Barayan Movie Review:परीक्षेची कठीण प्रश्नपत्रिका...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 10:00 AM2018-01-12T10:00:26+5:302023-08-08T19:16:16+5:30

पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि मुलांचा वेगळ्याच विषयाकडे असलेला कल,यात नाविन्य असे फार काही नाही.'वन लाईन स्टोरी' असलेल्या या चित्रपटात बऱ्यापैकी सरमिसळ झाली आहे.

Barayan Movie Review: Trial test paper ...! | Barayan Movie Review:परीक्षेची कठीण प्रश्नपत्रिका...!

Barayan Movie Review:परीक्षेची कठीण प्रश्नपत्रिका...!

Release Date: January 12,2018Language: मराठी
Cast: प्रतिक्षा लोणकर, नंदु माधव, वंदना गुप्ते, स्वरांगी साने, उदय सबनीस, रोहन गुजर, कुशल बद्रिके
Producer: दैवता पाटीलDirector: दीपक पाटील
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
या घरात बारावी इयत्तेचा पाल्य आहे, त्या घरात निदान त्या वर्षी तरी त्याच्या पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो.चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होणे, इतकीच त्या पालकांची इच्छा नसते; तर त्यानंतर आपल्या मुलाने आपल्याच आवडीच्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा अशी त्यांची अपेक्षाही असते.यात त्या पाल्याची मोठीच कुचंबणा होऊन जाते.या सगळ्या प्रकारावर 'बारायण' हा चित्रपट प्रकाश टाकत असला,तरी एकूणच परीक्षेची ही प्रश्नपत्रिका चित्रपटाला थोडी कठीण गेल्याचे दिसून येते. 

या चित्रपटातला अनिरुद्ध हा बारावीच्या परीक्षेत त्याच्या पालकांना अपेक्षित असलेले गुण मिळवू शकत नाही. त्यामुळे त्याने मेडिकल करावे, या त्याच्या पालकांच्या इच्छेला मूठमाती मिळते. सरतेशेवटी, त्याची रवानगी इंजिनिअरींगला होते.पण हे क्षेत्रही अनिरुद्धच्या पचनी पडत नसल्याने, तिथेही त्याची घुसमट होते.इतिहास ही त्याची खरी आवड असते; परंतु आई-वडिलांच्या दबावामुळे त्याची गाडी रुळावरून भरकटत जाते. हा या चित्रपटाचा सारांश आहे. 

दीपक पाटील यांची कथा व दिग्दर्शन आणि निलेश उपाध्ये यांची पटकथा व संवाद,या माध्यमातून हा चित्रपट घडला आहे. पालकांच्या मुलांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा आणि मुलांचा वेगळ्याच विषयाकडे असलेला कल,यात नाविन्य असे फार काही नाही.'वन लाईन स्टोरी' असलेल्या या चित्रपटात बऱ्यापैकी सरमिसळ झाली आहे.काही प्रसंगांचे संदर्भ नीट लागत नाहीत. मूळ विषयाला बगल देत काहीतरी अवांतर घडत असल्याचा फील अनेकदा येत राहतो.वास्तविक, हा विषय जुना असला तरी महत्त्वाचा आहे आणि त्यादृष्टीने यावर काही नवे काम झाले असते; तर चित्र वेगळे दिसले असते. 

अनुराग वरळीकर याने यात साकारलेल्या अनिरुद्धवर चित्रपटाचा संपूर्ण फोकस आहे आणि त्याची योग्य जाण ठेवून त्याने हा अनिरुद्ध उभा केला आहे.त्याच्या पालकांच्या भूमिकेत असलेले नंदू माधव आणि प्रतीक्षा लोणकर यांनी अनुभवाच्या जोरावर ठोस कामगिरी केली आहे.आयुर्वेदाचा छंद असलेले संजय मोने यांचे शेजारचे काका आणि ओम भूतकर याचा कॉलेजमधला भाई लक्षात राहतो. वंदना गुप्ते, स्वरांगी साने, उदय सबनीस, रोहन गुजर, कुशल बद्रिके आदी कलाकारांची पूरक साथ चित्रपटाला आहे.थोडक्यात, बारावीच्या संदर्भाने येणाऱ्या या विषयावर वेगळ्या दृष्टीकोनातून चिंतन केले गेले असते, तर या परीक्षेत चांगली गुणवत्ता प्राप्त होऊ शकली असती. 

Web Title: Barayan Movie Review: Trial test paper ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.