Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 08:20 AM2018-05-11T08:20:32+5:302018-05-11T15:44:00+5:30

चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते.

Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा ! | Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !

Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !

googlenewsNext
Release Date: May 11,2018Language: हिंदी
Cast: आलिया भट्ट, विकी कौशल, सोनी राजदान, शिशिर शर्मा, अमृता खानविलकर
Producer: धर्मा प्रॉडकशन्सDirector: मेघना गुलज़ार
Duration: १४० मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत

‘तल्वार’,‘फिलहाल’,‘दस कहानियाँ’ या चित्रपटांसाठी  दिग्दर्शका मेघना गुलजार यांनी वापरलेला हिट फॉर्म्युला ‘राजी’च्या बाबतीतही खरा उतरला आहे. तसेच चौकटीबाहेरच्या भूमिकांची निवड करून पडद्यावर मोठ्या आत्मविश्वासाने कायमच आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न अभिनेत्री आलिया भट्ट हिने केला आहे. या चित्रपटातही ती ‘सहमत’ या काश्मिरी युवतीची उत्कृष्ट भूमिका साकारून प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळवते. याशिवाय दिग्दर्शक, कलाकार यांचेच केवळ कौतुक नव्हे तर संपूर्ण चित्रपटाची टीम, कथानक, संगीत या सर्वांमुळे चित्रपट एक हृदयस्पर्शी कथा घेऊन प्रेक्षकांना हेलावून टाकतो, हे नक्की!

गुप्तहेर रहस्य, भारत-पाकिस्तान युद्धांचे राजकारण, वेगवान देशभक्तीपर कथा आणि मुख्य भूमिकेत आलिया भट्ट सारखी उत्कृष्ट नायिका. तसं पाहिलं तर ‘राजी’ हा एक हिट फॉर्म्युला आहे. पण, ह्या फॉर्म्युलाला मेघना गुलजार सारख्या एका संवेदनशील दिग्दर्शकाचा स्पर्श लाभला आहे आणि त्यामुळे राजी एका साधारण हिंदी एंटरटेनरवरून एक माईलस्टोन चित्रपट बनून जातो.

राजीची कथा आहे सहमतची. १९६० या वर्षांत एका काश्मिरी भारतीय गुप्तहेर हिदायतची कन्या, सहमत २० वर्षांची असताना तिला तिच्या वडिलांच्या आजाराचे कळते. आपली कामगिरी आपल्या मुलीने पार पाडावी, असे ह्या देशप्रेमी वडिलांना वाटत असते. पाकिस्तानी आर्मीच्या आपला मित्र सय्यदच्या मुलाशी हिदायत आपल्या मुलीचे लग्न ठरवतो. आणि यामुळे भारतीय आर्मीला एक गुप्तहेर मिळतो जो सय्यद कुटुंबात राहून भारतीय आर्मीला त्यांची गोपनीय माहिती देईल. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करायला सहमत ही ‘राजी’ होते आणि तिचे ट्रेनिंग सुरू होते. एक साधी कॉलेजला जाणारी युवती गुप्तहेर बनण्याचे ट्रेनिंग घेऊन कशी आपल्या देशाच्या आर्मीला सर्व सिक्रेट्स पोहोचवते हीच ह्या चित्रपटाची कथा आहे. राजी हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असून ‘कॉलिंग सहमत’ या हरिंदर सिक्का यांच्या पुस्तकावरून बनवण्यात आलेला आहे. चित्रपटाचा विषय खूपच हृदयस्पर्शी आहे. 

१९७०चा काळ- वेशभूषा, घराचे इंटेरिअर, रस्ते आणि दुकाने मेघना गुलजार आणि कला दिग्दर्शक यांनी खूप उत्कृष्टरित्या रेखले आहे. थोडक्यात त्याकाळचे सांस्कृतिक वातावरण, राजकीय वातावरण, राजकारणाचे डावपेच आणि त्यामुळे आर्मीवर होणारा इफेक्ट हे सगळे मेघना आणि लेखक भवानी अय्यर यांनी खूप सहज आणि सोप्या पद्धतीने मांडले आहे. ह्या पार्श्वभूमीत आलिया सारख्या अभिनेत्रीला आपला अभिनय दाखवायला सहमतच्या रोलमध्ये खुला कॅनव्हासच मिळाला आहे. एका बाजूला आपला नवरा, त्याच्या कुटुंबावर असलेलं नि:स्वार्थ प्रेम आणि सेवा करणारी सहमत आणि दुसऱ्या बाजूला त्याचं कुटुंब आणि नवीन देशाशी प्रतारणा, वेळ पडल्यास खून करणारी देशप्रेमी सहमत ह्या भूमिकेचे दोन्ही पैलू आलिया भट्ट हिने खूप नाजूक आणि जाणिवपूर्वक आखले आहेत. 

गुप्तहेर म्हणून तिची शिस्त, समयसूचकता आणि एक बाई म्हणून तिची मायाळू वृत्तीही ती फार सहजपणे अनेक सीन्समधून दाखवून देते. तिचे व्यक्तिमत्त्व आणि तिचा नीडर वावर प्रेक्षकांना खूप भावून जातो. तिला बाकीच्या कलाकारांचीही उत्कृष्ट साथ मिळाली आहे. सहमतचे सासरे यांच्या भूमिकेत शिशिर शर्मा, पतीच्या भूमिकेत विकी कौशल आणि तिच्या गुरू मीरच्या भूमिकेत जयदीप अहलवात यांनी तोडीसतोड अभिनय साकारला आहे. उत्कृष्ट परफॉर्मन्सेस, सेटस आणि एक थरारजनक स्टोरीपेक्षाही मेघना गुलजार यांच्या संवेदनशील दिग्दर्शनाने जादू केली आहे. भारत-पाकिस्तानमधील नाजूक राजकारण, त्यातील लोकांचा मुळ प्रेमळपणा आणि देशप्रेम-त्यातील सौम्य भक्ती पण इरेला पेटल्यावर त्यातला रौद्रपणा ही दिसून येतो-हे मेघना गुलजार यांच्या सुक्ष्म दिग्दर्शनामुळे खूप मनोरंजकपणे मांडला गेला आहे. निश्चितच हा चित्रपट मेघना आणि आलिया यांच्या करिअरचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणता येईल. चित्रपटगृहात नक्की जाऊन पहावा असा ‘राजी’!

Web Title: Raazi Movie Review : एक हृदयस्पर्शी कथा !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.