Poster Boys Movie Review : कॉमेडी अन् सामाजिक संदेशाचा कॉकटेल फॉर्म्युला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 10:28 AM2017-09-08T10:28:08+5:302023-08-08T19:47:32+5:30

२०१४ मध्ये आलेल्या ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटाचा निर्माता म्हणून भूमिका बजावणारा अभिनेता श्रेयस तळपदे आता हाच चित्रपट हिंदीमध्ये घेऊन आला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळताना त्याने पुन्हा कॉमेडी अन् सामाजिक संदेशाचा कॉकटेल फॉर्म्युला प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला आहे.

Poster Boys Movie Review: Comedy and Social Message Cocktail Formula !! | Poster Boys Movie Review : कॉमेडी अन् सामाजिक संदेशाचा कॉकटेल फॉर्म्युला!!

Poster Boys Movie Review : कॉमेडी अन् सामाजिक संदेशाचा कॉकटेल फॉर्म्युला!!

Release Date: September 08,2017Language: हिंदी
Cast: सनी देओल, बॉबी देओल, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी , समीक्षा भटनागर, भारती आचरेकर
Producer: सोनी पिक्चर्सDirector: श्रेयस तळपदे
Duration: २ तास ११ मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
ong>सतीश डोंगरे

नसबंदीसारखा संवेदनशील विषय कॉमेडी स्वरूपात मांडणे हे जरी जोखमीचे वाटत असले तरी, २०१४ मध्ये मराठीत आलेल्या ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटातून ते अतिशय खुबीने दाखविण्यात आले होते. आता हाच विषय आणि तोच अंदाज ‘पोस्टर बॉयज’च्या हिंदी रिमेकमध्ये बघावयास मिळत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल या दोघा भावांनी नुसतीच कॉमेडी केली नाही तर, नसबंदीसारखा संवेदनशील विषयही अतिशय मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. काही कमकुवत बाबी सोडल्यास चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास काहीसा यशस्वी होताना दिसतो.

मराठीची पूर्ण कॉपी असलेल्या या चित्रपटाची कथा हरियाणा राज्यातील जंगेठी या गावातून सुरू होते. जगावर चौधरी (सनी देओल), मास्तर विनय शर्मा (बॉबी देओल) आणि अर्जुन सिंग (श्रेयस तळपदे) या तिघांच्या आयुष्यात तेव्हा भूकंप होतो, जेव्हा हे तिघे नसबंदी न करताच सरकारी पोस्टरवर झळकतात. ‘आम्ही नसबंदी केली तुम्ही केव्हा करणार?’ असा संदेश देणारे हे पोस्टर तिघांचेही आयुष्य हादरवून टाकते. या पोस्टरमुळे जगावर चौधरीच्या बहिणीचे लग्न तुटते, शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या विनय शर्मा ऊर्फ शांत ज्वालामुखी याचे वैवाहिक जीवन घटस्फोटापर्यंत पोहोचते, तर वसुलीचे काम करणारा अर्जुन सिंग यालाही त्याच्या प्रेयसीपासून दूर जावे लागते. 

पुढे हे तिघेही या प्रकरणातील खºया गुन्हेगारांचा शोध घेण्यास निघतात. अर्थातच यातील गुन्हेगार हे सरकारी अधिकारी असतात. त्यामुळे त्यांना सरकारशी मुकाबला करावा लागतो. थेट सरकारशीच पंगा घ्यावा लागल्याने, त्यांच्या खासगी आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. अशातही हे तिघे न्यायासाठी लढा देतात. अखेर हे तिघे गांधी मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवतात. परंतु त्यांचे हे आंदोलन ‘नग्न’ आंदोलन असल्याने सरकारला त्यांची दखल घ्यावीच लागते. अखेर मुख्यमंत्री (सचिन खेडकर) या सरकारी यंत्रणेची चूक जाहीरपणे मान्य करून या तिघांना न्याय देतात. मराठी ‘पोस्टर बॉयज’ची तंतोतंत कॉपी असलेल्या या चित्रपटात कॉमेडी अतिशय खुबीने रंगविल्याने प्रेक्षकांना चित्रपट फारसा कंटाळवाणा वाटत नाही. 

पहिल्या भागात प्रत्येक सीन्समध्ये पंचलाइन असल्याने प्रेक्षकांच्या चेहºयावर आपसूकच हसू फुलते. मध्यांतरानंतर मात्र चित्रपट काहीसा गंभीर होत जातो. अभिनयाविषयी सांगायचे झाल्यास जगावर चौधरीच्या भूमिकेत असलेल्या सनी देओलने दाखवून दिले की, त्याच्या ढाई किलोच्या हातात अजूनही दम आहे, तर तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर झळकलेल्या बॉबीनेही उत्कृष्ट पद्धतीने आपल्या भूमिकेला न्याय दिला असे म्हणावे लागेल. श्रेयसने तर अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही कमाल केल्याचे दिसून येते. संपूर्ण चित्रपटात त्याने कॉमेडीचा मोर्चा सांभाळल्याचे क्षणोक्षणी जाणवते. या तिघांव्यतिरिक्त सोनाली कुलकर्णी, समीक्षा भटनागर, भारती आचरेकर यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संवाद खूपच मजेशीर आहेत. ‘नसबंदी’ हा चित्रपटाचा मुख्य विषय असल्याने त्या अनुषंगाने डबल मिनिंग डायलॉग प्रेक्षकांना पोटधरून हसवितात. 

चित्रपटाच्या कमकुवत बाबींविषयी सांगायचे झाल्यास, हा यापेक्षाही अधिक चांगला कॉमेडीपट करता येऊ शकला असता. कारण मध्यांतरानंतर चित्रपट उगाचच लांबविला जात असल्याचे जाणवते. शिवाय चित्रपटात ८०च्या दशकातील जोक्सचा अधिक भडीमार केला आहे. ज्यामुळे चेहºयावर हसू फुलते, परंतु हा जोक्स कुठेतरी ऐकला असेही वाटते. चित्रपटाचा स्क्रीनप्लेही तरंगतानाच दिसतो. कारण ट्रेलरमध्ये जे दाखविण्यात आले, तेच ओढून ताणून चित्रपटाच्या अखेरपर्यंत नेले आहे. त्याशिवाय सनी पाजीचे जुनेच डायलॉग आणि सेल्फीचा छंद खूपच कंटाळवाणा वाटतो. चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राउंड स्कोरही खूपच कमकुवत आहे. एकूणच तुम्ही जर कॉमेडी चित्रपटाचे चाहते असाल तर हा चित्रपट बघायला हरकत नाही, परंतु तुम्ही जर रोमॅण्टिक किंवा अ‍ॅक्शनपटाचे चाहते असाल तर चित्रपटगृहात जाणे टाळावे. 

Web Title: Poster Boys Movie Review: Comedy and Social Message Cocktail Formula !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.