Kabir Singh Review : प्रेमाच्या नशेत आकंठ बुडालेला कबीर सिंग

By प्राजक्ता चिटणीस | Published: June 21, 2019 04:10 PM2019-06-21T16:10:15+5:302023-08-08T20:27:58+5:30

कबीर सिंग हा अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

Kabir Singh Review: shahid kapoor best performance ever | Kabir Singh Review : प्रेमाच्या नशेत आकंठ बुडालेला कबीर सिंग

Kabir Singh Review : प्रेमाच्या नशेत आकंठ बुडालेला कबीर सिंग

ठळक मुद्देबॉलिवूडमध्ये आपल्याला आजवर अनेक प्रेमकथा पाहायला मिळाल्या आहेत. पण या प्रेमकथांपेक्षा खूपच वेगळी प्रेमकथा कबीर सिंग या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते.
Release Date: June 21,2019Language: हिंदी
Cast: शाहिद कपूर, कियारा अडवाणी
Producer: भुषण कुमार, क्रिशन कुमार, अश्विन वर्दे, मुराद खैतानीDirector: संदीप वंगा
Duration: २ तास ५५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

इश्क में पाना क्या और खोना क्या! असे म्हटले जाते. पण तरीही प्रेमासाठी सर्वस्व गमावणारे अनेकजण असतात. आपण ज्या व्यक्तीवर वेड्यासारखे प्रेम करतो, ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली तर काही जण हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही. अशाच एका दुखावलेल्या प्रियकराची गोष्ट आपल्याला कबीर सिंग या चित्रपटात पाहायला मिळते.

कबीर सिंग हा अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे हा चित्रपट पाहिलेल्यांना या चित्रपटाची कथा काय आहे हे सांगायची गरज नाही. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन संदीप वंगा यांनी केले असून कबीर सिंग हा सीन टू सीन कॉपी आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

कबीर (शाहिद कपूर) हा अतिशय रागीट, कोणाचेही ऐकून न घेणारा पण तितकाच हुशार असतो. कॉलेजमध्ये टॉपर असलेला कबीर नुकत्याच कॉलेजमध्ये आलेल्या प्रीती (कियारा अडवाणी) च्या प्रेमात पडतो. प्रीती आणि कबीरची लव्ह स्टोरी मस्तपैकी सुरू असते. पण लव्ह स्टोरी म्हटली की, त्यात व्हिलन हा येणारच... प्रीतीचे वडील या दोघांच्या लव्ह स्टोरीत खलनायक बनतात आणि प्रीतीचे लग्न एका दुसऱ्या मुलासोबत करून देतात. प्रीती आपल्या आयुष्यातून गेली हे कबीरला सहन होत नाही आणि तो दारू, ड्रग्सच्या अधीन जातो. एक प्रसिद्ध सर्जन असलेला कबीर दारूच्या नशेतच ऑपरेशन करत असतो. त्यामुळे त्याची नोकरी देखील संकटात येते. प्रीती आयुष्यातून गेल्यानंतर मुलगी ही केवळ उपभोगाची वस्तू असते असे तो मानायला लागतो. त्याचे आयुष्य त्याने संपूर्णपणे उद्धवस्त करून घेतलेले असते. कबीरच्या आयुष्यात पुढे काय होते, त्याची प्रीती त्याच्याकडे परत येते का या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील.

बॉलिवूडमध्ये आपल्याला आजवर अनेक प्रेमकथा पाहायला मिळाल्या आहेत. पण या प्रेमकथांपेक्षा खूपच वेगळी प्रेमकथा कबीर सिंग या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. या चित्रपटातील देवदास हा आधुनिक देवदास आहे. चित्रपटाची कथा चांगली असली तरी काही वेळा या आधुनिक देवदासाचे वागणे आपल्याला पटत नाही. प्रेम आणि लैंगिक गरज यात या चित्रपटात ताळमेळ घालण्यात कुठेतरी दिग्दर्शक कमी पडला आहे. कारण प्रीती आयुष्यातून गेल्यानंतर हा कबीर सगळ्याच मुलींकडे शारीरिक सुखाची मागणी करतो. त्यामुळे खरेच त्याचे प्रीतीवर इतके प्रेम होते का हा प्रश्न पडतो. तसेच चित्रपटाची लांबी थोडी कमी केली असती तर तो अधिक नेमका झाला असता.

चित्रपटातील एका दृश्यात मोलकरणीने केवळ ग्लास फोडला म्हणून तो तिच्या मागे धावतो हे दृश्य मनाला पटत नाहीत. तसेच प्रीती आणि कबीर मुलांच्या हॉस्टेलमध्ये एकत्र राहातात ही गोष्ट अतिशयोक्तीची वाटते. पण चित्रपटाचे संवाद खूपच छान जमून आले आहेत. तसेच चित्रपटाची गाणी चांगली आहेत. अभिनयाबाबत विचाराल तर शाहिद कपूरच्या आतापर्यंतच्या परफॉर्मन्समधील हा एक उत्तम परफॉर्मन्स आहे असे म्हणावे लागले. हा चित्रपट पाहाताना आपल्याला कमीने, उडता पंजाब या चित्रपटातील शाहिद नक्कीच आठवतो. चित्रपटात कियाराच्या वाट्याला खूपच कमी संवाद आले असले तरी तिने तिच्या देहबोलीतून चांगला अभिनय केला आहे. शाहिदच्या मित्राच्या भूमिकेत असलेला शिवा म्हणजेच सोहम मुजुमदार चांगलाच लक्षात राहातो. तसेच अर्जन बाजवा, सुरेश ऑबेरॉय, कामिनी कौशल यांनी चांगले काम केले आहे. एकंदरीतच एक वेगळी लव्ह स्टोरी पाहायची असेल तर कबीर सिंग नक्कीच पाहा. 

Web Title: Kabir Singh Review: shahid kapoor best performance ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.