Lucknow Central Movie Review : नुसताच ‘ओवरडोज’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 01:40 PM2017-09-14T13:40:01+5:302023-08-08T19:47:32+5:30

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर पुन्हा एकदा ‘लखनौ सेन्ट्रल’ हा चित्रपट घेऊन आला आहे. हा चित्रपट पाहायचा तुमचा प्लान असेल तर तर तो पाहायचा की नाही, हे जाणून घ्यायलाच हवे...

Lucknow Central Movie Review: Only 'Overdose' !! | Lucknow Central Movie Review : नुसताच ‘ओवरडोज’!!

Lucknow Central Movie Review : नुसताच ‘ओवरडोज’!!

Release Date: September 14,2017Language: हिंदी
Cast: फरहान अख्तर, डायना पेंटी, रोनित रॉय, जिप्पी ग्रेवाल, दीपक दोबरियाल, इनामुलहक, राजेश शर्मा
Producer: निखिल अडवानीDirector: रंजित तिवारी
Duration: दोन तास १५ मि.Genre:
लोकमत रेटिंग्स
-
ान्हवी सामंत

फरहान अख्तर स्टारर ‘लखनऊ सेंट्रल’ हा चित्रपट आज रिलीज झाला असून, रंजित तिवारी यांनी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटातून, स्वप्नांची पूर्तता आणि जगण्याचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. चित्रपटाची कथा पाच कैद्यांच्या अवती-भोवती फिरणारी आहे. हा चित्रपट पाहायचा तुमचा प्लान असेल तर तर तो पाहायचा की नाही, हे जाणून घ्यायलाच हवे...

खरे तर काही आठवड्यांपूर्वी ‘कैदी बंद’ हा  ‘लखनऊ सेंट्रल’च्या कथेशी मिळता-जुळता चित्रपट रिलीज झाला होता. ‘कैदी बंद’नंतर लगेचच त्याच विषयावरचा चित्रपट पाहणे प्रेक्षकांसाठी जरा ‘ओवरडोज’ म्हणता येईल. याऊपरही ‘लखनऊ सेंट्रल’ हा ‘कैदी बंद’पेक्षा खरोखर अधिक मनोरंजक असता तर एक प्रयोग यशस्वी झाल्याचे समाधान असते. पण हा प्रयोग फसल्याचेच जाणवते. डायना पेन्टी आणि रोनित राय सोडले तर संपूर्ण चित्रपटात सगळे कलाकार फाटके, चुरगाळलेले कपड्यात गबाळ्या रूपात दिसतात. त्यामुळे ‘लखनऊ सेंट्रल’ एक सामान्य चित्रपट आहे, हे सुरुवातीलाच सांगावेसे वाटते.

तुरुंगातील कैद्यांचे आयुष्य सोपे नसते. नेमकी हीच गोष्ट ‘लखनऊ सेंट्रल’ आपल्या संथ ‘स्टाईल’मध्ये प्रेक्षकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. ‘लखनऊ सेंट्रल’ ही कथा आहे किशनची(फरहान अख्तर). किशन मुरादाबाद सारख्या लहान शहरातील गायक असतो. एक म्युझिक बँड तयार करून जगभरातील लोकांचे मनोरंजन करण्याचे त्याचे स्वप्न असते. लोकगायक मनोज तिवारीचा किशन खूप मोठा चाहता असतो. एका कॉन्सर्टमध्ये आपल्या या आवडत्या गायकाला स्वत:च्या गाण्यांची सीडी देण्याच्या उत्साहात त्याची एका आयएएस अधिका-याची धक्काबुक्की होते. त्याच रात्री त्या आयएएस अधिका-याची हत्या होते आणि किशन या हत्येच्या आरोपात गजाआड होतो.  या प्रकरणात किशनला जन्मठेप सुनावली जाते. लखनऊ सेंट्रल जेलमध्ये  किशनची रवानगी होते आणि येथे बँड बनवण्याची त्याची धडपड सुरु होते. या तुरुंगात त्याची ओळख एनजीओ चालविणा-या गायत्रीशी (डायना पेन्टी) होते. १५ आॅगस्टला राज्यातील वेगवेगळ्या तुरूंगातील कैद्यांनी बनवलेल्या बँड परफॉर्मन्ससाठी कैद्यांना ती प्रोत्साहीत करत असते. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून लखनऊ सेंट्रल मध्ये बँड तयार करण्याची जबाबदारी किशन घेतो. या कामात गायत्री त्याला मदत करते. अर्थात बँड साकारत असतानाच किशनच्या डोक्यात एक प्लानही शिजत असतो. हा प्लान म्हणजे तुरुंगातून पळून जाण्याचा. याच प्लानअंतर्गत तो तुरुंगात पळून जाण्यास मदतगार ठरतील अशा कैद्यांची स्वत:च्या बँडमध्ये निवड करतो. काहीच दिवसांत  पंडित (राजेश शर्मा), व्हिक्टर (दीपक डोबरियाल), पाली आणि दीक्कत असे तुरुंगातील इलेक्ट्रीशियन, टेलर, सफाईवाला, चाबी बनवणा-या अशा चौघांची बँडमध्ये वर्णी लागते. जेलर श्रीवास्तवच्या (रोनित राय) जाचाला कंटाळून या सगळ्यांनाही जेलमधून पळायचे असते. पण संगीत या सगळ्यांना असे काही जवळ आणते की, सगळेच चांगले मित्र बनतात. जेलरलाही मुख्यमंत्र्यांच्या धाकामुळे बँडमधील या कैद्याशी काळजीपूर्वक वर्तन करावे लागते. या सगळ्यांतून हे पाच कैदी  बँडच्या माध्यमातून आपले स्वातंत्र्य कसे मिळवतात, याची ही कथा आहे.

