वजह तुम हो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2016 03:33 PM2016-11-02T15:33:59+5:302016-12-16T15:46:00+5:30

विशाल पंड्या दिग्दर्शित 'वजह तुम हो' बोल्ड सिनेमा आहे. सिनेमात सना खान, गुरमित चौधरी आणि शरमन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वर्षातला 'वजह तुम हो' सर्वाधिक बोल्ड सिनेमा आहे. हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. या सिनेमात सना खान आणि गुरमित चौधरी वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

वजह तुम हो | वजह तुम हो

वजह तुम हो

googlenewsNext
Release Date: December 16,2016Language: हिंदी
Cast: सना खान,गुरमित चौधरी,शरमन जोशी
Producer: टी सीरिज फिल्म्सDirector: विशाल पांड्या
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>‘वजह’नसलेला ‘वजह तुम हो’!

जान्हवी सामंत
सस्पेन्स आणि सेक्स  थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विशाल पंड्या ‘हेट स्टोरी’सीरिजमुळे बरेच लोकप्रिय झालेत. विशाल पंड्या यांचा ‘वजह तुम हो’ हा नवा चित्रपटही असाच सस्पेन्स आणि सेक्स थ्रिलर चित्रपट आहे. टीव्हीवरील लाईव्ह मर्डरचा थ्रिल आणि त्यामागचा सस्पेन्स यात दाखवला आहे. ‘वजह तुम हो’आज शुक्रवारी प्रदर्शित झाला. गुरूमित चौधरी, सना खान यात वकिलाच्या भूमिकेत असून शरमन जोशी पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. चित्रपट सुरू होतो एका लाईव्ह मर्डरने. ग्लोबल टाईम्स नेटवर्क अर्थात जीटीएन या चॅनलवर मुंबई पोलिसाच्या एका अधिकाऱ्याचा लाईव्ह मर्डर दाखवला जातो आणि इथून हा चित्रपट पुढे सरकतो. या चित्रपटात रजनीश दुग्गलने जीटीएन चॅनलच्या मालकाची भूमिका साकारली आहे. सना आणि गुरमीत दोघेही चित्रपटात प्रियकर-प्रेयसी आहेत. पण या प्रकरणात दोघेही केस लढायला एकमेकांच्या विरोधात कोर्टात उतरतात. याचदरम्यान चित्रपटात अनेक ट्विस्ट येतात आणि चित्रपट पुढे सरकतो. पण‘माही वे’ या आयटम साँगपर्यंत पोहोचेपर्यंत आपली अवस्था  काहीशी ‘दर्द भरे गीत गाके रोने को दिल कहता है’  अशीच होते.  कानाचे पडदे फाटतील इतके कर्णकर्कश पार्श्वसंगीत, एक अतिशय कल्पनेपलीकडची पटकथा आणि वैताग आणणारे नाटकी संवाद असे सगळे मिळून ‘वजह तुम हो’ला एक तापदायक चित्रपट बनवतात. 

एका रात्री ग्लोबल टाईम्स नेटवर्कचे सिग्नल हॅक होतात आणि चॅनलवर एक लाईव्ह मर्डर दिसायला लागतो. भ्रष्ट पोलिस अधिकारी एसीपी सरनाईक याला पेट्रोल पाजून ठार मारले जाते. हा संपूर्ण मर्डर जीटीएनवर लाईव्ह दिसायला लागतो. या वळणावर कबीर देशमुख (शरमन जोशी) या मुंबई पोलिसाच्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची चित्रपटात एन्ट्री होते. कबीरकडे या हत्या प्रकरणाचा तपास सोपवला जातो. कबीर आपल्या संपूर्ण ऊर्जेनिशी या प्रकरणाच्या तपासाला लागतो आणि स्वत:च्या सायबर सेलकडे काहीच तपास न करता (अतिशहाणपणा) थेट ग्लोबल टाईम्स नेटवर्कचा मालक राहुल ओबेरॉय (राजेश दुग्गल) याला संशयाच्या आधारावर  चौकशीला बोलवतो.

ओबेरॉयची वकील सिया (छान छान कपडे घालून नट्टापट्टा करून मिरवणारी सना खान) ही आपल्या अशिलाला निर्दोष सिद्ध करायला उभी राहते. अर्थात सगळे पुरावे ओबेरॉयच्या विरोधात जाणारे असतात. मुंबई पोलिसांच्या वतीने अ‍ॅड. रणवीर म्हणजेच सियाचा प्रियकर (गुरमित चौधरी) ही केस आपल्या हातात घेतो. टीआरपीसाठी ओबेरॉयनेच हा डाव आखल्याचा त्याचा अंदाज असतो. मध्यंतरापर्यंत या केसमधील गुंतागुंत अधिकच वाढते. (अर्थात तरीही हिरो-हिरोईनला रोमान्स आणि गाणी गायला वेळ मिळतोच.) फार खोलात न जाता सांगायचे तर केस अधिक किचकट आणि कंटाळवाणी होते. मनाला कुठेही न भिडणारी ही केस पुढे आणखीनच वैताग आणते.

पटकथेपेक्षा रोमान्स दृश्यावरच अधिक मेहनत घेण्यात आल्याचे आपल्याला मध्यंतरापर्यंत कळून चुकते. अतिअंगप्रदर्शन, लैंगिक गुन्हेगारीचे विभत्स चित्रीकरण आणि लिंगभेदाचे राजकारण अशा वळणावर हा चित्रपट नकोसा वाटतो.
पटकथाच रटाळ असल्याने कलाकारांकडून कुणीही उत्तम अभिनयाची अपेक्षा करू शकत नाही. पण तरीही शरमन जोशी, रजनीश दुग्गल, सना खान, गुरमीत चौधरी आणि तोकड्या कपड्यांमधील अर्धा डझन मुली चित्रपटात जीव ओतून अभिनय करताना दिसतात. अर्थात त्याने चित्रपटात काहीही फरक पडत नाही. त्यामुळे फार कष्ट घेऊन चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जाण्याची गरज नाही. त्यापेक्षा रात्री उशिरा टीव्हीवर आल्यावरच तो बघितलेला बरा.
 

Web Title: वजह तुम हो

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.