Karwaan Movie Review : सहज सुंदर ‘कारवां’ | Karwaan Movie Review : सहज सुंदर ‘कारवां’
Karwaan Movie Review : सहज सुंदर ‘कारवां’
Release Date: August 03,2018Language: हिंदी
Cast:  इरफान खान, दुलकर सलमान, मिथिला पारकर, आकाश खुराणा
Producer: रोनी स्क्रूवालाDirector: आकर्ष खुराणा रोनी स्क्रूवाला
Duration: २ तासGenre:

लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

‘मै अकेला ही चला था जानिब- ए- मंजिल मगर लोक साथ आते गए और कारवाँ बनता गया,’ मजरूह सुल्तानपुरी यांच्या या सुरेख शब्दांनी प्रेरित असा ‘कारवां’ हा चित्रपट आज रिलीज झाला. बिजॉय नम्बियार लिखीत आणि आकर्ष खुराणा दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे, एका प्रवासाची आगळी-वेगळी कथा आहे. आयुष्याच्या वळणावरचा मजेशीर योगायोग आणि मानवी नात्यांच्या गुंतागुंतीच्या प्रवासावर एक साध्या सोप्या भाषेत केलेली टिप्पणी म्हणजे, ‘कारवां’. हा प्रवास सुरू होतो तो, पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अविनाश (दुलकर सलमान)  या तरूणाच्या तणावपूर्ण आयुष्याने. रोजच्या जगण्यातला ताण सहन करून आतल्या आत कुढणा-या अविनाशला एक दिवस  गंगोत्रीच्या प्रवासात त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याचा फोन येतो. आम्ही तुमच्या वडिलांचा मृतदेह पाठवला आहे. तुम्ही तो स्वत: येऊन घेऊन जावा, अशी तोकडी सूचना देणारा एका कुरिअर कंपनीचा हा फोन असतो. अविनाशने आपल्या वडिलांचा फोटोग्राफी हा व्यवसाय सोडून इंजिनिअर बनण्याचा निर्णय घेतलेला असल्याने त्याचे व त्याच्या वडिलांचे मतभेद असतात. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूच्या बातमीने अविनाशला फार काही धक्का बसत नाही.   कुरिअर कंपनीकडून आलेला वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तो निघतो. मात्र प्रत्यक्षात कुरिअर कंपनीने वडिलांचा नाही तर एका भलत्याच महिलेचा मृतदेह पाठवलेला असतो. वडिलांचा मृतदेह कुरिअर कंपनीच्या मुर्खपणामुळे भलतीकडेच म्हणजे कोच्चीत पोहोचल्याचे त्यांना कळते. त्या मृत महिलेचे कुटुंब, म्हणजे मुलगी थहिरा (अमला अक्कीनेनी) आणि तिची नात तान्या (मिथिला पारकर) कोच्चीत राहत असतात. अविनाश वडिलांचा मृतदेह कोच्चीवरून बंगळूरूला आणण्यासाठी निघतो. मित्र शौकत (इरफान खान) यालाही तो सोबत घेतो. पण वाटेत अविनाशला थहिराचा फोन येतो. तिची मुलगी ऊटीच्या होस्टेलमधून बेपत्ता झाल्याचे ती सांगते आणि येथून मिथिला पारकर अर्थात तान्याची या ‘कारवां’त एन्ट्री होते. यानंतर अविनाश, शौकत आणि तान्याचा हा ‘कारवां’ वेगळ्याच वाटेने निघतो. त्यांना कधी गुंडांशी, कधी पोलिसांशी तर कधी स्वत:च्याच भूतकाळाशी तोंड द्यावे लागते. आपल्या आई-वडिलांशी असलेल्या खूप निर्मळ पण तेवढ्याच क्लिष्ट नात्यांचा गुंता सोडवण्याच्या प्रयत्नांत हे तिघेही मैत्रीच्या नात्याने बांधले जातात. आयुष्याचं कठीण कोडंही या प्रवासात उलगडत जातं.
चित्रपटाचा पहिला भाग काहीसा बोजड वाटता़. पात्रांची केमिस्ट्री फारशी जाणवत नाही. काही दृश्ये अगदीत अतिरंजिक तर काही दृश्ये अगदीच संथ जाणवतात. पण जसजशी कथा पुढे सरकते तशी ती आपलीशी वाटू लागते. यातील प्रत्येक पात्रही मनात घर करू लागते. विशेषत:चा इरफानने साकारलेला शौकत मनाला भावतो. इरफानने सहजसुंदररित्या साकारलेले शौकतचे पात्र या चित्रपटात एकदम ‘जान’ आणते. काहीसा आगावू पण तितकाच सज्जन आणि प्रेमळ असे आपल्या व्यक्तिरेखेच्या स्वभावाचे तिन्ही पैलू इरफान अगदी सहज-सुंदर आणि विनोदी शैलीने पडद्यावर दाखवतो. दुस-या भागात केवळ आणि केवळ इरफान हाच मनावर छाप सोडतो. दुलकरने आपली संवेदनशील आणि शांत व्यक्तिरेखा प्रामाणिकपणे साकारली आहे. चित्रपटात अनेक अतार्किक, वास्तावाशी कुठेच संबध नसणारी वळणे येतात. पण इरफान आणि दुलकरच्या केमिस्ट्रीमुळे त्याकडे फारसे लक्ष जात नाही. अगदी हलक्या-फुलक्यात शब्दांत हा ‘कारवां’ एक गर्भित संदेश देऊन जातो. त्यामुळे आयुष्यातील हलक्या-फुलक्या क्षणांवर प्रेम करणा-यांनी हा चित्रपट जरूर पाहावा.
 


Web Title: Karwaan Movie Review : सहज सुंदर ‘कारवां’
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.