‘कैदी बंद’पेक्षा ‘लखनऊ सेंट्रल’ निश्चितपणे सरस चित्रपट आहे. पण एकट्या ‘लखनऊ सेंट्रल’ची गोष्ट केल्यास या चित्रपटाच्या अनेक कमजोर बाजू दुर्लक्षिक करता येत नाहीत. मुळात या चित्रपटासाठी फरहान अख्तरची निवड चुकलीच, हेच अख्खा चित्रपट पाहताना जाणवते. कारण तो कुठेच दुबळा किंवा लाचार वाटत नाही. शिवाय एका लहानशा शहरातून आलेला मुलाच्या चौकटीत तो कुठेच फिट बसत नाही. चांगल्या समुद्ध इंग्रजाळलेल्या कुटुंबातील फरहानचा तोरा त्याच्या भूमिकेशी कुठेच मेळ खात नाही. साहजिक फरहान साकारत असलेल्या किशन या व्यक्तिरेखेशी शेवटपर्यंत प्रेक्षक जुळू शकत नाही. कदाचित त्यामुळेच त्याच्या बँडमधले अन्य कलाकार अधिक जवळचे वाटून जातात. फरहानचा संभ्रम तर चित्रपट संपतो तरी संपत नाही. त्याला बँड बनवायचा आहे की, जेलमधून पळायचे आहे, हेच शेवटपर्यंत कळत नाही. इतके कमी की काय म्हणून चित्रपटाची पटकथा अतिशय संथपणे पुढे सरकते. शेवटचे ४० मिनिटे सोडलीत तर हा चित्रपट कंटाळा आणतो. या चित्रपटाची जमेची बाजू सांगायची तर दीपक डोबरियाल आणि राजेश शर्मा यांचे काम. या दोघांनीही या चित्रपटात सर्वोत्तम काम केले आहे. पण असे असूनही रोनित राय आणि रवी किशन हेच खरा भाव खावून जातात. कडक जेलरच्या रूपातील रोनित राय आणि अगदी लहरी स्वभावाच्या मुख्यमंत्र्याच्या भूमिकेतील रवि किशन प्रेक्षकांचे सगळे लक्ष वेधून घेतात. डायना पेन्टीने काम  चांगले आहे. पण तिच्या वाट्याला फार थोडे काम आलेय.

 एका वाक्यात सांगायचे तर या चित्रपटाला ना त्याला ‘भाग मिल्खा भाग’ वा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील फरहान अख्तरच्या अभिनयाची सर आहे, ना त्यात ग्लॅमर वा रोमॉन्स आहे. त्यामुळे एकंदर ‘लखनौ सेन्ट्रल’ हा अतिशय नीरस असा चित्रपट झालाय. 

Web Title: Lucknow Central Movie Review: Only 'Overdose' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.