण सांभाळणार असा विषय होतो. भाईंचं उत्तरही त्यावर अगदीच समर्पक असतं. कलेला वारसा नसतो. वारसा वगैरे सब झूठ है... भाईंची कला ही महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात घट्ट रूतून बसलेली आहे.त्यामुळे वारसापेक्षा त्यांच्या साहित्यात रममाण होता होता असा भाई होणे नाही हेच खरं. 
 


Web Title: Bhai Vyakti Ki Valli Part-2 Marathi Movie Review
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.