Zero Movie Review : बऊआ सिंग ‘हिरो’, कथानक ‘झिरो’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:59 PM2018-12-21T12:59:04+5:302023-08-08T19:47:32+5:30

 या चित्रपटातील बऊआ सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहरुख खानने अपार कष्ट घेतले. त्याची ही मेहनत पडद्यावर दिसतेही. पण तरिही बऊआची जादू फिकी ठरते.

shahrukh khan katrina kaif anushka sharma zero movie review | Zero Movie Review : बऊआ सिंग ‘हिरो’, कथानक ‘झिरो’!!

Zero Movie Review : बऊआ सिंग ‘हिरो’, कथानक ‘झिरो’!!

Release Date: December 21,2018Language: हिंदी
Cast: शाहरुख खान,अनुष्का शर्मा,कॅटरीना कैफ,तिग्मांशु धूलिया,ब्रिजेंद्र काला,जीशान अय्यूब
Producer: गौरी खान Director: आनंद एल राय 
Duration: २ तास ४४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

-जितेंद्र कुमार 

 एका मनोरंजक आणि आश्वासक चित्रपटाचा कसा ‘सत्यानाश’ केल्या जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘झिरो’ हा चित्रपट.  या चित्रपटातील बऊआ सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहरुख खानने अपार कष्ट घेतले. त्याची ही मेहनत पडद्यावर दिसतेही. पण तरिही बऊआची जादू फिकी ठरते. बऊआची कथा सांगणा-या या चित्रपटाचा पहिला भाग मनोरंजक वाटत असताना  दुसरा भाग निराशा करतो. चित्रपट हळूहळू भरकटत जातो आणि शाहरुख असो वा अनुष्का- कॅटरिना सगळ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्या जाते.

 कथा आहे बऊआ सिंग (शाहरुख खान) या मेरठमध्ये राहणा-या दिव्यांगाची. दिव्यांग म्हणून जन्माला आलेला बऊआ उंचीने बुटका असतो. पण मौजमज्जा, धम्माल करण्यात सगळ्यांत पुढे. मित्रांसोबत टवाळक्या करणे, वडिलांच्या पैशावर मज्जा करणे हेच त्याचे जीवन असते. ३८ वर्षांचा होऊनही त्याचे लग्न झालेले नसते. अशात अचानक त्याला आफियाचे (अनुष्का शर्मा)  स्थळ सांगून येते. दिव्यांग असलेली पण अतिशय हुशार संशोधक असलेली आफिया बऊआ सिंगला भेटते. मात्र पहिल्या भेटीत बऊआ तिला जराही भावत नाही. पण हळूहळू बऊआ तिच्या मनात स्थान मिळवतो. आफिया बऊआच्या प्रेमात पडते आणि लग्नासाठी होकारही देते. पण आफियाच्या मनात जागा मिळलेल्या बऊआच जीव मात्र अद्यापही बबीता कुमारी (कॅटरिना कैफ) हिच्यात गुंतलेला असतो. अभिनेत्री असलेल्या बबीतासाठी बऊआ अक्षरश: वेडा असतो. अशात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बबीता कुमारी मेरठमध्ये येते आणि तिला भेटण्याच्या अनावर इच्छेने बऊआ सिंग लग्नमंडपातून पळून जातो. प्रेमभंग झाल्यामुळे सैरभर झालेली बबीता कुमारी बऊआला भेटते. केवळ भेटतचं नाही तर अगदी त्याचे चुंबनही घेते. बऊआ या सगळ्याने भारावून जातो आणि बबीता कुमारीला मिळवायच्या महत्त्वाकांक्षेने मुंबईला जातो. आफियाप्रमाणेच बबीता कुमारीचे मन जिंकण्यातही बऊआ यशस्वी होतो. अर्थात काहीच दिवसांत बऊआला आपल्या चुकांची जाणीव होते आणि तो आफियाकडे परततो. आफियाचा माग घेत अमेरिकेला पोहोचतो. पण बऊआने दिलेली जखम ताजी असल्याने आफिया त्याचा द्वेष करू लागलेली असते. सरतेशेवटी आफिया बऊआला माफ करते का? बबीता कुमारीचे काय होते? हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं पाहावा लागेल.


 चित्रपटाबद्दल सांगायचे तर, शाहरुखने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतलीय, हे आवर्जून सांगावे लागले. पण आपली जुनीच ‘रोमॅन्टिक इमेज’ टिकवण्याची त्याची धडपड या चित्रपटातही दिसते. चेहºयाचे तेच ते हावभाव, स्टाईल हे सगळे या चित्रपटात तरी टाळता आले असते.   अनुष्का शर्मानेही आपल्या भूमिकेत जीव ओतला आहे. पण कॅटरिनाने हा चित्रपट का स्वीकारावा, हे एक कोडेच आहे. संपूर्ण चित्रपटात कॅटरिना कमालीची ग्लॅमरस दिसते. पण अभिनयाच्या बाबतीत मात्र निराशा करते. चित्रपटातील तिचे एक आयटम नंबर तेच काय पाहण्यासारखे आहे.
चित्रपटाचा पहिला भाग मनोरंजन करतो. पण मध्यंतरानंतर कथा अशी काही वळण घेते की, दिग्दर्शक आनंद एल राय यांना नेमके काय सांगायचेय, असा प्रश्न पडतो. चित्रपटाची कथा भरकटते आणि क्लायमॅक्स तर भ्रमनिरास करतो.  शशी कपूरच्या जुन्या गाण्यांवर शाहरुखचा डान्स मजेशीर आहे. पण उर्वरित सगळी गाणी कामचलाऊ वाटतात. बेचव आणि भरकटलेल्या कथेमुळे शाहरुखने मोठ्या खूबीने रंगवलेला ‘बऊआ’ ‘झिरो’ ठरतो. शाहरुख व अनुष्काचे चाहते असाल तर एकदा पाहता येईल. अन्यथा ‘झिरो’ अपेक्षा ठेवलेल्याचं बºया.
 
 

Web Title: shahrukh khan katrina kaif anushka sharma zero movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.