This is how you can improve your child’s concentration | मुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय
मुलांमधील एकाग्रता वाढवण्यासाठी हे करा उपाय

दैनंदिन जीवनात प्रगतीस येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये बरेच छोटे-मोठे बदल घडू लागले आहेत. याचे मानवी आयुष्यावर सकारात्मक तसंच नकारात्मक दोन्ही परिणाम झालेत, याचे स्पष्टीकरण नव्यानं मांडण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे मैदानी खेळांची जागा-गेम्सनं, पाट्या-वरट्याची जागा मिक्सरनं, खलबत्याची जागा क्रशरनं घेतलीय त्याचप्रमाणे पौष्टिक पदार्थांऐवजी आता प्रत्येक घराघरात इंन्स्टंट आणि जंक फूडची जास्त चलती आहे. 

'2 Minutes'मध्ये झटपट आणि पटपट जेवण बनण्याच्या नादात जर आपल्या आहारात इंन्स्टंट आणि जंक फूडचा मोठ्या प्रमाणात समावेश होत असेल तर वेळीच सावध व्हा. धोका लक्षात घ्या.  कारण यामुळे आपल्या मुलाच्या स्वभावावर, एकाग्रतेवर वाईट परिणाम होतोय. याकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे होणारे नुकसान कदाचित आयुष्यात भरुन निघणार नाही. हल्लीची मुलं चंचल, रागीट, भांडखोर, चिडखोर, अस्थिर असतात, ही आणि यांसारखीच कित्येक वाक्य आपण दररोज ऐकतो. एकूणच काय त्यांच्यामध्ये एकाग्रतेचा अभाव आहे, हेच सर्वाना निदर्शनास आणून द्यायचे असते. यावर अनेक पालकांचं असंही म्हणणं असेल की आम्ही योग्यरित्या त्यांचे संगोपन करत आहोत, त्यांना घडवत आहोत, नवनवीन कलाकौशल्य आत्मसात करण्यास शिकवत आहोत, तरीही मुलांमध्ये एकाग्रतेची कमी जाणवतेय. यामागील तुम्हाला पडलेल्या प्रत्येक 'का'ची उत्तरं शोधूनही सापडली नसतील. स्वभावाला औषध नसतं, असं तुम्हाला वाटत असेल तर तसंच नाहीय. कारण स्वभावावर औषध म्हणजे 'योग्य, सकस आणि पौष्टिक आहार'

मिनिटामिनिटाला मुलांचे बदलत जाणाऱ्या स्वभावामागील प्रमुख कारण कदाचित न मिळणारा आहारदेखील असू शकतं. कौटुंबिक, भौगोलिक कारणांप्रमाणे सकस आणि पौष्टिक आहार न मिळाल्यानंही मुलांच्या एकाग्र शक्तीवर परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे.  मोठ्यांनीच जर पौष्टिक आहाराऐवजी वारंवार चहा,कॉफी, शीतपेयाचे वारंवार सेवन केले तर त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तर मग लहान मुलांचं काय होत असावं, याचा विचार आपण गांभीर्यानं करणं आवश्यक आहे.   
आपल्या मुलांनं आयुष्यात सकारात्मक, एखाद्या विषयाप्रती त्याचे लक्ष केंद्रित असावे, एकाग्रता असावी, असे हवे असल्यास त्यांच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये या पौष्टिक आहाराचा समावेश करावा
1. ब्रेकफास्टमध्ये धान्यांचा समावेश करावा
शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले की मुलांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते. यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते, त्यांचा स्वभाव चिडखोर होतो. चिडचिड कमी करण्यासाठी त्यांच्या नाश्त्यामध्ये धान्यांचा समावेश करावा. विशेषतः ब्राऊन राईस आणि बाजरीचा यादीत जरुर समावेश करावा. ब्राऊन राईसचे स्वादिष्ट पोहे हा देखील नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. कामाच्या धावपळीमुळे नाश्त्यामध्ये हे पदार्थ देणे शक्य नसल्यास दुपारच्या जेवणात त्यांचा समावेश करावा. या पदार्थांचे सेवन केल्यानं त्यांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होईल आणि त्यांना वारंवार भूक लागणार नाही. यामुळे त्यांचे लक्ष केंद्रित राहण्यास मदत होईल. 

2. आरोग्यास साखर हानिकारक 
''लहान पण देगा देवा मुंगी साखरचे रवा'', असे तुकाराम महाराजांनी म्हटलं खरं पण हीच साखर आयुष्यासाठी हानिकारक ठरू शकते. साखर चवीला जरी गोड असली त्याचे ती आरोग्यास अपायकारक आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातून साखर हद्दपार केल्यास तुमचा निर्णय कौतुकास्पद ठरू शकतो. तुमच्या नकळत मुलं घराबाहेर किती प्रमाणात साखर पोटात घेत आहेत, यावर तुमचं नियंत्रण नसलं तरीही घरात त्यांच्या साखर खाण्यावर तुम्ही पूर्णतः नियंत्रण आणू शकता. साखरेच्या सेवनामुळे शरीरावर किती वाईट परिणाम होतात, याची माहिती देणारा सूचना फलक (नोट) स्वयंपाक घरात लावावा. ही नोट त्यांनी नियमित वाचलीच पाहिजे. जेणेकरुन त्यांच्या साखर खाण्याची सवय आपोआप कमी होण्यास मदत  होईल. मात्र हा बदल लगचेच घडून येत नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना, युक्ती, नियोजनाद्वारे हा बदल घडवून आणावा.
उदा. जर आपला दुधात दोन चमचे साखरऐवजी दीड चमचा साखर मिसळावी. हळूहळू साखरेचं प्रमाण आणखी कमी करावे. 

3 भूक भागवणारी खाद्यपदार्थ
- आहारात कंदमुळांचा समावेश करावा
- रताळ्याचे भाजलेल्या चकत्या किंवा फ्रेन्च फ्राईज्. हा स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ मुलांना नक्कीच आवडेल.  
- अरबीची (कंदमुळे) भाजीही मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अरबीच्या गोल चकत्या कराव्यात, त्या पाण्यात उकडाव्याक आणि मग तळून मुलांना खायला द्याव्यात.

4. भोपळ्याची पोष्टिक पोळी
पिष्टमय पदार्थांतून शरीराला सेरटोनिन नावाचे पोषकतत्त्व मिळते. योग्य प्रमाणात शरीराला सेरटोनिनचा पुरवठा झाल्यास मुलांचे मूड स्विंग्सचा समतोल योग्यरित्या सांभाळला जाऊ शकतो. शिवा, मुलं शांत आणि आनंदीदेखील राहतात. 


Web Title: This is how you can improve your child’s concentration
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.